मुंबई, : (Mysuru Temple Wall Controversy)कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील के. आर. नगर येथे अरकेश्वर मंदिराच्या भिंतीवर मशिदीचे चित्र आणि लाल रंगाचा क्रॉस काढण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी या चित्रांविरोधात आंदोलन केल्यानंतर तालुका प्रशासनाने ती चित्रे हटवली. तसेच, मंदिराची देखभाल करणाऱ्या महिला आणि ही चिन्हे रेखाटणाऱ्या कलाकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरकेश्वर मंदिर हे या परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून, अलीकडेच त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे
मंदिराच्या आवारातील भिंतींवर हिरव्या रंगात मशिदीचे, तर लाल रंगात क्रॉसचे चित्र काढण्यात आले होते. स्थानिक हिंदू तरुणांनी या चित्रांना आक्षेप घेत, पवित्र हिंदू धार्मिक स्थळाच्या भिंतीवर अन्य धर्मांची प्रतीके काढणे अयोग्य असल्याचे म्हटले. या चित्रांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.(Mysuru Temple Wall Controversy)
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सुरेंद्र मूर्ती यांनी मंदिराला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाने संबंधित चित्रे हटवण्याचे आदेश दिले. मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरती आणि ही धार्मिक चिन्हे रेखाटणाऱ्या विनय या कलाकाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार के. आर. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी या घटनेचा निषेध केला. हिंदू मंदिराच्या परिसरात अन्य धर्मांशी संबंधित प्रतीके रेखाटल्याने मंदिराच्या पावित्र्याला बाधा पोहोचते आणि हिंदू परंपरांचे उल्लंघन होते, असे त्यांनी म्हटले. त्यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये हिंदू धार्मिक परंपरांबाबत असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप करत काँग्रेस सरकारवर टीका केली. धार्मिक सलोख्याच्या नावाखाली मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. केवळ चित्रे हटवून प्रश्न सुटणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, दोषींना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही जाब विचारला.(Mysuru Temple Wall Controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक