जगातील समस्यांची उत्तरे भारताकडे! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    20-Oct-2026   

Mohan Bhagwat on India 
 
मुंबई (Mohan Bhagwat on India) : जगभरात भारताविषयी कुतूहल निर्माण होत आहे. भौतिकदृष्ट्या संपन्न असूनही अनेक देश चिंताग्रस्त आहेत. अनेक समस्यांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. याच कारणामुळे आज संपूर्ण जग भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, पर्यावरणीय संकटे आणि वर्चस्वाच्या संघर्षातून निर्माण होणारा विनाश अनुभवत आहे. या सर्व समस्यांची उत्तरे भारताकडे आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरातर्फे यंदाचा विजयादशमी उत्सव मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सकाळी ७:४० वाजता आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.(Mohan Bhagwat on India)
 
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, धर्मतत्त्वाच्या आधारे विकासाचा मार्ग सर्वांगीण आणि परिपूर्ण बनवून जगाला सुख-शांतीचा नवा मार्ग दाखवू शकणारा भारत आपल्याला उभा करायचा आहे. आपल्या राष्ट्रीय मूल्यांच्या आधारावर संपूर्ण जगासमोर विकासाचा एक नवा मार्ग आपल्या आचरणातून आणि उदाहरणातून मांडायचा आहे. भारताचे परमवैभव आणि विश्वगुरू म्हणून त्याचे स्थान हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या पुरुषार्थातूनच साकार होईल.
 
पुढे ते म्हणाले, आपण आपल्या देशाच्या संविधानात स्वतःला एक प्रजा म्हणून, विविधता असूनही भावनिकदृष्ट्या एकात्म असलेला समाज म्हणून ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले. या भावनिक बंधाची प्रत्यक्ष अनुभूती ज्या तत्त्वामुळे प्राप्त होते, ते तत्त्व आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे जगातील सर्वोत्तम तत्त्वज्ञान आपल्याकडे असूनही आपले आचरण त्यापासून पूर्णपणे वेगळे आणि हीन दर्जाचे झाले. त्यामुळे विश्वगुरूच्या स्थानावरून आपली मोठी घसरण झाली आणि अनेक शतके आपल्याला पारतंत्र्य सहन करावे लागले. असंख्य बलिदानांनंतर त्या दुर्दैवी काळातून मुक्त होऊन आपण पुन्हा एकदा एकता आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागलो आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जितकी तपश्चर्या आणि समर्पण करण्यात आले, त्यापेक्षाही अधिक प्रयत्नांची आता आवश्यकता असेल, हे आजच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर लक्षात येते.(Mohan Bhagwat on India)
 
सर्व प्रकारच्या विविधतेचा सन्मान करणे, तिचा स्वीकार करणे आणि तिचे संरक्षण करणे हा भारताचा स्वभाव असल्याचे सांगत सरसंघचालक म्हणाले, जे परिवर्तनशील आहे किंवा कालसुसंगत राहिलेले नाही, त्यात बदल घडवून आणण्याची लवचीकताही भारताच्या स्वभावात आहे. ही दोन्ही वैशिष्ट्ये सनातन दृष्टिकोनाचाच परिणाम आहेत. जेव्हा जेव्हा भारतातील जनमानसात ही भावना सर्वोच्च स्थानी राहिली, तेव्हा तेव्हा भारत सर्वच दृष्टींनी जगासाठी आदर्श राष्ट्र ठरला. परंतु, जेव्हा आत्मविस्मृती, विघटन आणि परस्परांतील संपर्क तुटल्यामुळे आपण दुर्बल, संकुचित, अहंकारी किंवा भयग्रस्त झालो, तेव्हा आपण या आचरणाचा त्याग केला आणि त्याचे परिणाम म्हणून आपली दुर्दशा झाली. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा हा मूलभूत आधार पुन्हा स्मरणात आणून, आपण संघटित झाले पाहिजे आणि परस्परांच्या हितासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.
 
विवेकाचा अभाव हेच जगभरातील नव्या पिढीला मादक पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जाण्यामागील एक कारण आहे. व्यसन ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या आहे. तिचे निराकरण करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने वेळीच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. सध्याच्या पिढीतील पालक आणि ज्येष्ठांनी नव्या पिढीला योग्य-अयोग्यतेचा विवेक शिकवला पाहिजे. त्याचबरोबर, नव्या पिढीने स्वतःला व्यसनाधीन करणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवृत्तींपासून दूर ठेवले पाहिजे. येत्या काळात परमवैभवसंपन्न आणि विश्वगुरू भारताच्या निर्मितीची मोठी जबाबदारी नव्या पिढीच्या खांद्यावर येणार आहे. हे आव्हान स्वीकारून त्याला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आपल्या युवकांनी सर्व प्रकारे सज्ज असले पाहिजे, असे सरसंघचालकांनी सांगितले.(Mohan Bhagwat on India)
 
विभाजनवादी प्रवृत्तींमुळे निर्माण होणाऱ्या वैचारिक संभ्रमाच्या प्रभावापासून स्वतःला वाचवून परस्परांतील सद्भावनेचे रक्षण करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे विचलित किंवा उत्तेजित न होता, भारताला विश्वगुरूच्या स्थानावर पाहण्याची आपली आकांक्षा आणि ध्येय सतत मनात ठेवून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी स्मृति मंदिर येथे आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर उत्सवठिकाणी शस्त्रपूजन केले. मैदानावर उपस्थित स्वयंसेवकांनी योग, घोष, दंडाभ्यास, इ प्रात्यक्षिके सादर केली.(Mohan Bhagwat on India)
 
हिंदुभाव जागृत करून सुसंघटित समाज बनवण्याचे कार्य
 
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आपल्या राष्ट्राची चेतना म्हणजे सनातन जीवनदृष्टी. भारतातील जनतेसह संपूर्ण जग या दृष्टिकोनाला ‘हिंदू दृष्टिकोन’ या नावाने ओळखते. अध्यात्म, मानवता आणि विश्वबंधुत्व हीच त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. संपूर्ण जगाला जोडण्याची क्षमता असलेल्या आणि जगाला एकत्र आणण्याची इच्छा बाळगणाऱ्या या हिंदुभावाचे स्मरण आणि त्याचे संवर्धन करणे, ही भारताच्या प्रगतीची आणि एकतेची अनिवार्य आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच हिंदुभावाला जागृत करून संपूर्ण समाजाला सुसंघटित आणि सामर्थ्यसंपन्न बनवण्यासाठी कार्य करत आहे.
 
भारत सर्वांत सामर्थ्यवान प्रतिस्पर्धी
 
भारतीय समाजाचे पुरुषार्थ, दृढ धोरणे, नेतृत्व, देशाभिमान आणि जगाप्रती असलेल्या आपल्या दायित्वाची जाणीव यामुळे भारत सर्व क्षेत्रांत यशस्वी होत आहे. भारताच्या या प्रगतीमुळे जगातील राष्ट्रांमध्ये अराजकता निर्माण करून स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या आपल्या हस्तकांना त्या देशांमध्ये सत्तास्थानी बसवण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या शक्तींचे डावपेच निष्प्रभ ठरतील. ही वस्तुस्थिती या आसुरी शक्तींना माहीत आहे. त्यामुळे भारत हाच त्यांचा निर्णायक आणि सर्वांत सामर्थ्यवान प्रतिस्पर्धी, तसेच त्यांचे अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाचे लक्ष्य आहे, असे सरसंघचालकांनी याप्रसंगी सांगितले.(Mohan Bhagwat on India)
 
आंदोलनात प्रत्येकाच्या कृती संविधानाच्या मर्यादेत असल्या पाहिजेत
 
आंदोलन करणारा समाजातील कोणताही समूह असो, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यवाही करणारे शासन-प्रशासन असो किंवा राजकीय नेते असोत, आपल्या अखंड समाजात आपल्या कृतींमुळे कोणत्याही प्रकारची अनबन, द्वेष, वैरभाव, कटुता किंवा फूट निर्माण होता कामा नये. भावना तीव्र झाल्या असल्या, तरी आपल्या कृती संविधानाने आणि कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेत असल्या पाहिजेत. तसेच बोलणे, वागणे आणि व्यवहार यांतील सभ्यतेच्या संकेतांचेही पालन झाले पाहिजे. मतांसाठी, स्वस्त लोकप्रियतेसाठी किंवा राजकीय लाभासाठी असलेला लोभ आपल्या विवेकावर आणि सद्भावनेवर हावी होणार नाही, याची काळजी आपण घेतलीच पाहिजे, असे ठाम मत सरसंघचालकांनी मांडले.
 
संघ आणि 'जागरण'ची विचारधारा एकसमान
 
संघाच्या स्थापनेमागील मूळ संकल्पना आणि उद्दिष्टे हिंदू समाजाची एकजूट करून त्याला सामर्थ्यवान बनवणे ही होतीच; त्याचबरोबर राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणे हेही त्याचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. समाजाला पारतंत्र्याच्या मानसिकतेतून बाहेर काढल्याशिवाय आणि त्याच्यात स्वबोध जागृत केल्याशिवाय खऱ्या स्वातंत्र्याची कल्पना साकार होऊ शकत नाही, अशी तेव्हा संघाची धारणा होती. स्वातंत्र्यानंतर संघाने व्यक्तिनिर्माणासोबतच भारतीयत्व आणि राष्ट्रनिष्ठा यांना आपले प्रमुख ध्येय बनवले. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर संघाच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन अस्सल भारतीयत्वावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या विचारांना नवी दिशा दिली. आज संघ अस्तित्वात नसता, तर हिंदू संस्कार आणि हिंदू जीवनपद्धती कदाचित केव्हाच लोप पावली असती. आधी मुघलांचे आणि त्यानंतर इंग्रजांचे शासन, अशा सुमारे सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आज भारतीयत्व आणि हिंदुत्वाचा जागतिक स्तरावर जो प्रभाव दिसून येतो, त्याचे प्रमुख श्रेय संघाला दिले पाहिजे. संघ आणि दैनिक जागरण यांची विचारधारा भारतीय सनातन संस्कृती, राष्ट्राप्रती निष्ठा आणि समर्पण या मुद्द्यांवर एकसमान आहे.
नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांची सातत्याने जाणीव करून देणे, हे आपले कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा संघाच्या मूल्यांपासून प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या संघटना अस्तित्वात नसत्या, तर सध्याच्या स्वरूपातील हिंदू जीवनपद्धतीची संविधानात जात-पातीनुसार स्वतंत्रपणे व्याख्या होण्याची वेळ आली असती आणि हिंदू समाज पुन्हा एकदा विभागला गेला असता, अशी शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावना हे चारित्र्यसंपन्न नागरिकाचे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. भारताला पुन्हा एकदा तो वैभवशाली काळ प्राप्त करून द्यायचा असेल, तर चारित्र्यनिर्मितीशिवाय ते शक्य नाही.(Mohan Bhagwat on India) - संजय गुप्ता, मुख्य संपादक, दैनिक जागरण
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर