विजयाची ‘दशमी’ सर्वांच्या मुखी जाऊ दे...!

    20-Oct-2026
Maharashtra Drought 2026

आज विजयादशमी! वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा हा दिवस. मात्र, दुष्काळामुळे राज्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबांना भविष्याची चिंता भेडसावत असून, काहींनी अन्नाचीही भ्रांत आहे. त्यामुळे या विजयादशमीला, आपट्याचे सोने वाटताना, शेतकर्‍याचे कष्टाचेही सोने व्हावे, अशी प्रार्थना करुया!
 
सणांच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रात एका बाजूला उत्सवांचा झगमगाट आहे, तर दुसरीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेला शेतकरी आहे. पावसाच्या लहरीपणाने उद्ध्वस्त झालेली शेती, वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेला सामान्य माणूस आणि भविष्याच्या चिंतेने काळवंडलेली कुटुंबे अशा परिस्थितीत, दसर्‍याचा आनंद कोणाच्या आयुष्यात उमलणार? दसरा म्हणजे विजयाचा, नव्या आशेचा आणि मांगल्याचा उत्सव! परंतु, ज्या भूमीत शेतकर्‍याच्या कष्टांचे सोने व्हायला हवे, तिथेच त्याच्या स्वप्नांची राख होत असेल; तर सणाचा आनंद कोणाच्या वाट्याला येणार? शेतकर्‍याच्या दृष्टीने खरी विजयादशमी त्याच्या शिवारातल्या पिकांत असते. धान्याच्या रूपाने घरात आलेली समृद्धी आणि घामाचे उत्पन्नात झालेले रूपांतर, हाच त्याचा दसरा! मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीने या आनंदावरच चिंतेचे सावट पसरवले आहे. शेतकरी शेतीतील अनेक बाबींसाठी अनेकदा कर्जाचा आधार घेतो. आभाळाकडे डोळे लावूनच तो पेरणी करतो. पहिल्या पावसासोबत जमिनीतून हिरवे कोंब डोकावतात आणि त्याच्या मनालाही आशेची पालवी फुटते. पीक चांगले येईल आणि घरातील अडलेली कामे मार्गी लागतील, अशी असंख्य स्वप्ने तो पाहतो. परंतु, पावसाने अचानक दडी मारली की, शेतकर्‍याच्या स्वप्नांवरही विरजण पडते.
 
आकडेवारीपलीकडचा दुष्काळ!
 
दुष्काळाची तीव्रता आकडेवारीवरून अधिक समजते; पण त्यामागील वेदना समजण्यासाठी शेतकर्‍याच्या डोळ्यांत पाहावे लागते. ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुयांची संख्या ३०५ पर्यंत पोहोचली आहे. तसेच दि. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४.५ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत, सुमारे ८०४.४ मिलिमीटरच पाऊस झाल्याची नोंद आहे. म्हणजेच, सरासरीच्या तुलनेत सुमारे १८ ते १९ टक्के पावसाची तूट दिसते. पाऊस किती झाला, तो कोणत्या काळात झाला, किती दिवसांचा खंड पडला आणि जमिनीत किती ओलावा टिकला, यावरच पिकांचे भवितव्य असते. या आकड्यांमागे पाण्यासाठी वणवण करणारी गावे, जनावरांच्या चार्‍याची चिंता आणि उत्पन्न आटल्याने विवंचनेत सापडलेली कुटुंबे आहेत. दुष्काळग्रस्त तालुयांची घोषणा झाल्यावर शासनाची खरी कसोटी सुरू होते. पंचनामे वेळेत व्हावेत, पात्र शेतकर्‍यांची नोंद अचूक व्हावी आणि मंजूर मदत त्यांच्या खात्यात लवकर जमा होणे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍याला वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत.
 
नुकसानीचा घाव बळीराजाच्या जगण्यावर!
 
तीव्र दुष्काळ असलेल्या काही भागांत सोयाबीन, कापूस, मका आणि कांदासारख्या पिकांच्या नुकसानीची तीव्रता ७४ ते ८५ टक्क्यांपर्यंत आहे. हे नुकसानीचे अंदाज असून, अंतिम स्थिती अधिकृत पंचनाम्यांनंतरच स्पष्ट होईल. अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत ८० टक्के नुकसान झाले, तर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० टक्केच उरण्याची शयता असते. मात्र बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्चच मोठा असल्याने उत्पादनातील घट त्याच्या आर्थिक गणितावरच घाव घालते. अनेक पीक-नुकसान मदत व्यवस्थांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान हाच महत्त्वाचा निकष असतो. तथापि, पात्रता आणि मदतीचे स्वरूप शासननिर्णयानुसार ठरते. म्हणून पंचनामे अचूक, पारदर्शक होणे आवश्यक आहे.
 
दुष्काळ शिवारात, महागाई घरात!
 
दुष्काळामुळे उत्पन्न घटले की, त्याचे पडसाद ग्रामीण रोजगार, बाजारपेठ आणि घरखर्चावर उमटतात. भाजीपाल्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या की, कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडते. एका बाजूला शेतकर्‍याला उत्पादनाचा योग्य मोबदला हवा, तर दुसर्‍या बाजूला ग्राहकाला परवडणार्‍या किमतीत तेच उत्पादन मिळायला हवे. याचा समतोल साधण्यासाठी पुरवठा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन आवश्यक आहे. दुष्काळाकडे अन्नसुरक्षेचा आणि सामाजिक स्थैर्याचाही प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे.
 
मदत ही घोषणा नको, जगण्याचा आधार ठरावी!
 
संकटाच्या काळात मदतीच्या घोषणा ज्या होतात, याचे प्रतिबिंब शेतकर्‍याच्या प्रत्यक्ष जगण्यात दिसले पाहिजे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, पीकविमा दाव्यांचा निपटारा सुलभ व्हावा, कर्जफेडीबाबत आवश्यक दिलासा मिळावा आणि ‘रोजगार हमी’च्या कामांना गती द्यावी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता यांना प्राधान्य द्यावे लागेल. दरवर्षी दुष्काळ पडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी दूरदृष्टीने नियोजन करणे अधिक महत्त्वाचे.
 
विजयादशमीचा खरा अर्थ
 
दसरा आला की, घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण होते. पण, एखाद्या शेतकरी कुटुंबाला पुढील हंगामाच्या बियाण्यांची चिंता अधिक भेडसावत असेल, तर त्या कुटुंबासाठी सणाचा अर्थच बदलतो. अशा वेळी केवळ शुभेच्छाच पुरेशा नाहीत. समाजाने शेतकर्‍याच्या कष्टांचे मोल ओळखावे, गरजू कुटुंबांना मदत करावी, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये शय त्या मार्गाने प्रत्यक्ष सहकार्य करावे.
 
विजयादशमी चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याची प्रेरणा देते. आज पाण्याचा अपव्यय थांबवणे, शेतकर्‍याला वेळेत मदत मिळवून देणे, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होणे, जनावरांना चारा मिळणे, शेतमजुराच्या हाताला काम मिळणे आणि सामान्य माणसाला सन्मानाने दोन वेळचे अन्न मिळणे, हाच खरा विजय आहे. या दसर्‍याला पावसाच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणण्याची बुद्धी मिळू दे, संकटातल्या बळीराजाला सावरण्याचे बळ मिळू दे, शिवारात पुन्हा हिरवळ फुलू दे, विहिरींना पाणी येऊ दे आणि शेतकर्‍याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळू दे, अशीच प्रार्थना करूया. या विजयादशमीला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची परंपरा जपूया; पण त्याचबरोबर शेतकर्‍याच्या घामाला सोन्याचे मोल मिळवून देण्याचा संकल्प करूया!
 
- डॉ. दिलीप कोठावदे




संबंधित मजकूर