संत रोहिदास महाराजांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार विचारकार्य करणार्या मुंबईच्या गुरुदेव कांबळे यांच्याविषयी...
"बघ, संत रोहिदास काय म्हणतात. ते म्हणतात, जो व्यक्ती आपल्या कर्माला आणि श्रमालाच ईश्वर मानून दिवसभर प्रामाणिकपणे काम करतो, त्याला स्वतः भगवान राम भेटतात. कष्ट करणार्या प्रामाणिक व्यक्तीचा कधीही अनादर होत नाही,” असे भगवान कांबळे, त्यांच्या मुलाला गुरुदेव यांना सांगत असत. प्रामाणिकपणाला आणि कष्टाला पर्याय नाही, हे सूत्रच गुरुदेव यांच्या मनात बालपणापासूनच रुजले. त्यामुळेच तर गुरुदेव यांनी काम हीच प्रतिष्ठा आणि ईश्वर असल्याचे मानून, कोणत्याही कामाला कधीच गौण म्हटले नाही.
धारावी येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपण आणि तरुणपणही गेलेल्या गुरुदेव यांनी आज शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवली आहे. ते पेशाने शिक्षक असून, त्यांनी वकिलीचेही शिक्षण घेतले आहे. शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, चित्रकला, पुस्तकबांधणी, तसेच सजावटीच्या वस्तूंसोबतच, चामड्याच्या वस्तू बनवण्यासारख्या असंख्य कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. ते ‘संत रोहिदास सेवाभावी संस्था, मुंबई’चे सरचिटणीस असून, बौद्धजन विकास संघटना आणि संत रोहिदास उत्कर्ष मंडळ समितीचेही सक्रिय सभासद कार्यकर्ता आहेत.
अनेक सेवाभावी संघटनांना ते नियमितपणे आर्थिक सहकार्य करतात. समाजातील युवकांचा शिक्षणातील टक्का वाढावा, यासाठीही ते तळमळीने काम करतात. चर्मकार समाजाच्या तरुणांनी पारंपरिक व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करावे (कारण त्यात भरपूर रोजगाराच्या संधी आहेत म्हणून), यासाठी गुरुदेव समाजजागृतीही करतात. चर्मकार समाजाची सद्यस्थिती काय आहे? प्रगती कशी होऊ शकते, यासाठी चिंतन करून, त्यासंदर्भात ते कामही करतात. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
कांबळे कुटुंब मूळचे बारामतीचे. भगवान आणि कमलबाई यांना तीन अपत्ये, त्यांपैकी एक गुरुदेव! कांबळे कुटुंब अत्यंत सज्जन आणि पाप-पुण्य मानणारे. हेच संस्कार गुरुदेव यांच्यावरही झाले. कांबळे कुटुंब कामानिमित्त मुंबई, धारावी येथे वास्तव्यास होते. घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती पण, घरच्या संस्कारामुळे ती परिस्थिती गुरुदेव यांना कधीच जाणवली नाही. गुरुदेव यांनी दहावीची परीक्षा दिली. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही. ते बाबांसोबत कामाला जाऊ लागले. त्यांचे बाबा चामड्याच्या विविध वस्तू बनवण्याचे काम करत. चामड्यापासून बॅग बनवण्याचे कौशल्य, गुरुदेव यांनी आत्मसात केले. या कौशल्याच्या आधारेच चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय करायचा, असे त्यांना वाटे. तीन-चार वर्षे काम केल्यावर त्यांनी तसा प्रयत्न केलाही. मात्र, आर्थिक पाठबळाअभावी व्यवसाय उभा राहू शकला नाही.
दरम्यान, त्यांनी रात्र महाविद्यालयामध्ये अकरावीला प्रवेश घेतला. नोकरी सुरूच होती, याच काळात ते आजारी पडले. त्यामुळे नोकरी सुटली आणि शिक्षणही. पण, नुसतेच आयते बसून राहणे गुरुदेव यांना मानवणारे नव्हते. त्यांनी प्रशिक्षण घेऊन तीन वर्षे ‘होमगार्ड’चे काम केले. त्यांनी बारावीला प्रवेश घेतला आणि सोबतच ‘डिप्लोमा’चे शिक्षण घेतले, यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यामुळे त्यांना मूकबधिर शाळेत, कलाकौशल्य शिकवण्याची नोकरी लगेच मिळाली. हे एक वेगळे विश्व होते. आत्मविश्वास देणारे, तसेच स्वयंरोजगार मिळवून देणारे कलाकौशल्य या मुलांना शिकवणे, म्हणजे एक आव्हानच होते. पण, त्यांनी ते आव्हान पेलले. या सगळ्या काळातच ‘बीएड’चेही शिक्षण घेतले, विविध कलाकौशल्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
याच काळात त्यांचा विवाह संगीता यांच्याशी झाला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संगीता यांनी त्यांना साथ दिली. गुरुदेव यांना समाजभान होते. त्यांना दिसत होते की, समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठा प्रश्न आहे तो, कायदेशीर बाबींचे समाजात असलेले अज्ञान. गटई कामगार बंधूंच्या स्टॉलबद्दल समस्या आली, तर कायद्याने काय हक्क आहेत? कुणावर अत्याचार झाला, तर न्याय कसा मिळेल? याबाबत अज्ञानच होते. त्यामुळे आपल्या संपर्कात असलेल्यांना तरी कायदेशीर मार्गदर्शन करता यावे, यासाठी गुरुदेव यांनी ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले.
पुढे सामाजिक कार्य करतानाच, त्यांच्या संपर्कात विजय खोले आणि विठोबा पवार आले. त्यांच्या माध्यमातून निलेश गद्रे आणि नागेश धोंडगे यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यातूनच ‘समरसता’ संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची, गुरुदेव यांना गोडी लागली. गुरुदेव म्हणतात, "मन चंगा तो कटौती मे गंगा.’ संत रोहिदासांच्या विचारानुसार यापुढेही कार्य करायचे आहे. समाजात समरसता निर्माण व्हावी, समाजात शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार व्हावा, समाज स्वयंरोजगारनिपुण व्हावा, यासाठी यापुढे काम करत आहे आणि पुढेही करत राहणार.” गुरुदेव कांबळे यांच्या विचारकार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
९५९४९६९६३८