देशात सत्ता उलथवण्याचा मानस असल्याचे प्रशांत भूषण यांनी अलीकडेच जाहीर केले. त्यासाठी अराजकाचा विरोधकांनी घेतलेला आधारही जनतेने पाहिला. त्यामुळे या गोंधळात लोकशाहीचा आवाज अधिक ठळक करण्यासाठी, अभाविप मैदानात उतरली असून, त्यांनी विरोधकांचा लोकशाहीच्या खच्चीकरणाचा डाव हाणून पाडण्याचा चंग बांधला आहे.
सध्या देशातील बहुतांश विरोधक वाटेल, त्या मार्गाने लोकशाही प्रक्रियेद्वारे सत्तेवर आलेले केंद्र सरकार कसे घालविता येईल, यासाठीच डोकेफोड करीत आहेत. बांगलादेश, नेपाळ आणि आता फ्रान्समध्ये जो उद्रेक झाला आहे; तसाच उद्रेक भारतात व्हावा, याचीच प्रतीक्षा त्यांना आहे. यामध्ये ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांप्रमाणेच, नव्याने उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. देशात अराजक माजवायचे आणि लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले मोदी सरकार सत्तेवरून घालवायचे, असा एककलमी कार्यक्रमच या सर्व विरोधकांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करायची, ‘जेन-झी’ आपल्यामागे असल्याचा दावा करून हिंसक आंदोलन करण्यासाठी त्यांना भडकवायचे, असाच प्रकार चालला असल्याचे दिसून येते. कधी धर्मेंद्र प्रधान यांना; तर कधी ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करून जनतेची माथी भडकवायची, असे प्रकार सुरू असल्याचेही दिसते.
पण, आपल्या देशातील जनता भोळी नाही. या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे. कोण चांगले आणि कोण वाईट, हे या देशातील जनतेला चांगलेच कळते. त्यामुळे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यातून आपल्याला सत्ता मिळेल, अशा भ्रमात असलेले विरोधक यशस्वी होणार नाहीत. ‘राजवट बदलायची आहे,’ अशी भाषा प्रशांत भूषण यांनी अलीकडेच केली. राजवट बदलण्याच्या त्यांच्या मागणीस कोणाचा विरोध आहे? पण, राजवट बदलायची, तर ती देशातील घटनेने आखून दिलेल्या मार्गानेच बदलायला हवी ना! उगाच तुम्ही बेंबीच्या देठापासून ओरडला म्हणून थोडेच सत्तांतर होणार आहे! या देशात केवळ लोकशाही मार्गानेच सत्तांतर होऊ शकते, हा इतिहास आहे.
त्यामुळे अराजकाची परिस्थिती निर्माण करून सत्ता मिळू शकते, अशा भ्रमात राहुल गांधी, प्रशांत भूषण, अखिलेश यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी राहू नये. राजकारणात शिरलेली ‘झुरळे’ कोणाच्या तालावर नाचत आहेत, हे जनता चांगलेच ओळखून आहे.
भारतातील युवक बांगलादेश किंवा नेपाळमध्ये घडल्याप्रमाणे, अराजकाचा मुळीच स्वीकार करणार नाहीत. देशातील युवकांचा भारतीय संस्कृती आणि लोकशाही मूल्यांवर पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीमध्ये मतांद्वारे सत्तांतर होत असते, जनतेच्या दबावामुळे नाही. देशातील घटनात्मक संस्थांची गळचेपी करण्याचे प्रयत्न अस्वीकारार्ह आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री अभय प्रताप सिंह यांनी केले आहे. ‘अभाविप’ने ‘अराजक थांबवा, लोकशाही स्वीकारा’ याअंतर्गत राष्ट्रव्यापी अभियानच छेडले आहे. त्यानिमित्ताने लखनौ येथे आयोजित युवाशक्तीच्या प्रचंड मेळाव्यात ते बोलत होते. लखनौ विद्यापीठापासून हजरतगंज भागातील गांधी चौकापर्यंत निघालेल्या मिरवणुकीत, हजारो विद्यार्थी आणि ‘अभाविप’चे सदस्य सहभागी झाले. लोकशाही आणि घटनात्मक संस्था दुर्बल करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी युवकांना करण्यात आले. या कार्यक्रमास काशी प्रांत सचिव शिवं सिंह, गोरक्ष प्रांत सचिव मंगल गुप्ता, अवध प्रांत सचिव अर्पण कुशवाह आणि कानपूर प्रांत सचिव दिनेश यादव आदी उपस्थित होते.
युवकांच्या या विशाल सभेद्वारे, भारतामध्ये सरकार बदलण्याचा अधिकार हा पूर्णपणे जनतेच्या हातीच आहे. अराजक किंवा दबावाच्या राजकारणास लोकशाहीमध्ये स्थान नाही, हेही लक्षात आणून देण्यात आले. निवडणुकीसंदर्भातील तक्रारी या, पुरावे आणि त्या संदर्भातील ज्या घटनात्मक तरतुदी आहेत; त्याद्वारेच मार्गी लावल्या जाऊ शकतात. देशात रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन करून नव्हे; तर जनतेच्या मतांद्वारे सरकारे येतात आणि जातात. बांगलादेश किंवा नेपाळमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यापासून प्रेरणा घेऊन अराजकाचे राजकारण करणे अस्वीकारार्ह आहे, असा इशाराही ‘अभाविप’ने दिला आहे. देशातील युवाशक्तीने आता देशाच्या लोकशाहीस आव्हान देणार्या तत्त्वांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार केला असल्याचेच यावरून दिसते.
‘सपा’ला मदरशांचे पाठबळ!
उत्तर प्रदेशमधील मदरसा व्यवस्थापकांच्या संघटनेने एक राजकीय ‘फतवा’ प्रसिद्ध केला असून, त्याद्वारे येत्या दि. २३ ऑरक्टोबर रोजी होणार्या विधान परिषद निवडणुकांमध्ये, समाजवादी पक्षाच्या नऊ उमेदवारांना मते देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठीही मदरसा व्यवस्थापकांच्या संघटनेने फतवा काढावा, हे अतीच झाले. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष मुस्लीम समाजाचे किती लांगूलचालन करत आहे, हे अशाच घटनेवरून दिसून येते.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारविरुद्ध, मदरशांशी संबंधित यंत्रणा वापरण्याचा हा प्रयत्न असल्याचेही यातून दिसते. व्यवस्थापकांच्या संघटनेने एकमताने प्रस्ताव संमत करून, सर्व पात्र मतदारांनी समाजवादी पक्षाच्या नऊ मतदारांनाच मते द्यावीत, असा फतवा जारी केला आहे. मुस्लीम मतपेढीला आपल्या बाजूला वळवण्याच्या अखिलेश यादव यांच्या प्रयत्नांचाच, हा देखील एक भाग असल्याचेच मानण्यात येत आहे. मदरसा व्यवस्थापकांच्या संघटनेने शिक्षक मतदारसंघातील सहा आणि पदवीधर मतदारसंघातील तीन उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशा आशयाचा प्रस्ताव संमत केला आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षकांना सरकारकडून वेतन दिले जाते. सरकारी पगार घेऊन, अशा कर्मचारी संघटना विशिष्ट राजकीय पक्षास मतदान करा, असे कसे म्हणू शकतात?
उत्तर प्रदेशमधील मदरसे सर्व करदाते जो पैसा देतात, त्या पैशांवरच चाललेले आहेत. मग त्यांच्या व्यवस्थापकांची संघटना विशिष्ट पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान करा, असा फतवा कसा काय काढते? उत्तर प्रदेश सरकारने, अशा संस्था आणि संघटना यांचे परवानेच रद्द करायला हवेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी यावर कणखर भूमिका घेऊन, अशा संस्थांवर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही आता करण्यात येत आहे. मदरसा आणि अन्य मुस्लीम संस्था, संघटना यांना हाताशी धरून, अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष आपली मुस्लीम मतपेढी अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करीत आहे, हाच याचा सरळ अर्थ! उत्तर प्रदेशात मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत, त्याचेच चित्र या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना दिसून आले. पण, हे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होणार नाही, हेही अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षाने पक्के लक्षात ठेवायला हवे.
‘तोयबा’च्या अबू हाशीमचा मृत्यू
‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक सदस्य अबू हाशीम याचा मृत्यू झाला. लाहोरमधील ‘तोयबा’च्या मुख्यालयात, पायर्यावरून घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकी सरकारने कुप्रसिद्ध दहशतवाद्यांच्या सूचित अबू हाशीम याचा समावेश केला होता. हाफिज सईद याचा मुलगा तलहा सईद हा या मुख्यालयाचे व्यवस्थापन पाहतो. या अबू हाशीमचे ‘चौधरी मोहम्मद सरवार’ असे नाव असून, ‘लष्कर-ए-तोयबा’मधील प्रमुख नेता म्हणून तो ओळखला जात असे. अबू हाशीमच्या मृत्यूमुळे, या दहशतवादी संघटनेस जबरदस्त हादरा बसला आहे. अबू हाशीम हा हाफिज सईद याच्या अत्यंत जवळचा होता. ‘पंजाब तोयबा’चा प्रमुख म्हणूनही त्याने काम पाहिले होते. तसेच संघटनेच्या आर्थिक व्यवहारांमध्येही त्याची भूमिका महत्त्वाचीच होती. दहशतवाद्यांची भरती करण्यामध्येही त्याने, महत्त्वाची भूमिका बजाविली होती.
नमाज पढण्यासाठी मशिदीमध्ये जात असतानाच, चौथ्या मजल्याच्या पायरीवरून पाय घसरून पडल्याने डोयाला जबरदस्त दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. भारताविरुद्ध, तसेच जागतिक पातळीवर दहशतवादी कारवाया करणार्या ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक म्होरया अखेर त्याच्याच चुकीमुळे ‘अल्लास प्यारा’ झाला.
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२