दुबईहून इस्रायलला जाणारे विमान पाडण्याचा ओमानी सहवैमानिकाचा आत्मघाती कट भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या प्रसंगावधानाने उधळून लावला. १७४ इस्रायली प्रवाशांचे प्राण वाचवून त्यांनी जगावरील ‘९/११’सारखे संकट परतवून लावले, त्याबद्दल त्यांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच! पण, या घटनेने इस्लामिक कट्टरतावादाचा धोकाही पुनश्च अधोरेखित करून, जगाला दहशतवादाविरोधात मतभेद दूर सारून लढण्याचा संदेशही दिला आहे.
दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी सौदी अरब आणि जॉर्डनदरम्यानच्या आकाशात घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जगाचाच थरकाप उडाला. ओमानी सहवैमानिकाने विमान पाडण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याचा हा दहशतवादी प्रयत्न भारतीय वैमानिकाने उधळून लावल्याने ‘९/११’सारखा इस्रायलच्या भूमीवर घडवण्याचा आणखी एक दहशतवादी हल्ला सुदैवाने प्रत्यक्षात आला नाही. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या या अतुलनीय कामगिरीची जगभरातून दखल घेतली गेली असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दुबईवरून इस्रायलच्या दिशेने झेपावलेल्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात घडलेला हा थरार एका विशिष्ट मानसिकतेतून आणि द्वेषाने पछाडलेल्या इस्लामिक कट्टरतेतून जाणीवपूर्वक केलेला आत्मघाती हल्ला होता. विमानाच्या ‘कॉकपिट’मध्येच ओमानी सहवैमानिकाने कट रचून हे विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला. विमानाचे नियंत्रण हिरावून घेऊन ते ‘क्रॅश’ करण्याच्या या इस्लामी कट्टरतेने पछाडलेल्या वैमानिकाच्या मनसुब्याला कॅप्टन स्मित मच्छार या भारतीय वैमानिकाने अत्यंत प्रसंगावधानाने आणि धैर्याने उधळून लावले. ‘कॉकपिट’मधील ही जीवघेणी झटापट स्मित यांनी जिंकली.
स्मित यांच्या या शौर्याची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्यांच्यामुळेच ‘९/११’सारखा अनर्थ टळल्याची भावनाही व्यक्त केली. हा भारतीय संस्कारांचा, शौर्याचा आणि मानवतेचा जागतिक विजय आहे, असेच म्हणावे लागेल. तसेच या घटनेने भारतावरील आणखीन एक संभाव्य गालबोटही रोखले. मागे अहमदाबादच्या विमान अपघात प्रकरणानंतर पाश्चिमात्य जगाने आणि त्यांच्या यंत्रणांनी भारतीय वैमानिकांची आणि पर्यायाने भारताची बदनामी करण्याची एक मोहीमच चालवली होती. आज दुर्दैवाने हे विमान कोसळले असते, तर त्या ओमानी सहवैमानिकाचा दहशतवादी हेतू आणि कट्टरतावाद याबद्दल फारसे न बोलता, या घटनेचे खापर भारतीय वैमानिकावरच फोडले गेले असते. तथापि, स्मित यांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्याबरोबरच, भारताची मानही उंचावली आहे. ‘भारतीय हे जीव घेणारे नसून जीव वाचवणारे आहेत,’ हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. तुर्कीयेचा भूकंप असो, ‘कोरोना’ची लस असो वा आता आकाशात ओढावलेले संकट; संकटकाळात भारतच जगाच्या मदतीला धावून जातो, याचा प्रत्यय या घटनेने पुन्हा एकदा दिला.
त्याचबरोबर या घटनेने एका भीषण वास्तवाकडेही जगाचे लक्ष वेधले आहे, ते म्हणजे जागतिक इस्लामिक दहशतवादाचा आणि कट्टरतावादाचा वाढता धोका. इस्रायलकडे जाणारे विमानच लक्ष्य करणे, हा नक्कीच योगायोग असू शकत नाही. नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी जागतिक दहशतवादाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. दहशतवादाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत आणि ती संपूर्ण मानवजातीसाठी कशी भस्मासुर ठरत आहेत, हा धोयाचा इशारा या दोन्ही देशांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या इशार्याची जगाला प्रचिती आली. ‘दहशतवादाला कोणताही धर्म नसतो,’ असा युक्तिवाद करणारे पुरोगामी आणि मानवाधिकारवाले आता उघडे पडले आहेत. कारण, कट्टरतावाद आता मदरशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो उच्चशिक्षित समजल्या जाणार्या पांढरपेशी वैमानिकांच्या ‘कॉकपिट’पर्यंत पोहोचला असल्याचे या घटनेने दाखवून दिले. तसेच दहशतवाद्यांनी आता युद्धाची पद्धत बदलली आहे. ते आता बंदुका घेऊन लढत नाहीत; तर नागरी सुविधा, विमाने आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करून जास्तीत जास्त जीवितहानी घडवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. अशा अदृश्य शत्रूंना ओळखणे आणि त्यांना वेळीच ठेचणे, हे जगातील गुप्तचर यंत्रणांसमोरील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. त्याचबरोबर ही जगासाठी धोक्याची घंटा आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेला खडे बोल सुनावले होते. "अमेरिकेला अजूनही भारताची दहशतवादाप्रतीची चिंता पूर्णपणे समजत नाही,” असे म्हणत त्यांनी अमेरिकेचे कान टोचले होते. आजच्या या घटनेने जयशंकर यांच्या विधानातील गांभीर्य अधोरेखित केले आहे. एकीकडे अमेरिका आणि पाश्चिमात्य देश दहशतवादाविरोधात जागतिक लढा देत असल्याचा मोठा आव आणतात. पण, दुसरीकडे पाकिस्तानसारख्या दहशतवादाची जागतिक फॅक्टरी चालवणार्या देशाला कधी ‘एफ-१६’ विमानांच्या दुरुस्तीच्या नावाखाली, तर कधी आर्थिक मदतीच्या नावाखाली रसद पुरवून पाठीशी घातले जाते. अमेरिकेचा हा दुटप्पीपणा भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी घातक ठरत आहे. जोपर्यंत स्वतःच्या देशावर दहशतवादी हल्ला होत नाहीत, तोपर्यंत दहशतवादाची झळ पाश्चिमात्य देशांना जाणवत नाही, हा इतिहास आहे.
इस्रायलसारख्या देशाने दहशतवादाविरुद्ध जो लढा उभारला आहे, त्यातून पाश्चिमात्य देशांनी धडा घेण्याची गरज तीव्र झाली आहे. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश वर्षानुवर्षे या इस्लामिक कट्टरतावादाचे सर्वांत मोठे बळी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांच्या भूमिकेला जागतिक पातळीवर शाब्दिक पाठिंबा नको, तर प्रत्यक्ष कृतीची साथ हवी आहे. ‘गुड टेररिझम’ आणि ‘बॅड टेररिझम’ अशी सोयीस्कर विभागणी आता चालणार नाही, हे जगाने समजून घेतले पाहिजे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जगाला दहशतवादाचा विषय गांभीर्याने घ्यावाच लागेल. दहशतवाद ही काही विशिष्ट देशांपुरती मर्यादित असलेली समस्या नाही, तर या आगीची झळ कधीही कोणाच्याही दारापर्यंत पोहोचू शकते, हेच या घटनेतून स्पष्ट झाले. आता निषेधाचे खलिते पाठवून किंवा आंतरराष्ट्रीय मंचांवर भाकड वक्तव्ये करून चालणार नाही, तर या जागतिक भस्मासुराविरोधात कठोर आणि संघटित कारवाई करावी लागेल. पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पाठीशी घालणार्या देशांवर कठोर निर्बंध लादणे, दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आणि त्यांनी चालवलेले ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करणे, ही काळाची गरज बनली आहे. वर्षानुवर्षे आपण दहशतवादावर चर्चाच करत आलो आहोत. मात्र, ‘कॉकपिट’मधील त्या ओमानी सहवैमानिकाच्या आत्मघाती कृतीने हे सिद्ध केले आहे की, आता चर्चा करण्याची वेळ केव्हाच उलटून गेली आहे. आता वेळ आहे, ती थेट आणि निर्णायक कारवाईची! स्मित मच्छार या भारतीय सुपुत्राने आपले कर्तव्य चोख बजावले, आता वेळ आहे, ती जागतिक समुदायाने आपले कर्तव्य बजावण्याची!