कॅनव्हासवर भावविश्वाची रंगछटा!

    02-Oct-2026

Kirti Kumawat

चित्र हेच तिचे पहिले प्रेम. ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे शिक्षण पूर्ण केले असले; तरी चित्रकलेनेच तिच्या आयुष्यात रंग भरले. अशा उदयोन्मुख चित्रकार कीर्ती कुमावतच्या कलासाधनेविषयी...
 
दगडावर बसून बासरीवादनात मनमुराद रमणारे प्रभू श्रीकृष्णाचे शांत, समाधानी ध्यानस्थ भाव, बहरलेल्या फुलांच्या फांदीवर प्रेमात आकंठ बुडालेल्या कलापी पक्षीयुगुलाची छटा, सात्त्विक अभिनयाद्वारे नर्तकीच्या चेहर्‍यावर उभा राहणारा शृंगार रस, अशा विविधांगी भावभावनांना कॅनव्हासवर हुबेहूब स्थिर करण्याची जादू कांदिवलीत राहणार्‍या कीर्ती कुमावतच्या चित्रकौशल्यात आहे. वयाच्या अवघ्या तिशीच्या उंबरठ्यावर तिने ऑईल पेंटिंग, वॉल पेंटिंग, स्केचिंग, कप पेंटिंग, ले-वर्क, थ्रीडी पेंटिंग अशा चित्रकलावर्गीय कलांमधून दर्जेदार कलाकृती साकारत नाव कमावले आहे.
 
शाळेत असतानाच कीर्तीला चित्रकलेने अक्षरश: झपाटून टाकले होते. इवल्याश्या त्या बोटांमध्ये धरलेली पेन्सिल अन् लाल, निळ्या रंगांत मिसळलेला कुंचला पांढर्‍याशुभ्र कॅनव्हासवर फिरायचा, तेव्हा पाहणार्‍याला तिची शैली अवाक करून टाकायची. घरातल्या चार भिंतींत तिच्या मनातील कल्पनेचे रंग त्या ड्रॉईंग बुकमध्ये उमटत. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यातली कलासक्ती चित्ररूपातून डोकावत होती.
 
चित्रकलेची प्रेरणा कीर्तीला तिच्या भावाकडून मिळाली. लहानपणी त्याला चित्र काढताना पाहून तिही चित्रकलेच्या प्रेमात पडली. तिने चित्रकार व्हावे, हे तिच्या घरात मान्य नव्हते. पण, ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे चित्रकला स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी तिला निर्बंध यायचे. पण, घरच्यांना न सांगता तिने विविध चित्रकलेच्या परीक्षा, स्पर्धेत सहभाग घेतला. २० रुपयांचे रंगीला कलर आणि त्यासोबत मोफत मिळणारा ब्रश वापरून तिने रेखाटलेल्या चित्रांनी तत्कालीन चित्रकलेच्या स्पर्धा गाजवल्या.
 
बालवयातच चित्रकलेचे संस्कार अंगाखांद्यावर खेळवल्यानंतर साठ्ये महाविद्यालयात कीर्तीच्या चित्रआवडीला पुढची दिशा गवसली. अकरावीला असताना साठ्ये महाविद्यालयातील अजय दांडेकर सरांकडून तिने तैलचित्र आणि स्केचेसचे धडे गिरवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यातील निसर्गदत्त कलागुणांची जडणघडण झाली. या ज्ञानार्जनात तिला ‘बीएमएम’ विभागाचे प्रमुख गजेंद्र देवडा सरांचेही बहुमूल्य प्रोत्साहन मिळाले. तिच्या चित्रांना ‘बीएमएम’च्या भिंतींवर लावण्याची, त्यासोबतच भित्तिचित्रे रेखाटण्याचीही सरांनी संधी दिली. महाविद्यालयातील प्रदर्शनातही कीर्तीची चित्रे झळकली. साठ्ये महाविद्यालयाच्या ‘बीएमएम’ विभागात कीर्तीने रेखाटलेली चित्रे, वॉल पेंटिंग आजही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतात. ही चित्रे जणू तिच्या कलाप्रेमाची साक्ष देत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रस्थापित चित्रकारांच्या कलाकृती पाहून ती अभ्यास करू लागली. त्यांना न्याहाळू लागली. त्यातले बारकावे तपासू लागली. या शिकाऊ वृत्तीने दिवसागणिक ती आपसूक अद्ययावत होत गेली.
 
‘बीएमएम’मधून पदवीधर झाल्यानंतर उपजीविकेचे साधन म्हणून तिने ‘क्रिएटिव्ह अ‍ॅडव्हर्टायझिंग’चा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ‘फोटोशॉप’, ‘इलस्ट्रेटर’, ‘कोरल-ड्रॉ’, ‘व्हीडिओ एडिटिंग’चे शिक्षण घेतले. तेथे आठ वर्षे खूप मेहनत केली. पण, तेथे तिचे मन रमले नाही. त्या व्यावसायिक स्पर्धेत मानसिकदृष्ट्या ती खचू लागली. तिचे आयुष्य बेरंग झाले होते. तिच्यातला आत्मविश्वासच नाहीसा झाला; पण ती थांबली नाही. चित्रकला तिला खुणावत होती. चित्रांनी पुन्हा तिच्या आयुष्यात रंग भरले. साठ्ये महाविद्यालयातील देवडा सर पुन्हा तिच्यासाठी धावून आले. त्यांनी तिला मानसिक बळ दिले. आज ती वारली पेंटिंग, तैलचित्रांमधून दर्जेदार कलाकृती साकारत आहे. त्यातूनच मग तिने व्यावसायिकदृष्ट्या रंगांच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला.
शाश्वत रोजीरोटी सोडून आर्थिकदृष्ट्या अशाश्वत अशा चित्रकलेच्या क्षेत्रात व्यावसायिक कलाकार म्हणून एखादी मुलगी वळते, हे प्रथमदर्शनी तरी खुळे धाडस वाटत होते. परंतु, तिच्यातला चित्रकार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच ‘कीर्ती क्रिएशन’ची सुरुवात झाली. आज ‘कीर्ती क्रिएशन’च्या माध्यमातून ती आपल्या कलाकृतींना व्यावसायिक रूप देत आहे. विविध प्रदर्शन, वारली पेंटिंग, ऑईल पेंटिंग अशा तिच्या चित्रांना प्रेक्षकांची दाद मिळत आहे. भविष्यात मोठी चित्रकार होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.
 
डोक्यावर साफा फेटा, हातात चिलीम घेऊन राजस्थानी थाट दर्शविणारी तपोवृद्ध व्यक्ती, आयुष्याचा संघर्षमय प्रवास अधोरेखित करणारे त्याचे संवेदनशील नयन, पांढर्‍याफट्ट पिळदार मिशीतला तो राकटपणा, कामसूवृत्तीतून तांबड्या-काळ्या त्वचेमागचा टवकारणारा तजेलपणा, असे मानवी मनाचे तरल भाव ती तैलचित्रातून डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे करते.
डोक्यावरील पारंपरिक पगडीची प्रतिबिंबासारखी भासणारी ठेवण, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा रंगवताना त्याचे वृद्धपण दाखवणारी धाटणी ही कीर्तीच्या चित्रांमधील जिवंतपणाची ओळख. तिला हुबेहूब चित्र काढण्याची प्रचंड हौस. त्याची छाप या तैलचित्रांत उमटली नाही, तरच नवल वाटेल.
 
तिच्या या चित्रकल्पकतेला प्रादेशिक सीमांची मर्यादा नाही. कधी ती राजस्थानचे व्यक्तिवेध रेखाटते, तर कधी ती पंजाबच्या वयोवृद्धाला आपल्या शैलीत रंगवते. कधी ती हिंदू देवदेवतांना तैलचित्रातून कलात्मक नमन करते; तर कधी निसर्गचित्रांच्या नितांत प्रेमात न्हाऊन जाते. दुथडी भरून वाहणारे झरे, डोंगरकपारीत दडलेला सूर्यदेव, उगवतीची किरणे यांना ‘थ्रीडी’ चित्रांच्या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यावर सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘त्या दिसा वडा कडेन’ भावगीतासारखे कोकणचे सौंदर्य जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहते.
 
पैंजण आणि कंबरपट्टा घालून सजलेली नर्तकी अन् तिचा तो साजशृंगार, प्रसंगानुरूप चेहर्‍यावरचे हावभाव बदलणारी तिची अदा सारे काही डोळ्यांसमोर घडत असल्याचे भासवते. चित्र ही केवळ कलाकृती नाही, तर तो प्रसंग प्रभावीपणे मांडण्याची ताकद त्यात आहे. चित्र ही बोलकी असतात. संवादाचे ते ताकदवर माध्यम आहे. कीर्तीच्या चित्रांमधून ही अनुभूती नक्कीच येते. कीर्तीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
 
-रोहित गुरव 
(अधिक माहितीसाठी संपर्क - ८१०८८८६३५९)




संबंधित मजकूर