‘हातच्या काकणाला आरसा कशाला?’ अर्थात, कोणत्याही स्पष्ट दिसणार्या गोष्टीसाठी पुराव्याची गरज नसते. अशीच गत सध्या देशपातळीवर असलेली ‘इंडी’ आणि राज्यातील ‘महाविकास आघाडी’ची. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी ‘इंडी’ आघाडी किंवा ‘महाविकास आघाडी’ची स्थापना झाली होती, हे जगजाहीर असताना त्यांनी वरवर कितीही एकजूट दाखवली, तरी त्याचा उपयोग काय?
बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांवर आंदोलन करण्यासंदर्भात दिल्लीत ‘इंडी’ आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला काही घटकपक्षाचे नेते प्रत्यक्ष, तर काही ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन उपस्थित असलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी भर बैठकीत काँग्रेसला सुनावल्याचे समजते. खरेतर, निवडणूक आयोग आणि ‘एसआयआर’च्या विरोधात काँग्रेसने विविध राज्यांमध्ये आंदोलन आणि निदर्शने केलीत. मात्र, उद्धव ठाकरेंना हे फारसे रुचले नाही. " ‘इंडी’ आघाडीने एक मोठे आंदोलन सुरू केले पाहिजे. यासाठी सर्व पक्षांनी आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन जमिनीवर उतरले पाहिजे. प्रत्येक पक्षाने वेगवेगळे आंदोलन करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकट्याने आंदोलन करत असून, काँग्रेसची ही ‘एकला चलो रे’ची भूमिका योग्य नाही,” असे उद्धव ठाकरेंचे म्हणणे. यानिमित्ताने, एकजूट दाखवण्यासाठी दिल्लीत एकत्र आलेल्या ‘इंडी’ आघाडीची चांगलीच लक्तरे निघालीत.
वास्तविक, विरोधकांचे अंतर्गत मतभेद जनतेला नवीन नाहीत. विरोधकांनी एकत्रितपणे आंदोलन करण्याची रणनीती आखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वतंत्र आंदोलनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये असलेला असमन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला. थोडयात काय, तर तडजोडीसाठी एकत्र आलेल्या या आघाड्यांसमोर राष्ट्रीय पातळीवरील राजकीय भूमिका आणि राज्यनिहाय पक्षीय हितसंबंध यांच्यातील ताळमेळ साधण्याचे आव्हान तेव्हाही होते आणि यापुढेही राहणारच आहे, असेच दिसते.
एकीच्या नावाने...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाच्या निमित्ताने झालेले मतभेद आणि एकत्र निवडणुका लढवल्यानंतरही आलेले अपयश, यामुळे ‘महाविकास आघाडी’ची चांगलीच नाचक्की झाली. शिवाय, केवळ निवडणुका आल्या की, जागी होणारी ही आघाडी इतर वेळी मात्र, पुरती निर्ढावलेली असते. त्यामुळे केवळ अमावास्या-पौर्णिमेला होणार्या आघाडीच्या बैठकीत त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर येणारच. शिवाय, आंदोलनाचा मुद्दा कोणताही असो, त्यामागील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ समान राजकीय भूमिका पुरेशी ठरत नाही; तर परस्पर संवाद, विश्वास आणि नियोजनातील एकमतही आवश्यक असते. राज्यातील ‘महाविकास आघाडी’त वारंवार या तिन्ही गोष्टींचा अभाव जाणवतो.
दुसरी गोष्ट अशी की, काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र, वास्तविक महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने अचानक उद्धव ठाकरे यांचे बंधुप्रेम जागे झाल्यानंतर त्यांनीही ‘महाविकास आघाडी’शी फारकत घेतलीच होती. मग त्यावेळी ठाकरेंना ‘मविआ’च्या एकत्रित झेंड्याचा विसर पडला होता का? की, महापौरपदाच्या खुर्चीचा मोह झाला होता? ही संपूर्ण पार्श्वभूमी पाहता, वारंवार ठाकरेंशी युती करून तोंडघशी पडणार्या काँग्रेसने आता ‘एकला चलो रे’चा नारा दिलाच, तर त्यात चूक काय? खरेतर, ‘महाविकास आघाडी’ तयार झाल्यानंतर निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी उबाठा गटाला मतदान केल्याने उबाठा गटाला तुलनेने आघाडीचा अधिक लाभ झाला, असे राजकीय विश्लेषकांचे मत.
काँग्रेसच्या वाट्याला मात्र तडजोडीशिवाय दुसरे काहीही आले नाही. शिवाय, गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता, उबाठा गटाची निरुपयोगिता काँग्रेसच्या लक्षात आलीच असावी. अशा वेळी काँग्रेसने बाजूला राहण्याची भूमिका घेतल्यास त्यात नवल नाहीच. आता ‘इंडी’ आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात एकत्रित आंदोलनाची घोषणा केली असली, तरी राज्यातील काँग्रेस आणि उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. हे मतभेदच सध्या सर्वत्र चचचा विषय. त्यामुळे आता किमान आंदोलन होईपर्यंत तरी विरोधकांची मोट एकत्र राहावी म्हणजे मिळवले!