एखाद्या देशाच्या विकासाची खरी परीक्षा त्याच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीवर होत नाही; तर तो देश मर्यादित साधनांचा किती कल्पकतेने वापर करतो, यावर होते. पाण्याची कमतरता, वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याच्या आयातीवरील अवलंबित्व या तिहेरी आव्हानांसमोर उभ्या असलेल्या इजिप्तने आता वाळवंटाकडे आशेने पाहिले आहे.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी २०२६च्या गहूकापणीदरम्यान ‘न्यू डेल्टा’ या महाकाय कृषी प्रकल्पाचे उद्घाटन केले. नाईल नदीच्या खोर्यावर आधारित असलेल्या इजिप्तच्या पारंपरिक कृषी व्यवस्थेला विस्तार देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. पश्चिमेकडील विशाल वाळवंटात शेतीची नवी जमीन निर्माण करण्यासाठी उभारला जात असलेला ‘न्यू डेल्टा’ हा केवळ इजिप्तची कृत्रिम नदी किंवा सिंचन प्रकल्प नाही. पाणी पुनर्वापर, कृत्रिम जलवाहिनी, महाकाय पंपिंग व्यवस्था आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधांचा हा एकत्रित प्रयोग आहे. सुमारे २२ लाख फेडान म्हणजेच, ९ हजार २४० चौ. किमी जमीन शेतीखाली आणण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ इजिप्तची कृषी योजना न राहता, बदलत्या हवामानाच्या युगातील जल आणि अन्नसुरक्षेचा जागतिक प्रयोग ठरतो.
या प्रकल्पाचे सर्वांत लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे, त्याची जलव्यवस्था. पश्चिम नाईल डेल्टातील कृषी निचरा पाणी ‘एल-हम्माम’ जलप्रक्रिया प्रकल्पात नेले जाते. येथे दररोज तब्बल ७५ लाख घनमीटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणी सुमारे १७० किमी लांबीच्या कालव्याद्वारे आणि १३ पम्पिंग स्टेशन्सच्या मदतीने वाळवंटातील नव्या कृषी क्षेत्रात पोहोचवले जाते. त्यामुळे या व्यवस्थेला ‘कृत्रिम नदी’ असे संबोधले जात आहे. इथेच या प्रकल्पाची खरी अभियांत्रिकी किमया आणि सर्वांत मोठे आव्हान एकाच वेळी समोर येते. कमी उंचीच्या निचरा क्षेत्रातून पाणी उंच वाळवंटी पठारांवर नेण्यासाठी प्रचंड पम्पिंग शक्ती आवश्यक आहे. म्हणजेच, इजिप्त पाण्याचा पुनर्वापर करीत असला, तरी त्या पाण्याला शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागणार आहे. पाण्याची बचत आणि ऊर्जेचा खर्च यातील समतोल या प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशाचा निर्णायक घटक ठरणार आहे.
‘न्यू डेल्टा’साठी आतापर्यंत ८०० अब्ज इजिप्शियन पाऊंड म्हणजे, १५ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. रस्ते, धान्य साठवणूक सिलो, औद्योगिक क्षेत्रे आणि बंदरांशी जोडणारी वाहतूक व्यवस्था उभारली जात आहे. प्रकल्पातून दोन दशलक्षांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. गहू, मका आणि भाजीपाल्यासोबत ऑलिव्ह, अंजीर यांसारख्या निर्यातक्षम पिकांवरही भर दिला जात आहे.
या सगळ्यामागे एक मोठा आर्थिक विचार आहे; अन्न आयात करणार्या इजिप्तला कृषी उत्पादन आणि निर्यातीचा देश बनवणे. ‘कोविड-१९’ महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अन्नसुरक्षा ही केवळ कृषीची नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेची बाब बनली आहे. इजिप्तचा हा प्रयोग याच बदललेल्या वास्तवातून जन्माला आला आहे. मात्र, महाकाय प्रकल्प म्हणजे निर्विवाद यशाची हमी नव्हे. पर्यावरणतज्ज्ञांनी मोठ्या ऊर्जावापरासह पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता आणि भूजलावरील संभाव्य परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. लष्कराशी संबंधित संस्थांच्या प्रकल्पातील भूमिकेमुळे पारदर्शकता आणि सार्वजनिक खर्चाबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘न्यू डेल्टा’चे मूल्यमापन केवळ किती जमीन हिरवी झाली यावर नव्हे, तर किती खर्चात, किती पाणी आणि किती ऊर्जा वापरून ती शेती दीर्घकाळ टिकवता येते, यावर व्हायला हवे. तरीही, या प्रकल्पाचे महत्त्व कमी होत नाही.
‘न्यू डेल्टा’ यशस्वी ठरल्यास तो केवळ इजिप्तच्या नकाशावर हरित क्षेत्र वाढवणार नाही; तर सांडपाण्याचा पुनर्वापर, कृत्रिम जलवाहिन्या आणि आधुनिक सिंचन यांच्या माध्यमातून वाळवंटाला अन्न उत्पादनाच्या केंद्रात बदलण्याची नवी दिशा जगाला दाखवू शकतो.