‘वनयात्रे’तून आदिवासी जीवनाची ओळख! हरियाणातील ३२ जणांनी ११ गावांना दिली भेट

    02-Oct-2026   
 
Van Yatra Odisha Tribal Life
 
मुंबई (Van Yatra Odisha Tribal Life) : वनवासी कल्याण आश्रम, ओडिशाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय वनयात्रा नुकतीच संपन्न झाली. हरियाणातील आठ शहरांमधून आलेल्या ३२ जणांनी या यात्रेत ओडिशातील आदिवासी भागांना भेट देत तेथील समाजजीवन, संस्कृती, परंपरा आणि विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रतिनिधीमंडळात सहा महिलांचा समावेश होता. त्यामध्ये गुरुग्राम विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव आणि एका माजी कुलगुरूंसह सहा शिक्षणतज्ज्ञ, दोन डॉक्टर, एक वकील, ११ प्रमुख व्यावसायिक, नऊ सेवानिवृत्त कर्मचारी आणि चार समाजसेवक सहभागी झाले होते.
 
या यात्रेदरम्यान प्रतिनिधीमंडळाने गजपती, गंजाम आणि कंधमाल या जिल्ह्यांतील ११ आदिवासी गावांना भेट दिली. वनवासी कल्याण आश्रमाशी संबंधित विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शिक्षण, स्वावलंबन, कृषी विकास आणि आरोग्य क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. आदिवासी समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रथा जपण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती देण्यात आली. हरियाणातील कुरुक्षेत्र येथून ओडिशात आलेल्या प्रतिनिधींचे आदिवासी समाजबांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी मयूर नृत्य, वीर नृत्य, सौरा नृत्य आणि संकीर्तन यांसह विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचाही अनुभव घेतला. (Van Yatra Odisha Tribal Life)
 
प्रतिनिधींनी आदिवासी समाजासमोरील सामाजिक आणि आर्थिक आव्हाने, तसेच त्यांची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामुदायिक जीवनपद्धती आणि सामाजिक मूल्ये जवळून जाणून घेतली. आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल सहभागी सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या यात्रेमुळे आदिवासी समाजाची जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासोबतच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. (Van Yatra Odisha Tribal Life)
 
वनयात्रेचे नेतृत्व उत्तर क्षेत्राचे शहरी कार्यप्रमुख जयभगवान आणि राज्याध्यक्ष महेंद्र नरेश यांनी केले. ओडिशातील मानस पांडा यांच्यासह अन्य दोन सहभागीही प्रतिनिधी मंडळासोबत होते. सहक्षेत्र संघटनमंत्री विश्वामित्र, सह ग्रामविकास प्रमुख कोरा, दीपक आणि वीणा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या समन्वयासाठी सहकार्य केले. संघटनमंत्री कृष्णचंद्र भाटी यांनी यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार केले. या भेटीदरम्यान सहभागी सदस्यांनी आदिवासी समाजाशी अधिक दृढ सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याची तसेच शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची बांधिलकी व्यक्त केली. जयभगवान यांनी शहरी भागातील प्रतिनिधींना आदिवासी समाजातील शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. सहभागी सदस्यांनी वसतिगृह आणि मंदिरांच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याची तयारीही व्यक्त केली.
 
वनयात्रेच्या समारोपानंतर प्रतिनिधीमंडळाने पुरी येथे जाऊन श्री जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते हरियाणाकडे रवाना झाले. या यात्रेमुळे सहभागी सदस्यांना आदिवासी समाजाचे जीवन, संस्कृती आणि सामाजिक वास्तव अधिक जवळून समजून घेता आले. तसेच ओडिशा आणि हरियाणातील विविध समाजघटकांमध्ये परस्पर संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची संधी मिळाल्याने सामाजिक संबंध अधिक दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले. (Van Yatra Odisha Tribal Life)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर