NABKISAN ने भारतातील पहिले WASH-केंद्रित सोशल बॉण्ड्स सूचीबद्ध केले, १८० कोटी उभारले

    02-Oct-2026

 NABKISAN WASH Social Bond 2026
मुंबई (NABKISAN WASH Social Bond 2026) : नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ची उपकंपनी असलेल्या NABKISAN Finance Limited ने आज मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर भारतातील पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक (WASH) क्षेत्रासाठी विशेषतः समर्पित पहिले सोशल बॉण्ड सूचीबद्ध केले.
 
या सोशल बॉण्डच्या इश्यूला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो १.८ पट ओव्हरसबस्क्राइब झाला. त्यामुळे NABKISAN ने १८० कोटींची उभारणी केली . पाच वर्षांच्या या बॉण्डचा कूपन दर ८.१० टक्के असून, त्याची मुदत सप्टेंबर २०३१ मध्ये पूर्ण होणार आहे. या बॉण्डला CRISIL AAA (Stable) आणि CARE AAA (Stable) या देशांतर्गत सर्वोच्च क्रेडिट रेटिंग्ज देण्यात आल्या आहेत. (NABKISAN WASH Social Bond 2026)
 
या बॉण्डमधून उभारण्यात आलेला निधी ग्रामीण आणि सेवा-सुविधांपासून वंचित समुदायांमध्ये सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची उपलब्धता वाढवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य, उपजीविका आणि जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल.
 
या सूचीबद्धीकरण समारंभात NABARD, NABKISAN, Water.org, Trust Group आणि NSE च्या प्रतिनिधींनी मार्गदर्शनपर भाषणे केली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने घंटानाद करून समारंभाची सांगता करण्यात आली. (NABKISAN WASH Social Bond 2026)
 
नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. म्हणाले, “या WASH बॉण्डचे यशस्वी इश्यू हे विकासाच्या महत्त्वपूर्ण प्राधान्यक्रमांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणांच्या क्षमतेचे निदर्शक आहे. पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य, उपजीविका आणि जीवनमान अधिक सक्षम होते. अशा प्रकल्पांना वित्तपुरवठ्यासाठी सक्षम बनविण्यात तसेच व्यावसायिक आणि भांडवली बाजारातील व्यापक सहभाग आकर्षित करण्यात विकास संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे.” (NABKISAN WASH Social Bond 2026)
 
यावेळी बोलताना NABKISANचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) श्री. इम्मानुवेल गणेशन म्हणाले की, “हा WASH बॉण्ड विकास क्षेत्रांसाठी संसाधने उभारण्यासोबतच मोजता येण्याजोगा सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी भांडवली बाजारातील साधनांचा कशाप्रकारे प्रभावी वापर करता येतो, हे दर्शवितो. गुंतवणूकदारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी शाश्वत वित्तपुरवठा प्रभावी माध्यम ठरत असल्याच्या वाढत्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.”
 
या व्यवहाराला विविध भागधारकांचे सहकार्य लाभले. यामध्ये Water.org ने तांत्रिक सल्लागार आणि ज्ञान भागीदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय बाजारातील संस्था, सल्लागार, विश्वस्त आणि अरेंजर्स यांच्या योगदानामुळे या बॉण्डचे यशस्वी इश्यू आणि सूचीबद्धीकरण शक्य झाले. (NABKISAN WASH Social Bond 2026)
 
भारताच्या पहिल्या WASH-केंद्रित सोशल बॉण्डच्या सूचीबद्धीकरणामुळे, शाश्वत आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला पाठबळ देणाऱ्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपायांना प्रोत्साहन देण्याप्रती NABARD आणि NABKISANची बांधिलकी अधिक अधोरेखित झाली आहे. तसेच, देशातील शाश्वत वित्तपुरवठ्याच्या बाजारपेठेला अधिक व्यापक आणि सक्षम करण्यास यामुळे हातभार लागणार आहे. (NABKISAN WASH Social Bond 2026)
 
 




संबंधित मजकूर