कारागिरीचा सांगीतिक वारसा


Pranay Bhosale Traditional Instrument Making
 
इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि पारंपरिक कारागिरीचा संगम साधत दुर्मीळ होत चाललेल्या कला संवर्धनासाठी धडपडणार्‍या प्रणय भोसले यांच्याविषयी...
 
एखाद्या संगीत मैफिलीत सुरांची बरसात होते, ते सादर करणार्‍या कलाकाराच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळते आणि त्या कलाकाराच्या कलेचे कौतुकही होते. मात्र, त्या कलाकाराच्या सुरांना आकार देणार्‍या वाद्यनिर्मात्याच्या हातांकडे मात्र अनेकदा आपले सपशेल दुर्लक्षच होते. वाद्याच्या प्रत्येक भागामागे दडलेले कौशल्य, त्याच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत आणि पिढ्यान्पिढ्या त्यांनी जपलेले वारशाचे ज्ञान यांची फारशी दखलच समाजाकडून घेतली जात नाही. हीच खंत मनात ठेवून, मुंबईतील प्रणय भोसले पारंपरिक वाद्यनिर्मितीचा त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तीन पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा केवळ टिकवूनच न ठेवता, तिच्यामागील इतिहास आणि कारागिरी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
मुंबईत स्थित प्रणयच्या कुटुंबाचा वाद्यनिर्मितीचा वारसा, त्यांचे पणजोबा नारायणराव भोसले यांच्यापासून सुरू होतो. ते एक कुशल बीनवादक होते, शिवाय तितकेच कुशल बीननिर्मातेही होते. नारायणराव भोसले यांनी राजाब अली खान साहेबांकडून, ख्याल गायकी परंपरेचे शिक्षण घेतले होते. संगीताची जाण आणि वाद्यनिर्मितीतील कौशल्य यांच्या बळावरच त्यांनी, सोलापूर येथे त्यांच्या कुटुंबाचा पहिला वाद्यनिर्मितीचा कारखाना सुरू केला.
 
या कलेमुळेच त्या काळात साक्षात गंधर्व देवधर आणि बालगंधर्व यांसारख्या नामवंत कलाकारांशीही, त्यांच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. या कलाकारांना वाद्ये पुरवण्याचे कामही या भोसले कुटुंबाने केले. पुढे प्रणय यांचे आजोबा कालिदासराव यांनीही हाच वारसा अधिक समृद्ध केला. बीन आणि तानपुरा यांसारखी वाद्ये तयार करण्याबरोबरच, ते स्वतः उत्तम तबलावादक आणि पट्टीचे गायकही होते. त्यामुळे या भोसले कुटुंबासाठी वाद्यनिर्मिती ही केवळ उपजीविकेची बाब राहिली नाही, तर संगीत, कला आणि पारंपरिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारीच ठरली.
 
पुढील काळात प्रणय यांच्या वडिलांनी मुंबईत स्थलांतर करून, स्वतंत्र वर्कशॉप घेण्यास सुरूवात केली. अनेक नामवंत कलाकारांसोबत काम करताना त्यांनी, घराण्याच्या या परंपरेला नवी दिशा देण्याचे काम केले. विशेषतः पंडित मनोहर चिमुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संवादिनी या वाद्याच्या विकासासाठी, भोसले कुटुंबाने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुमारे ३० संवादिनी तयार करण्यात आल्या. आज प्रणय आणि त्यांचा भाऊ याच परंपरेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. बदलती बाजारपेठ, पारंपरिक कारागिरीसमोरील आर्थिक आव्हाने आणि ‘कोविड’ काळात संगीत क्षेत्राला बसलेला फटका अशा अनेक अडचणींचा सामना करत, त्यांनी आपले काम इमानेइतबारे सुरूच ठेवले आहे.
 
या दोन भोसले बंधुंनी मिळून आतापर्यंत, ५०० हून अधिक हार्मोनियम अर्थात संवादिनीला नवे रुप दिले असून, आता तंतुवाद्यांच्या नवनिर्मितीकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. काळाच्या ओघात हरवत चाललेल्या वाद्यनिर्मितीच्या पद्धती आणि कौशल्यांचा शोध घेऊन, त्यांचे जतन करण्याचा प्रणय यांचा सतत प्रयत्न असतो. प्रणय यांचा हा प्रयत्न सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचाच ठरतो.
या कामाला त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचीही जोड लाभले आहे. प्रणयने मुंबईतील साठ्ये महाविद्यालयातून, ‘इतिहास’ विषयात पदवी घेतली आहे. सध्या तो मुंबई विद्यापीठातून पुरातत्त्वशास्त्राचे शिक्षण घेत असून, कला इतिहास हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. गेल्या वर्षी त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागासोबत, वसई आणि रायगड किल्ल्यांवरील उत्खननकार्यात ‘इंटर्न’ म्हणूनही सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील भित्तिचित्रांच्या परंपरांवरही ते संशोधन करत असून, इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासामुळे वाद्यांकडे पाहण्याची प्रणय यांची दृष्टी अधिकच व्यापक झाली आहे. एखादे वाद्य हे केवळ संगीताचेच साधन नसून ते त्या काळातील तंत्रज्ञान, समाजजीवन, समाजाची कलात्मक अभिरुची आणि कारागिरांच्या ज्ञानाचेही साक्षीदार असते, असे ते मानतात.
 
"ही दुर्मीळ होत चाललेली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, हीच माझी इच्छा आहे,” अशी भावना, प्रणय व्यक्त करतात. त्यांच्या या भूमिकेत प्रसिद्धीपेक्षा, या प्राचीन परंपरेच्या जतनाचीच तळमळ अधिक असल्याचे दिसते. पारंपरिक कलांना नव्या पिढीशी जोडणे, त्यामागील ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करणे आणि कारागिरांच्या योगदानाला योग्य ओळख मिळवून देणे, हीच आजची खर्‍या अर्थाने गरज आहे.
 
तीन पिढ्यांच्या अनुभवाला आधुनिक शिक्षणाची जोड देत, प्रणय भोसले या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रवासातून आपल्याला एक महत्त्वाची जाणीव होते की, सुरांना जशी एका कलाकाराची गरज असते, तशीच आणि तितकीच त्या सुरांना आकार देणार्‍या कारागिरांच्या कौशल्याचीही असते. या अनामिक हातांना योग्य मान्यता मिळाली, तरच भारतीय संगीतपरंपरेतील अनेक दुर्मीळ कलांना नवसंजीवनी मिळू शकेल. भारतीय संगीताच्या अजरामर वारशाच्या संवर्धाचे कार्य करणार्‍या प्रणय भोसले यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर