अलीकडे डिजिटल युगात पत्र हा प्रकार कमीच झाला आहे. मात्र, एकेकाळी या पत्राचे महत्त्व फार मोठे होते. मात्र, हे पत्र फक्त संदेशवहनाचे माध्यमच नव्हते, तर यातून अनेक धावपटूंचाही जन्म झाला. आजही थोड्या वेगळ्या रुपाने ती परंपरा पोस्ट खात्याने जपली आहे. पोस्टाच्या क्रीडापटूनिर्मितीचा आढावा घेणारा हा लेख...
हल्ली हातात मोबाईल आल्यापासून अनेक घरांत पोस्टकार्ड, ‘इनलॅण्ड’ लेटर्स म्हणजेच अंतर्देशीय पत्र अजिबातच दिसत नाहीत. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच काही ‘इनलॅण्ड लेटर्स’, पोस्टकार्ड, काही पोस्टाची तिकिटं मुद्दाम आणली जात. आता हे तर सोडाच, पण आज आपण कोणास पत्र पाठवायचं ठरवलं, तरी त्याचा निवासी पत्ताच आपल्याकडे मिळत नाही. पूर्वी प्रत्येक घरी एक ‘डायरी’ असे. साधारणतः लाल किंवा काळ्या रंगाच्या डायरीत, नात्या-गोत्यातील अनेकांचे संपूर्ण नाव आणि पत्ते असत. आज मात्र ज्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा, त्यांचा मोबाईल नंबर असतो; पण पत्याचा पत्ताच नसतो. मग आपण त्याला मेसेज पाठवून, पत्ता मागवतो. मग प्रश्न असतो की, ते पत्र टाकायला पत्राची पेटी कुठे असेल. ती पत्रपेटी आपण महत्प्रयासाने शोधतो आणि ते पत्र आपण पोस्ट करतो. ते पोस्ट कधी घेऊन जाणार, त्याची वेळही आपण बघून ठेवतो. मोबाईलमुळे हे सगळेच प्रश्न आता संपले आहेत. पत्र लिहिणं कमी झालंय, तसंच पत्र येणंही.
सुप्रसिद्ध वक्त्या, निवेदिका, संस्कृतज्ञ, लेखिका आणि अभ्यासक असलेल्या डॉ. धनश्री लेलेंनी, त्यांच्या एका भाषणात सांगितलेली गोष्ट मला यासंदर्भात आठवते, ती अशी -
वो जमाने की बात हैं की तब कागज पर सब भावनाएँ महफूज रहती|
अब उम्रभर की याद एक उंगली से डिलिट हो जाती हैं॥
जुन्या काळात लोकं आपल्या भावना, प्रेम आणि आठवणी पत्रांवर किंवा डायर्यांवर, कागदावर उतरवत. कागदावरच्या त्या भावना वर्षांनुवर्षे, पिढ्यान्पिढ्या जतन करून ठेवता येत, ज्यांमध्ये एक जिवंतपणा आणि चिरंतन टिकण्याची भावना असे. आज डिजिटल युगात सर्व आठवणी फोटो, मेसेज मोबाईल किंवा गॅझेट्समध्ये साठवले जातात. तंत्रज्ञानाने आठवणी साठवणे सोपे केले असले, तरी स्क्रीनवरच्या एका लिकने संपूर्ण आयुष्यभराचा साठाच, जिव्हाळा आणि आठवणी सेकंदात कायमच्या पुसून टाकता येतो. थोडक्यात, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वेग आला असला, तरी नातेसंबंधांमधील आणि आठवणींमधील शाश्वतता कमी झाली. डिजिटल जगतातील सगळेच आता एका क्षणात नष्ट होण्याचा धोका आहे, हाच भाव त्या काव्यातून व्यक्त झाला आहे. पोस्टाने आलेल्या पत्राने, कितीतरी गोष्टी त्यामुळे स्मरणात राहायच्या.
पोस्टाद्वारे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची उदाहरणे आपल्याला स्मरत असतील. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण धनश्री लेलेंनीच एका ठिकाणी दिलं. अनेक पत्रांतून कविता लिहून सावरकरांनी पाठवल्याची उदाहरणे आहेत. रवींद्रनाथांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तेव्हा अंदमानातून त्यांच्या अभिनंदनपर पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, "मी कोण आहे, तर या स्वातंत्र्य देवतेचा रथ ओढला जावा, म्हणून त्यातला कोळसा आहे आणि तुम्ही कोण आहात, तर या स्वातंत्र्य देवतेच्या शिरावरती विराजमान झालेलं गुलाबपुष्प आहात.”असेच एक उदाहरण म्हणजे गणपतराव नलावडे हे सावरकरांचे सहकारी आणि हिंदू महासभेचे वरिष्ठ नेते. ते पुण्याचे नगरसेवक आणि पुढे पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष व ‘मेयर’ निवडले गेले होते. जेव्हा पुण्याचे ‘मेयर’ म्हणून नलावडे यांची निवड झाल्याची बातमी सावरकरांना समजली, तेव्हा सावरकरांनी त्यांना लगेचच अभिनंदनपर पाठवले नव्हते. सावरकरांनी आपल्याला पत्र पाठवलं नाही, म्हणून नलावडे दुःखी झाले. पण, एकदाचं ते पत्र आल्यावर मात्र नलावडे यांना आनंद झाला. कारण महाराष्ट्राला त्या पत्राने महापौर हा शब्द दिला होता. त्या पत्रात म्हटलं होतं की, "पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व. ‘मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा, याचाच विचार करत होतो. तो शब्द मिळाला, ‘महापौर’. ‘महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. पुण्याची धुरा आता समर्थ हातांत आली आहे म्हणायची. तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच.” त्या पत्राचा तत्काळ झालेला परिणाम म्हणजे, गणपतराव नलावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता, आपल्या कार्यालयाबाहेरची इंग्रजी ‘मेयर’ असलेली पाटी काढून, तिथे अभिमानाने ‘महापौर’ अशी नवी पाटी लावण्याचे आदेश दिले. अंदमानमधील कैद्यांवर ब्रिटिशांचे अत्यंत कडक निर्बंध असत. कैद्याला वर्षातून किंवा काही वर्षांतून, एकच पत्र लिहिण्याची परवानगी असे. स्वतंत्रपणे सर्वांना पत्र लिहिणे शक्य नसल्याने, सावरकर त्यांच्या वहिनींना पत्र लिहीत, जेणेकरून त्या पत्राद्वारे संपूर्ण कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला सावरकरांचे विचार आणि ख्यालीखुशाली समजे.
त्या टपालसेवेतील त्या ‘पोस्टमन’ला, ‘धावपटू’नेच प्रसिद्धी दिल्याचा क्रीडाइतिहास आहे. ‘पोस्टमन’ किंवा ‘मेल रनर’ या नोकरीतून, ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू होण्यामागे शारीरिक क्षमता, कठीण सराव, आणि क्रीडाविश्वाचा एक इतिहास आहे. या प्रवासाचा मागोवा घेणारे महत्त्वाचे पैलू आणि उदाहरणे खालीलप्रमाणे:
पूर्वीच्या काळी जेव्हा वाहतुकीची साधने नव्हती, तेव्हा ‘मेल रनर’ किंवा ‘डाक हरकारा’ यांना दररोज मैलोंमैल अंतरावर पत्रे आणि पार्सल पोहोचवावे लागे. पाठीवर पत्रांची थैली घेऊन डोंगर-दर्या, कच्चे रस्ते आणि प्रतिकूल हवामानातून तासन्तास पळत राहिल्याने त्यांच्या फुप्फुसांची क्षमता आणि पाय अत्यंत बळकट होत. ते कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय दररोज मॅरेथॉन किंवा अल्ट्रा-मॅरेथॉन धावत.
ऑलिम्पिक इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध पोस्टमन धावपटू, यूबाचे फेलिस कार्व्हाहाल हे आहेत. यूबामध्ये टपाल वितरणाचे काम करताना, दररोज कित्येक किमी धावल्यामुळे त्यांची क्षमता प्रचंड वाढली. ब्रिटिश पोस्टल सर्व्हिसमध्ये काम करणारे अनेक मेल रनर्स, पुढे ऑलिम्पिक संघात निवडले जात. उदा. बर्ट नॉरिस यांनी १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये, मॅरेथॉन स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले. टपाल विभागात धावण्याच्या कामानेच, त्यांच्यातील धावपटूला घडवले. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ‘डाक हरकारा’ ही एक अत्यंत जोखीमयुक्त आणि धाडसी नोकरी मानली जाई. घनदाट जंगले आणि पर्वतीय भागांतून धावत पत्रे पोहोचवण्याच्या या परंपरेने, भारतातील अनेक ग्रामीण खेळाडूंनाही पायाभूत बळ मिळे. पुढे भारतीय टपाल विभाग आणि सैन्यातील टपाल सेवेत काम करणार्या अनेक कर्मचार्यांनी, त्यांच्या नैसर्गिक धावण्याच्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धाही गाजवल्या. स्थानिक व विभागीय क्रीडा स्पर्धांमध्येही, पोस्टमनच्या वेगाची आणि ‘स्टॅमिना’ची दखल घेतली जाई. मेल रनर्सकडे नैसर्गिक सहनशक्ती उपजातच असे. प्रशिक्षकांनी त्यांना केवळ धावण्याचे शास्त्रीय तंत्र, गती आणि आहाराचे नियम शिकवले. टपाल विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, क्रीडा कोटा आणि सरावासाठी विशेष सवलती दिल्या जाऊ लागल्या. यामुळे व्यावसायिक स्तरावर पोहोचणे त्यांना शय झाले. थोडक्यात, मेल रनर्ससाठी धावणे हे सुरुवातीला पोटापाण्याचे आणि कर्तव्याचे साधन होते. परंतु, त्यातून कमावलेल्या अथांग सहनशक्तीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी, क्रीडाविश्वातील ऑलिम्पिक गाठल्याचा इतिहास आहे.
‘क्रीडाविश्वा’तील हा लेख मुद्दामच ‘लाल पेटी’ला समर्पित आहे; कारण क्रीडाविश्वाचं आणि पोस्टमनचं नात ऐतिहासिकच. दि. ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडच्या बर्न येथे, २२ देशांनी एका करारावर स्वाक्षरी करून ‘सार्वत्रिक टपाल संघा’ची स्थापना केली. येथूनच जागतिक टपाल दिन उत्सवाची सुरुवात झाली. भारत दि. १ जुलै १८७६ रोजी ‘सार्वत्रिक टपाल संघा’चा सदस्य झाला. भारतात टपाल प्रणालीची स्थापना, सर्वप्रथम १७६६ मध्ये झाली. आज हा विभाग मोठ्या संख्येने गावे आणि शहरांमध्ये सेवा पुरवतो. भारतात दि. १ ऑक्टोबर १८५४ रोजी याची एक विभाग म्हणून स्थापना झाली. भारतीय टपाल विभाग दि. ९ ते दि. १४ ऑक्टोबरदरम्यान, ‘टपाल सप्ताह’ साजरा करतो. भारतातील पहिले टपाल कार्यालय १७७४ मध्ये कोलकत्यात उघडण्यात आले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश कर्मचार्यांच्या सेवेचा गौरव करणे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातील टपालाच्या भूमिकेबद्दल, तसेच जागतिक सर्वांगीण विकासातील त्याच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा आहे.
मेल रनरने देशाला धावपटू देऊन, टपाल खात्यातील क्रीडानैपुण्य जोपासलं. टपाल कर्मचार्यांमधील क्रीडागुण व शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, ‘पोस्टल स्पोर्ट्स बोर्ड’च्या माध्यमातून दरवर्षी ’अखिल भारतीय टपाल क्रीडा स्पर्धां’चे आयाजन होते. टपाल विभागाकडून दरवर्षी एक अधिकृत क्रीडा दिनदर्शिकाही प्रसिद्ध केली जाते. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या पोस्टल सर्कल्समधील स्पर्धांची माहिती असते. या स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, अॅथलेटिस, सायकलिंग, टेबल टेनिस, पॉवरलिफ्टिंग आणि कुस्तीसारख्या अनेक खेळांचा समावेश असतो. तसेच दिव्यांग कर्मचार्यांसाठी पॅरा-बॅडमिंटन, पॅरा-चेस आणि कॅरम स्पर्धांचेही आयोजन होते. खेळांसोबतच कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, ‘अखिल भारतीय टपाल सांस्कृतिक महोत्सवा’चेही आयोजन केले जाते.
उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय टपाल विभागात ‘स्पोर्ट्स कोटा’अंतर्गत, दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट आणि पोस्टमन इत्यादी पदांची भरती केली जाते. जागतिक स्तरावर ’युनिव्हर्सल पोस्टल युनियन’अंतर्गत थेट ऑलिम्पिकच्या धर्तीवर अधिकृत जागतिक स्पर्धा होत नसली, तरी विविध देशांच्या टपाल प्रशासनांमध्ये परस्पर मैत्रीपूर्ण व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची परंपराही मोठी आहे उदा. अमेरिका आणि कॅनडादरम्यान दरवर्षी होणार्या ‘आंतरराष्ट्रीय पोस्टल हॉकी स्पर्धा’ किंवा इतर देशांमधील पोस्टल युनियनचे सामने होत असतात.
भारतीय टपाल विभागात अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू रुजू आहेत, जे भारतासाठी जागतिक स्पर्धेत पदक जिंकतात. भारतीय टपाल विभागाने भारताला अनेक दिग्गज खेळाडू दिले. टपाल विभागाने देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना रोजगाराची हमी देऊन, हक्काचे व्यासपीठ दिले. या लेखाचा समारोप करताना शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं की, मोबाईलची रेंज एका क्षणात जाऊ शकते, पण टपाल धावपटूंनी (मेल रनर) पिढ्यान्पिढ्या चालवलेली आणि लाल पेटीने जपलेली विश्वासाची रेंज कधीच जात नाही. आज तंत्रज्ञान थांबले, तरी टपालाची तांबडी पेटी आजही जिद्दीने उभी आहे. जिथे मोबाईलचे नेटवर्क अपुरे पडते, तिथे लाल पेटीत पडलेले कागदावरचे शब्द आणि ते पोहोचवणारा पोस्टमनच नाती जोडण्याचे काम चोख बजावतोय. डिजिटल आठवणी सेकंदात पुसल्या जातील, पण लाल पेटीने जतन केलेल्या आणि पत्रातून आलेल्या भावना मात्र, आयुष्यभरासाठी काळजात कायमच्या ‘सेव्ह’ राहतात. अशा त्या गोल लाल पेटीला आपल्या सार्या क्रीडाप्रेमींचा मनापासून सलाम!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४