धाराशिवचा वाघ पोहोचला नायगाव मयूर अभयारण्यात; पाच जिल्ह्यांत भ्रमंती

    19-Oct-2026

Dharashiv Tiger

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विदर्भातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात जन्मलेला आणि धाराशिव जिल्ह्यातील येडशी-रामलिंग अभयारण्याच्या परिसरामुळे ‘रामलिंग’ अशी ओळख मिळालेला नर वाघ आता बीड जिल्ह्याजवळील नायगाव मयूर अभयारण्यात दाखल झाला आहे (Dharashiv Tiger). गेल्या दोन वर्षांत धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील वनक्षेत्रे आणि सीमावर्ती भागांत त्याचा वावर नोंदवण्यात आला आहे (Dharashiv Tiger). वाघाच्या या भ्रमंतीमुळे मराठवाड्यातील वन्यजीवांच्या हालचालींसाठी सुरक्षित अधिवास आणि परस्परांना जोडणारे नैसर्गिक भ्रमणमार्ग उपलब्ध असण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (Dharashiv Tiger)

 

डिसेंबर २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील येडशी वनपरिक्षेत्रात एका नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले होते. वन विभागाने हे छायाचित्र भारतीय वन्यजीव संस्थेकडे (डब्ल्यूआयआय) तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर हा वाघ २०२२ मध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात जन्मलेला असल्याचे स्पष्ट झाले. टी-२२ या सांकेतिक क्रमांकाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. आईपासून विलग झाल्यानंतर स्वतःची हद्द निर्माण करण्यासाठी या वाघाने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरपासून धाराशिवपर्यंत सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास केला होता. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या काळात त्याचा वावर बार्शी, येडशी आणि तुळजापूरच्या परिसरात होता. वन विभागाने त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची मोहीम आखली होती. मात्र, तो पिंजऱ्यात अडकला नाही.

 

त्यानंतर येडशीपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील लातूर जिल्ह्यातील औसा परिसरात त्याचा वावर आढळला. पुढे तो पुन्हा धाराशिव जिल्ह्यात परतला आणि तेथून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडपर्यंत पोहोचला. सप्टेंबर २०२५ पर्यंत त्याच्या हालचाली तुळजापूरपर्यंत नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही काळ तो वन विभागाच्या निरीक्षणातून बाहेर होता. ऑगस्ट २०२६ मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात त्याच्या पायांचे ठसे आढळले. देवळाली परिसरात त्याने एका पाळीव जनावराची शिकार केल्याचेही समोर आले. तेथे लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र टिपण्यात आले. त्यानंतर हा वाघ पुन्हा येडशी-रामलिंग अभयारण्याच्या परिसरात परतल्याचे निदर्शनास आले. आता त्याचे छायाचित्र नायगाव मयूर अभयारण्यात टिपण्यात आले असून, तेथे त्याने म्हशीची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या नोंदीमुळे त्याच्या भ्रमंतीचा आवाका पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.


रामलिंग वाघाच्या भ्रमंतीमुळे मराठवाड्यातील वन्यजीवांच्या हालचालींचा आणि त्यांच्या अधिवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जंगलांमधील नैसर्गिक अधिवासांचे तुकडे पडणे, रस्ते आणि रेल्वेमार्ग यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे निर्माण होणारे अडथळे, तसेच मानवी वस्त्यांशी वाढणारा संपर्क यांमुळे वन्यजीवांच्या स्थलांतरासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, बोधडी वनपरिक्षेत्रातील मदनापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एका मादी वाघाचा मृत्यू झाल्याची घटना या धोक्याची जाणीव करून देते. ही मादी पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातून आली होती.





संबंधित मजकूर