मुंबई, : (Agri Welfare Portal)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि शेतकरी कल्याणाच्या धोरणाला पुढे नेत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकासमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवार, दि.१९ ऑक्टोबर रोजी अद्ययावत ‘अॅग्री वेल्फेअर पोर्टल’चे लोकार्पण केले. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध कृषी योजना, आर्थिक मदत, अनुदाने आणि शेतीविषयक विश्वसनीय माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून मध्यस्थांवरील अवलंबित्वही घटणार आहे.
पोर्टलच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, सरकार शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सदैव उपलब्ध असावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्ट संकल्पना आहे. तंत्रज्ञानाचा खरा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा त्याचा लाभ शेतापर्यंत आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचतो. या नव्या पोर्टलमुळे विविध सरकारी संकेतस्थळांवर माहिती शोधण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार नाही.(Agri Welfare Portal)
या पोर्टलवर पीएम-किसान, अॅग्रीस्टॅक आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. पात्रता तपासणी, ऑनलाइन अर्ज आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) सुविधांमुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
पोर्टलवरील माहिती अचूक आणि नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अपूर्ण किंवा कालबाह्य माहितीमुळे नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच अल्पभूधारक आणि कमी औपचारिक शिक्षण असलेल्या शेतकऱ्यांनाही हे पोर्टल सहज वापरता यावे, यासाठी भाषा आणि प्रक्रिया सोप्या ठेवण्यावर त्यांनी भर दिला.(Agri Welfare Portal)
डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना हवामान, शास्त्रीय शेतीपद्धती, बियाणे व खतांची उपलब्धता आणि कृषीमालाचे बाजारभाव यांचीही माहिती मिळणार आहे.
ग्रामीण भागातील मर्यादित इंटरनेट सुविधांचा विचार करून पोर्टल हलके आणि वापरण्यास सुलभ बनविण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनाही त्याचा वापर करता यावा, यासाठी स्क्रीन रीडर आणि सुलभ नेव्हिगेशनसारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी सचिव अतिश चंद्रा, अतिरिक्त सचिव प्रमोद मेहेरडा तसेच कृषी मंत्रालय आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.(Agri Welfare Portal)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.