‘अराजकता सोडा, लोकशाहीचा स्वीकार करा’ अभाविपचे आवाहन; लखनऊमध्ये भव्य विद्यार्थी हुंकार रॅली

    19-Oct-2026   
 
 
ABVP Student Hunkar Rally
 
मुंबई (ABVP Student Hunkar Rally) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘अराजकता सोडा, लोकशाहीचा स्वीकार करा’ या आवाहनानुसार लखनऊ येथे नुकतेच भव्य विद्यार्थी हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लखनऊ विद्यापीठापासून हजरतगंज येथील गांधी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो विद्यार्थी आणि अभाविप कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकशाही आणि लोकशाही संस्थांना कमकुवत करण्याच्या प्रयत्नांविरोधात एकजुटीचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. (ABVP Student Hunkar Rally)
 
या रॅलीला अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अभय प्रताप सिंह, काशी प्रांताचे प्रांतमंत्री शिवम सिंह, गोरक्ष प्रांताचे प्रांतमंत्री मंगलम गुप्ता, अवध प्रांताचे प्रांतमंत्री अर्पण कुशवाहा आणि कानपूर प्रांताचे प्रांतमंत्री दिनेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीच्या माध्यमातून भारतात सत्तापरिवर्तनाचा अधिकार केवळ जनतेकडेच आहे आणि लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची अराजकता अथवा दबावतंत्राचे राजकारण स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला. निवडणुकीसंदर्भातील तक्रारींचे निराकरण पुराव्यांच्या आधारे आणि घटनात्मक प्रक्रियेतून झाले पाहिजे. घटनात्मक संस्थांवर दबाव आणून किंवा त्यांच्याविषयी अविश्वास निर्माण करून नव्हे, अशी भूमिका अभाविपने मांडली. (ABVP Student Hunkar Rally)
 
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे, जमावशाहीचा नाही. जनतेच्या मतांमधून सरकारे स्थापन होतात आणि बदलतात; रस्त्यांवरील शक्तिप्रदर्शनातून नव्हे. बांगलादेश आणि नेपाळमधील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन भारतातही अराजकतेच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन घडवून आणण्याचे राजकारण स्वीकारार्ह नाही. बाह्य शक्ती आणि ‘डीप स्टेट’च्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, भारताच्या राजकीय दिशेचे निर्धारण भारतीय नागरिकच करतील, असे अभाविपने म्हटले आहे. (ABVP Student Hunkar Rally)
 
एसआयआर ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यातील अनियमिततेचे आरोप पुराव्यांसह घटनात्मक व्यासपीठांवर मांडले पाहिजेत. केरळ, पंजाब आणि तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये एसआयआरबाबत राजकीय पक्षांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या दुहेरी मापदंडांविषयी प्रश्न उपस्थित होतात, असे अभाविपने नमूद केले. संस्थांवर दबाव आणणे आणि राजकीय आंदोलनांच्या माध्यमातून विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करणे अनुचित असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. (ABVP Student Hunkar Rally)
 
अभाविपने देशातील तरुणांना घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच अराजकता आणि जमावशाहीच्या राजकारणाला लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे आवाहनही संघटनेने केले. (ABVP Student Hunkar Rally)
 
लोकशाही, मतदानाचा अधिकार आणि घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य सर्वोच्च : अभय प्रताप सिंह
 
अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अभय प्रताप सिंह म्हणाले, “भारताची लोकशाही जनतेचा विश्वास, मतदानाचा अधिकार आणि घटनात्मक संस्थांच्या स्वातंत्र्यावर आधारित आहे. देशात सत्तापरिवर्तनाचा अधिकार केवळ जनतेकडे आहे. जनता आपल्या मतदानाच्या अधिकारातून सरकारे निवडते आणि बदलते. लोकशाहीत राजकीय मतभेदांचे स्वागत आहे; मात्र जमावाचा दबाव, अराजकता आणि घटनात्मक संस्थांना लक्ष्य करून सत्तापरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास त्यासंदर्भातील पुरावे सादर करून घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांसारख्या संस्थांच्या विश्वासार्हतेवर राजकीय स्वार्थापोटी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन आहे.” (ABVP Student Hunkar Rally)
 
भारताची लोकशाही मजबूत; सरकारांचे भवितव्य जनता ठरवते
 
बांगलादेश आणि नेपाळमधील घडामोडींनी प्रेरित होऊन भारतातही अराजकतेच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन घडवून आणण्याची कल्पना करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भारताची लोकशाही मजबूत आहे आणि येथे सरकारांचे भवितव्य जनता ठरवते, असे अभय प्रताप सिंह म्हणाले. दिल्ली विद्यापीठ, उत्तराखंड, केरळ आणि ओडिशा येथील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये अभाविपला मिळालेले यश हे विद्यार्थी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवतात आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेच्या पाठीशी उभे आहेत, याचे प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले. लखनऊ येथे आयोजित विद्यार्थी हुंकार रॅलीतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेबाबत असलेली त्यांची बांधिलकी दर्शवतो, असेही ते म्हणाले. (ABVP Student Hunkar Rally)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर