_202508301213409686_H@@IGHT_350_W@@IDTH_696_202610191814509692_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - उजनी जलाशयातील स्थानिक माशांच्या जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक माशांविरोधात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) व्यापक मोहीम हाती घेतली आहे (Ujani Reservoir). ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत जलाशयातून १७८ टनांहून अधिक आक्रमक माशांना हटविण्यात आले आहे (Ujani Reservoir). यामध्ये सकरमाउथ कॅटफिश (Pterygoplichthys प्रजाती) आणि आफ्रिकन कॅटफिश (Clarias gariepinus) या प्रजातींचा समावेश आहे (Ujani Reservoir). आक्रमक माशांचे नियंत्रण करण्याबरोबरच उजनी जलाशयातील स्थानिक मत्स्यसंपत्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ४५ लाख देशी माशांची मत्स्यबीजे सोडण्यात आली असून, २१ हजारांहून अधिक स्थानिक जलवनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. (Ujani Reservoir)
उजनी जलाशयात वाढलेल्या आक्रमक माशांमुळे स्थानिक माशांच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे. सकरमाउथ कॅटफिश ही प्रजाती प्रामुख्याने तळाशी राहणारी असून, तिच्या वाढत्या संख्येमुळे जलाशयातील स्थानिक जैविक समुदायांवर दबाव निर्माण होऊ शकतो. आफ्रिकन कॅटफिश ही भक्षक प्रजाती असून, ती इतर माशांवर उपजीविका करते. अशा आक्रमक प्रजातींचा प्रसार झाल्यास स्थानिक माशांशी अन्न आणि अधिवासासाठी स्पर्धा वाढण्याची, तसेच स्थानिक जैवविविधतेचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. उजनी जलाशयातील पर्यावरणीय ऱ्हासाला आक्रमक प्रजातींबरोबरच वाढते जलप्रदूषण आणि अतिशय लहान जाळ्यांचा वापर करून केली जाणारी मासेमारीही कारणीभूत ठरली आहे. या दबावांमुळे जलाशयातील ३० ते ३५ स्थानिक माशांच्या प्रजाती स्थानिक स्तरावर नामशेष झाल्याचे बीएनएचएसने नमूद केले आहे. त्यामुळे आक्रमक माशांचे नियंत्रण ही केवळ मत्स्यव्यवसायाशी संबंधित बाब नसून जलाशयाच्या संपूर्ण परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनातील महत्त्वाची पायरी ठरत आहे.
आक्रमक माशांचे निर्मूलन करण्याबरोबरच देशी माशांच्या घटलेल्या संख्येत वाढ करण्यासाठी बीएनएचएसने संवर्धनात्मक प्रजनन कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत १२ स्थानिक, प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त माशांच्या प्रजातींच्या प्रजननावर काम करण्यात आले. पश्चिम घाटातील हिरण्यकेशी, कोयना आणि पंचगंगा या नद्यांमधून मूळ प्रजातींचे प्रजननक्षम मासे मिळवून त्यांची नियंत्रित वातावरणात पैदास करण्यात आली. या मोहिमेत कवडस (Labeo kawrus), नुकता (Bangana nukta) आणि बोबरी (Labeo kontius) या दुर्मीळ देशी माशांच्या प्रजातींच्या २२ लाखांहून अधिक मत्स्यबीजांचा समावेश आहे. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने दख्खन महाशीरची १० लाख मत्स्यबीजे उपलब्ध करण्यात आली, तर रोहू, कटला आणि मृगळ या प्रमुख कार्प प्रजातींचीही मत्स्यबीजे सोडण्यात आली. या एकत्रित प्रयत्नांतून उजनी जलाशयातील देशी माशांची संख्या वाढविणे आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील स्थानिक जैविक वारसा पुन्हा प्रस्थापित करणे हा उद्देश आहे.