सुरांतून आनंद पेरणारी स्वर‘मानसी’

    19-Oct-2026
  
Mansi Kelkar-Tambe
 
आईच्या सांगीतिक वारशाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, ‘स्वरमानस’च्या माध्यमातून आनंदी समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील असणार्‍या मानसी केळकर-तांबे यांच्याविषयी...
 
कला माणसाला जगणे शिकवते. ती सुख-दुःख, प्रेम, असंख्य भावनिक कल्लोळांतून हळूवार सावरते. मग ती कुंचल्यातून उतरणारी चित्रकला असो, शब्दांतून अभिव्यक्त होणारे साहित्य असो, वा थेट हृदयाला हात घालणारे संगीत. विविध रूपांतून ती प्रकटते. कलेतून होणारी निष्पत्ती एकच, आनंद! गेली २५ वर्षे ‘कोणीही गाऊ शकतं,’ हे ब्रीद घेऊन सुरांच्या जोरावर लोकांच्या आयुष्याला आनंदाची लय देण्याचे काम करत आहेत, ‘स्वरमानस’च्या संस्थापिका मानसी केळकर-तांबे.
 
स्वर म्हणजे ‘सूर’ आणि मानस म्हणजे ‘मन’ यांचा सुंदर मिलाप म्हणजे ‘स्वरमानस’. २००२ साली दादर, मुंबई येथे या संस्थेची स्थापना झाली. यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आज संस्थेत १४० विद्यार्थी संगीताचा आनंद घेतात. या संगीतशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, तीन ते ८० वयोगटांतील आबालवृद्ध गाणे स्वतःच्या आनंदासाठी शिकतात. मानसी सांगतात, "सगळेच पार्श्वगायक होऊ शकत नाहीत. मात्र, प्रत्येकजण स्वतःच्या आनंदासाठी गाऊ शकतो. ९५ टक्के गाणे येत असलेल्यांना कोणीही संगीततज्ज्ञ शिकवू शकतो; पण ज्यांना ३५ टक्केच गाणे येते, अशांना मी शिकवते. अशा हौशी आनंदकंदांसाठीच हे व्यासपीठ आहे. गाणे ही अशी कला आहे, जी अखेरपर्यंत साथ देते. आयुष्याच्या उत्तरार्धात आपण नृत्य-अभिनय करू शकत नाही; पण शय्येवर पडूनसुद्धा गाऊ शकतो. कोण जाणे, ‘या जन्मावर या जगण्यावर...’सारख्या एखाद्या गाण्याच्या आठवणीने तो शेवटचा क्षणही सुंदर होईल. आनंद भौतिक सुखांतून नव्हे, तर मनातून झिरपतो.”
 
मानसी यांची ‘स्वरमानस’ केवळ एक संस्था नव्हे, तो आनंदाचा संस्कार आहे. इथे गाण्याबरोबरच आत्मविश्वासही जागवला जातो. ऑर्केस्ट्रा, ‘सिंगेथॉन २८’सारख्या कार्यक्रमांतून नवोदितांना मंच उपलब्ध करून दिला जातो. दोन दिवसीय कार्यशाळांतून गाण्यांसोबत हावभाव, स्वरांतील चढ-उतार, ‘ब्रीदिंग टेक्निक’सारखे तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक मानसी शिकवतात. मानसी यांची सामाजिक बांधिलकीही वाखाणण्याजोगीच. प्रत्येक कार्यक्रमातून मिळणारा नफा त्या समाजातील गरजू संस्थांना अर्पण करतात. ‘मुस्कान’, ‘राह’, ‘एनी बडी कॅन हेल्प’ अशा संस्थांची उदाहरणे वानगीदाखल देता येतील. नुसताच पैसा कमावणे, हा त्यांचा हेतू नाही. अत्यल्प शुल्क आकारून कोणतीही कलाचाचणी न घेता, गाण्याची आवड असणार्‍या प्रत्येकाला संस्थेत प्रवेश दिला जातो.
 
मानसी सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांची कन्या. संगीतातील पहिली गुरू आईच! मात्र, पार्श्वगायनाच्या दौर्‍यामुळे आईचा सहवास फार कमी लाभला. मानसी यांनी संगीतकार अशोक पत्की यांच्याकडून सुगमसंगीताचे शिक्षण घेतले. त्यासोबतच शास्त्रीयसंगीत, भरतनाट्यम्, नाट्यशास्त्र शिकत; ‘तत्त्वज्ञाना’त ‘पदव्युत्तर’ पदवी मिळवली. राजन भोसले यांच्या ‘हार्ट टू हार्ट’मधून समुपदेशनाचे शिक्षण घेतले. समुपदेशनाचा उद्देश ‘ओव्हरथिंकिंग’च्या विळख्यात अडकलेल्यांना सकारात्मकतेचा मार्ग दाखवणे, एकल ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद पेरून त्यांना उभारी देणे, हा आहे. त्या ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणूनही विविध संस्थांसोबत काम करतात.
 
‘स्टारकिड’ असल्याने कौतुक आणि ‘रिव्हर्स नेपोटिझम’चे टोमणेही त्यांनी पचवले. अशा चांगल्या-वाईट अनुभवांतून त्या समृद्ध होत गेल्या. त्या म्हणतात, "मी आईचे लेबल कधी लावले नाही; स्वतः एक स्वतंत्र सामान्य व्यक्ती आहे आणि सामान्य व्यक्ती म्हणूनच जगते. गाण्यासाठी आईने केलेला त्याग मी जवळून पाहिलाय. गळा चांगला राहावा, म्हणून अनेक पदार्थांचा आस्वादही तिने घेतला नाही. मला मात्र माझे आयुष्य मनमुराद जगायचे आहे. म्हणूनच, मी संगीतशिक्षकाचा वेगळा मार्ग निवडला. प्रसिद्धी क्षणभंगुर असते, आनंद चिरंतन आहे. त्यामुळे आयुष्याचा हरएक क्षण आनंदोत्सव व्हावा, असे जगणे महत्त्वाचे आहे आणि तेच मी शिकवते.”
 
मानसी यांच्या विचारांना आध्यात्मिकेतची जोड आहे. शेगावचे गजानन महाराज त्यांचे आराध्य. "महाराजांच्या चरित्रातूनच सतत काम करण्याची प्रेरणा मिळते,” असे त्या सांगतात.
गेल्या वर्षी तीन तासांत तीन ते ८० वयोगटांतील ११० संगीतसाधकांनी एकाच मंचावर गायल्याचा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदला गेला, हे मानसींच्या कामाचेच फलित. ‘स्वरमानस’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १४० विद्यार्थ्यांना एकाच मंचावर गाऊ देण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे. "स्वरमानस’ला देशविदेशांत पोहोचवण्याचे ध्येय आहे. ‘माझा आवाज कसाही असला, तरी मी गाऊ शकते’ हा आत्मविश्वास मला प्रत्येकाच्या मनात रुजवायचा आहे,” असे त्या सांगतात. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
 
-वृंदा परब




संबंधित मजकूर