अराजकतेसह राजकीय अस्थिरता, आर्थिक संकटाने पोळलेल्या बांगलादेशात धार्मिक कट्टरतावादाने विकृतीचा कळस गाठला आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे, त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करणे, त्यांच्या भावना दुखावणे असे प्रकार, धर्मांध मुस्लिमांकडून वारंवार घडताना दिसत आहेत. विद्यापीठ हे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. मात्र, ढाकातील जगन्नाथ विद्यापीठात भर नवरात्रोत्सवात हिंदूंच्या मंदिराबाहेर आणि दुर्गापूजा मंडपाच्या अगदी जवळ गोमांस शिजवणे, गोमातेची हत्या करण्याचा डाव आखून, जिहाद्यांनी आपले मनसुबे दाखवून दिले. विद्यापीठ प्रशासनाचा मवाळ पवित्राही तेथील कट्टरतावादाचा दबाव अधोरेखित करतो. यावरूनच बांगलादेशात हिंदू म्हणून जगणे किती अवघड आहे, हेही लक्षात येतेच.
बांगलादेशात हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचे प्रकार आजचे नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेथे हिंदू समाजाचे खच्चीकरण सुरूच आहे. १९७१च्या ‘बांगलादेश मुक्ती संग्रामा’त, हिंदू समाजाने मोठा त्याग केला. त्यावेळी तत्कालीन पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या कट्टरपंथी समर्थकांनी, हिंदूंचा पद्धतशीर नरसंहार केला होताच. स्वतंत्र बांगलादेशासाठी लाखो हिंदूंनी आपले बलिदान दिल्याचे इतिहास ओरडून ओरडून सांगतो आहे. मात्र तरीही, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्यामागचा रक्तरंजित अत्याचाराचा ससेमिरा काही थांबला नाहीच, तो आजतागायत कायम आहे. गतवर्षी दिपू दास नामक हिंदू तरुणाला, ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली खुलेआम जाळून टाकण्यात आले. शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर, काळजीवाहू युनुस यांच्या नेतृत्त्वात बांगलादेशात निर्माण अभूतपूर्व राजकीय अस्थिरतेचे रूपांतर, आता अराजकतेत होत आहे.
बांगलादेशातील अल्पसंख्याक हक्क संघटनांच्या दाव्यानुसार, शेख हसीना सरकार गेल्यानंतरच्या काळात, हिंदू समाजाला लक्ष्य करणार्या २ हजार ४०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. २००१ आणि २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही, ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांनी, हिंदूबहुल भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, लूटमार आणि महिलांवर अत्याचार केले होते. महिला, विद्यार्थी अशा दुर्बल घटकांवर हल्ले करण्यासही मागे पुढे पाहिले जात नाही, यावरूनच येथील लोकशाही किती खिळखिळी झाली आहे, हे दिसते.
विद्यापीठे ही शिक्षण आणि सामाजिक सलोख्याची केंद्रे. परंतु, जगन्नाथ विद्यापीठातील ‘इस्लामिक हिस्ट्री’ विभागाच्या विद्यार्थ्यांची भूमिका बांगलादेशातील उच्च शिक्षणाचा ढासळता स्तरही अधोरेखित करते. हा प्रकार म्हणजे तरुणांमध्ये रुजवल्या जाणार्या कट्टरतावादचेही निदर्शक आहे. जेव्हा उद्याचे भविष्य असलेले विद्यार्थीच धार्मिक विद्वेष पसरवण्यात आघाडीवर असतात, तेव्हा त्या देशाच्या भविष्यासमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहते. बांगलादेश सध्या त्याच वाटेवर आहे.
अल्पसंख्याकांना डिवचणे, हे वरकरणी जरी कट्टरतावाद्यांकडून पाठ थोपवून घेण्यासाठी होत असले, तरी त्याचे परिणाम दूरगामी आहेत, याचे भान तेथील धुरिणांना नाही. कट्टरतावादी आणि हिंसक घटनांमुळे,व बांगलादेशची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला असताना, विकासदरात प्रचंड घसरण होत आहे. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्या वस्त्रोद्योग क्षेत्रालाही मोठाच फटका बसला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी बांगलादेशातून, आयात करण्यात आखडता हात घेतला आहे. परकीय गुंतवणूकदारही या अस्थिर देशात पैसा गुंतवण्यास धजावत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशला मिळणार्या परकीय मदतीतही मोठीच घट झाली असून, राजनैतिकदृष्ट्या हा देश एकटा पडला आहे. धार्मिक स्थळांना हानी पोहोचवणे, कट्टरपंथीयांचे मोर्चे यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव जागतिक पर्यटकही बांगलादेशकडे पाठ फिरवत आहेत.
थोडक्यात, हिंदूंना किंवा अल्पसंख्याकांना त्रास देण्याच्या नादात, बांगलादेश एका मोठ्या आर्थिक गर्तेत अडकत चालला आहे. धार्मिक उन्मादाचे हे लोण जर असेच सुरू राहिले, तर तेथे बेरोजगारी, गरिबी आणि उपासमारीची मोठीच लाट येण्याची भीती अर्थतज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेली अर्थव्यवस्थेची मोठी घसरण, याचेच दाट संकेत देत आहे.
- रोहित गुरव