कृत्रिम बुद्धिमत्ता, नोकर्‍या आणि आपला भविष्यकाळ

    19-Oct-2026
 AI and Future of Jobs
 
सध्याचे युग ‘एआय’चे आहे. ‘एआय’ने अनेकांच्या नोकर्‍या जाणार असल्याची भीती सातत्याने चर्चेत आहे. काही अंशी ती खरीच म्हणावी लागेल. मात्र, ती सरसकट नाही. यामध्ये असंख्य संधीही दडलेल्या आहेत. त्यानिमित्ताने ‘एआय’चे स्वरुप, त्यातील संधी, त्या मिळवण्यासाठीच्या वाटांचा आढावा घेणारा हा लेख...
 
दि. ३१ मार्च रोजी पहाटे ६ वाजता ‘ओरॅकल’ कंपनीतील ३० हजार कर्मचार्‍यांना ई-मेलने कळवण्यातं आलं की, "आजपासून तुमची नोकरी नाही.” त्या एका दिवशी भारतात १२ हजार लोक घरी बसले. याचे कारण, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय!’ पण, ‘एआय’ खरंच इतकं भयंकर आहे का की, आपण नीट विनाकारण घाबरत आहोत? चला, एकदम सोप्या भाषेत हे समजून घेऊया.
 
मी गेल्या अनेक वर्षांपासून ‘एआय’वर संशोधन करत असून, दोन पुस्तकेही लिहिली आहेत. पण आज मी तुमच्याशी एखाद्या मित्रासारखं बोलणार आहे. कारण, हा विषय आपल्या मुलांचा विषय आहे. ‘एआय’ तुमचं भविष्य चोरत नसून, शिकायला नकार देणं, हेच खरं संकट आहे.
 
हे खरं आहे की, ‘एआय’मुळे काही नोकर्‍या जात आहेत. आकडेवारी हे स्पष्ट करते. २०२६च्या पहिल्या सहा महिन्यांत, अमेरिकेत तब्बल १ लाख १ हजार ७४३ नोकर्‍या ‘एआय’मुळे गेल्या. हा आकडा संपूर्ण २०२५ वर्षापेक्षा (५४ हजार ८३६)जवळपास दुप्पटच. मे २०२६ मध्ये ३८ हजार ५७९ नोकर्‍या ‘एआय’मुळे गेल्या. त्यातील एकूण कपातींमागे तब्बल ४० टक्क्यांमागे कारण ‘एआय’ होते. ‘स्किलसिन्सर’च्या ताज्या अहवालानुसार, २०२६ मधील ४१ टक्के नोकरीकपात ‘एआय’ किंवा ‘ऑटोमेशन’ने झाली आहे.
 
हे खूप भीतीदायक वाटतं असलं, तरी दुसरी बाजूही बघणे आवश्यक आहे. भारतात २०२६ मध्ये नव्याने १.२५ लाखांहून अधिक ‘आयटी’ नोकर्‍या निर्माण होत आहेत. भारतातल्या ३.८ कोटी नोकर्‍या ‘एआय’मुळे बदलतील, असं संसदीय समितीच्या अहवालात म्हटलं आहे. यातल्या बहुतेक नोकर्‍या नवीन रूपात येतील. २०३० पर्यंत चार कोटी नवीन ‘एआय’संबंधित नोकर्‍या निर्मितीचे सरकारचे लक्ष्य आहे. थोडयात, नोकर्‍या जात आहेत, हे खरं; पण नव्या नोकर्‍याही येत आहेत. या नव्या नोकर्‍यांसाठी नवीन कौशल्येही लागतात!
 
२०२६ हे वर्ष अनेक कंपन्यांसाठी ‘एआय रिस्ट्रक्चरिंग’चं ठरलं. ‘ओरॅकल’न रद्द केलेल्या ३० हजार नोकर्‍यांत, १२ हजार भारतातल्या होत्या. कंपनीने ‘एआय डेटा सेंटर्स’साठी, तब्बल १५६ अब्ज डॉलरची योजना जाहीर केली होती. विशेष म्हणजे, त्याच तिमाहीत ‘ओरॅकल’चा नफा ९५ टक्के जास्त होता. म्हणजेच हा एक धोरणात्मक बदल होता. ‘मेटा’ने मे २०२६ मध्ये आठ हजार कर्मचारी कमी केले. यासाठी ‘एआय’साठी पैसे हवेत असे कारणही सांगितल. ‘मायक्रोसॉफ्ट’ने मे ते जुलैदरम्यान एकूण सुमारे ११ हजार नोकर्‍या कमी केल्या. ‘सिटीबँक’ने २० हजार नोकर्‍या, तर पेपल, ब्लॉक, इन्ट्युटसारख्या कंपन्यांनीही हजारो नोकर्‍या ‘एआय’चे कारण सांगूनच कमी केल्या. या कंपन्यांपैकी आर्थिकदृष्ट्या तोट्यात नव्हत्या. नफा कमावतानाच त्यांना नोकरकपात केली. म्हणजे त्यांनी ‘एआय’च्या नावाखाली खर्च कमी केला. त्यामुळे फक्त ‘एआय’ला दोष देणं योग्य नाही.
 
‘क्लार्ना’ या कंपनीने ७०० ‘कस्टमर सर्व्हिस’ कर्मचार्‍यांना कामावरुन काढून, ‘एआय’ आणलं. त्यामुळे सेवेचा दर्जा खालावला. ग्राहक नाराज झाल्याने, अखेरीस पुन्हा माणसं भरावी लागली. असाच अनुभव अनेकांना आला. ‘एमआयटी’च्या अभ्यासानुसार ९५ टक्के ‘एआय’ पायलट प्रकल्पांनी अपेक्षित फायदा दिला नाही. म्हणजेच ‘एआय’साठी घाईघाईत माणसं काढणं नंतर महागात पडू शकते.
 
भारतात ‘एआय’मुळे नोकर्‍या जाण्याबरोबरच, नव्या नोकर्‍या येण्याचीही शक्यता आहे. ‘नौकरी’च्या जुलै २०२६च्या अहवालानुसार, भारतात ‘एआय’ कौशल्यांची मागणी १७ पट वाढली. २०२० मध्ये फक्त ०.९ टक्के असलेला ‘आयटी’ नोकर्‍यांच्या जाहिरातींतील एआय’चा उल्लेख, आता१५.४ टक्के झाला आहे. एवढंच नव्हे, इतर क्षेत्रांतही ‘एआय’ कौशल्यांचा उल्लेख सहापट वाढला आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’नुसार, भारतातल्या ७३ टक्के कंपन्या ‘एआय’ कौशल्य असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देतात. ’अवशलले खपवळर’ नुसार ‘एआय’, डेटा आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातल्या नोकर्‍यांची मागणी ५१ टक्के वाढली असून, यातील तज्ज्ञांचे मानधनही १५ टक्के अधिक आहे. ‘ओरॅकल’च्या घटनेनंतर ‘माझी नोकरी सुरक्षित आहे का?’ असा प्रश्न सर्वांना पडला. याच उत्तर तुमच्याच हाती आहे. ज्यांनी ‘ओरॅकल’मध्येच ‘एआय’ शिकलं, त्यांना लवकरच नवी नोकरी मिळाली.
 
‘एआय’ प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत असले, तरी सगळ्यांनाच सारखा धोका नाही. ‘आयटी’ क्षेत्रात बदल सर्वांत लवकर होतो आहे. साधी कोडिंग, डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट हे ‘एआय’ आधीपासूनच करत आहे. पण त्याचवेळी ‘एआय’ सिस्टम बनवणे, त्यावर देखरेख ठेवणे, ‘एआय’च्या चुका पकडणारे अशा नव्या भूमिकाही वेगाने येत आहेत. बँकिंग आणि वित्त क्षेत्रात कर्ज द्यायचं की नाही, ‘फ्रॉड’ पकडणं, कस्टमरला उत्तर देणं हे ‘एआय’ करत आहे. पण, अकाऊंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, फायनान्शिअल अ‍ॅडव्हायजरसारख्या पदांवर अजून माणसंच आहेत. कारण विश्वास आणि नातं ‘एआय’ देऊ शकत नाही.
 
उत्पादन क्षेत्रातील आधीपासून असलेल्या रोबोट्सना, ‘एआय’ आणखी हुशार करत आहे. गाड्यांच्या कारखान्यात दर्जा तपासणी ‘एआय’ करत असल, तरी यंत्रे सांभाळणं, दुरुस्त करणं, नव्या गोष्टी डिझाईन करण्याचे काम माणसंच करतात. आरोग्यसेवेत ‘एआय’ एक्स-रे वाचतो, रिपोटर्स तपासतो; पण डॉक्टर आणि नर्सची जागा ‘एआय’ घेणार नाही. शिक्षण क्षेत्रात ‘एआय’ ‘ऑनलाईन लर्निंग’ आणि ‘पर्सनलाईज्ड टीचिंग’मध्ये मदत करतो; पण शिक्षकाची जागा ‘एआय’ कशी घेईल? सेवाक्षेत्रात ‘चॅटबॉक्स कस्टमर सर्व्हिस’ देतात आणि ‘सेल्फ चेक-आऊट’ही नव्याने येत आहे; पण हॉटेलमधला वेटर, दुकानदाराचं प्रेमाने बोलणं हे ‘एआय’ करणार नाही. सरकारी नोकर्‍यांत टॅक्स प्रोसेसिंग, पेन्शन व्यवस्थापन, ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ‘एआय’ येत आहे; पण मोठी कपात होण्याची शयता नाहीच. बांधकाम आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ड्रोनने सर्व्हे होतो, ‘एआय’ नकाशे बनवतो, पण इमारत बांधण्यासाठी माणूस अजूनही अपरिहार्यच आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही; पण झोपूनही राहायचं नाही. सर्वांत आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, "माझ्या कामात कोणत्या गोष्टी कंटाळवाण्या पद्धतीने होतात?” तीच कामे ‘एआय’ आधी घेते. ती सोडून बाकी नवा विचार करणं, माणसांशी बोलणं, निर्णय घेणं, यावर जास्त लक्ष द्या.‘एआय’ची साधनं वापरायला शिका. ‘चॅटजीपीटी’, ’क्लाऊड’, ’कोपायलट’ वापरण्यास कठीण नाही.
 
‘युट्यूब’वर व्हिडिओ आहेत; ‘कोर्सेरा’वर मोफत कोर्सेस आहेत, दिवसातला अर्धा तासही पुरे.
 
त्याहून महत्त्वाचं म्हणजे, माणसासारखं वागायला शिकणे! कारण कोणाशी खरं बोलणं, नवी कल्पना मांडणं, टीम सांभाळणं, कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेणं, या गोष्टी ‘एआय’ करत नाही आणि करणारही नाही. आणि कंपनीतील ‘एआय’ प्रकल्पांमध्ये स्वतः सहभागी व्हा, पुढाकार घ्या. असं करणार्‍याचीच नोकरी सुरक्षित राहते आणि पगारही वाढतो.‘नौकरी’च्या अहवालानुसार ‘एआय’ येणार्‍यांना ‘आयटी’ आणि ‘नॉन-आयटी’ दोन्ही क्षेत्रांत जास्त पगार मिळतो. ‘एआय’शी जुळवून घेणारा माणूसच ‘एआय’चा मालक होतो. याबाबत कंपन्यांनाही हा प्रश्न विचारायला हवा की , " नोकरकपात हाच एकमेव मार्ग आहे का?”फॉरस्टरच्या सर्वेक्षणानुसार, फक्त २३ टक्के कंपन्यांनीच कर्मचार्‍यांना ‘एआय’चं प्रशिक्षण दिलं. बाकी ७७ टक्के कंपन्यांनी नोकरकपात केली. त्यातल्या ५५ टक्के कंपन्यांना नंतर पश्चात्ताप झाला आणि पुन्हा भरती करावी लागली.
 
कर्मचार्‍यांना आधी शिकवा, मग ‘एआय’ आणा, हा साधा फॉर्म्युला आहे. ‘ओरॅकल’ने १२ हजारांना ‘एआय’ शिकवलं असतं, तर त्याच कंपनीत त्यांनी नवी भूमिका बजावली असती. ज्या कंपन्या आपल्या माणसांना शिकवतात, त्याच पुढे जातात. ज्या फक्त माणसं कमी करतात, त्यांना नंतर त्रास होतो, हे अनेक कंपन्यांच्या अनुभवातून सिद्ध झालं आहे.
 
‘एआय’सारखी मोठी तंत्रिक उलथापालथ, आधीही झाली आहे. त्यात प्रत्येक वेळी माणूसच जिंकला आहे. छपाईचं यंत्र आलं, तेव्हा हस्तलिखित करणार्‍यांना वाटलं नोकरी गेली; पण, पुढे नव्या नोकर्‍याही आल्या. ट्रॅटर शेतात आला, इंटरनेट आलं याचा इतिहासही असच आहे. प्रत्येक वेळी तंत्रज्ञान आलं, काही जुन्या नोकर्‍या गेल्या आणि नव्या आल्या. ‘एआय’सोबतही हेच होणार. ‘डब्ल्यूईएफ’च्या अहवालानुसार, २०३० पर्यंत ‘एआय’मुळे जगात ७.८ कोटी नव्या नोकर्‍या निर्माण होतील. भारत सरकारचं लक्ष्य आहे, चार कोटी नव्या ‘एआय’ नोकर्‍या.
 
‘ओरॅकल’च्या भारतातील १२ हजार कर्मचार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली. पहाटे ६च्या ई-मेलने त्यांचं आयुष्य अचानक बदललं. पण एक गोष्ट नक्की सांगतो हे एक वळण आहे. आणि वळणावर थांबणार्‍यांना रस्ता दिसत नाही, चालत राहणार्‍यांनाच पुढचं दिसतं. ‘एआय’ कितीही हुशार झालं, तरी त्याच्यात माणुसकी नाही! माणसाची करुणा, माणसाचं प्रेम, माणसाचं सर्जनशील मन हे ‘एआय’ शिकणार नाही. म्हणूनच, माणसाची जागा ‘एआय’ घेणार नाही. फक्त ‘एआय’ वापरणारा माणूस, ‘एआय’ न वापरणार्‍याची जागा घेईल! आज एकच निर्णय घ्या, ‘एआय’ हे माझ्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे, शत्रू नाही. आणि ते साधन शिकायला आजच सुरुवात करा. जे शिकले, ते प्रत्येक युगात टिकले, ‘एआय’च्या युगातही टिकतील.
 
डॉ. केतन देसले 
(डॉ. केतन देसले ‘एआय’ संशोधक व लेखक असून, त्यांचे ‘एआय’ क्षेत्रात २ पुस्तके, २० हून अधिक संशोधन पत्र प्रकाशित झाले आहेत.)




संबंधित मजकूर