आठवण व्यक्तींची साठवण प्रसंगांची...

    18-Oct-2026
 

Uday Jogalekar Book 
 
ज्येष्ठ संघ प्रचारक उदय (तात्या) जोगळेकर यांच्या ‘आठवण व्यक्तींची साठवण प्रसंगांची’ या पुस्तकाचे नुकतेच पुण्यात सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या पुस्तकाचा हा परिचय...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ‘गृहस्थी कार्यकर्ता’ व ‘पूर्णवेळ प्रचारक’ अशा कार्यकर्त्यांच्या दोन श्रेणी आहेत. या दोघांच्या परिश्रमातून संघाची शतकी वाटचाल झालेली आहे. ‘प्रचारक’ हा घटक प्रेरक म्हणून काम करत असतो. संघटनांतर्गत घडामोडींचा स्वतः कर्ता न होता, अशा घडामोडी घडवून संघटनेचे पाऊल पुढे पडण्यासाठी तो अप्रत्यक्षरीत्या भरपूर परिश्रम करत असतो. त्यामुळे ‘पूर्णवेळ प्रचारक’ हा बाल-किशोर-तरुण-प्रौढ व गृहस्थी कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे आकर्षण असतो. अशाच ‘प्रचारक’ मांदियाळीतील महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रचारक उदय तथा तात्या जोगळेकर यांनी आपल्या प्रचारकीची जीवनातील व्यक्ती व प्रसंगांचे चित्रण ‘आठवण व्यक्तींची, साठवण प्रसंगांची’ या अनुभवपर कथनात्मक पुस्तकातून केले आहे.
 
घरातून संघकार्याचा समृद्ध वारसा मिळालेले तात्या जोगळेकर हे वास्तूरचनाकार (आर्किटेचर)ची पदवी घेऊन पूर्ण वेळ संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. त्यांच्या सोलापूर, मुंबई, कोकण अशा विविध कार्यक्षेत्रातील काही प्रातिनिधिक व्यक्ती-संस्था यांचा उद्बोधक परिचय आपल्याला या पुस्तकातून होतो. संघातील एकेका कार्यकर्त्याचे जीवन हेच मुळात एका पुस्तकासारखे असते. परंतु, त्यातील वेचक-वेधक गुणवैशिष्ट्ये, एखादा प्रेरक प्रसंग व त्यातून कार्यकर्त्याचे कर्तृत्व लक्षात येऊ शकते, अशा आठवणींचा हा संग्रह आहे.
 
आणीबाणीत प्रचारक
 
लेखकाच्या बालपणीच्या रम्य आठवणी, माता-पिता, बंधू (ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुधीर जोगळेकर) या सगळ्यांची संघसमज व अनुभवांची शिदोरी संघप्रचारक निघताना त्यांच्यापाशी होती. अर्थातच, कोरी पाटी असणे आणि अशी शिदोरी असणे, यात फरक असतो. अर्थातच, संघाचे घर असल्यामुळे लक्ष्मण इनामदार, सुरेश केतकर, वसंत केळकर, वसंत भिडे, नानाराव ढोबळे अशा ज्येष्ठ प्रचारकांचे पाय ज्या खोलीत लागलेले होते, त्याच खोलीत तत्कालीन विभाग प्रचारक सुमंत घायाळ तात्यांना पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषित करतात. खरे तर औपचारिक प्रचारक बैठक होऊन त्यात नियुक्ती होत असते. परंतु, त्या बैठकीत त्यांना जाता आले नव्हते. त्यामुळेही एका अभिनव पद्धतीने झालेली नियुक्ती म्हणावी लागेल. अशा प्रचारक कार्यकर्त्याला घडवणारे संघामध्येदेखील काही असावे लागतात. त्यातील काही कार्यकर्त्यांचे अत्यंत कमी शब्दांत, परंतु विविध पैलूंचे वर्णन करणारे शब्दचित्र आहे. आणीबाणी (१९७५) असताना बंदीमुळे संघकामावर शासनाची वक्रदृष्टी होती. तरीही अशा कालावधीत लेखक पूर्णवेळ प्रचारक म्हणून बाहेर पडतात.
 
आधीच असे ‘पूर्णवेळ बाहेर पडणे’ म्हणजे जणू काही सतीचे वाण आहे. कारण, कौटुंबिक व गृहस्थी जीवनाच्या विरुद्ध दिशेने आपला प्रवास निश्चित करून, त्यावर मार्गक्रमण करणे, हे प्रचारकी जीवन आहे. त्यात आणीबाणीचे संकट. त्यामुळे हे सतीचे वाण घेऊन पदरात निखारा बांधून घेण्यासारखे त्यांचे काम होते. परंतु, ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सामान्य संघ स्वयंसेवकांपर्यंत मनोधैर्य टिकवून ठेवले, हा इतिहास विलक्षण आहे. त्याचे काही अनुभव लेखकाने मनोवेधक पद्धतीने वर्णन केलेले आहेत. आणीबाणीच्या त्या आठवणीतील पू. रज्जूभैया व शेषाद्रीजी यांचे मुंबई प्रवासातील राहणे-वागणे किती साधे-सरळ स्वयंसेवकांत आदर्शवत होते, तेही आपल्याला समजते.
 
सोलापूर - गृहस्थी कार्यकर्ते
 
सोलापूर जिल्ह्याच्या संघकामातील तपस्वी गृहस्थी कार्यकर्त्यांचे शब्दांकन हे प्रेरणादायी आहे. स्वतःच्या व्यवसायातील ज्येष्ठता आणि व्यवहारातील सात्त्विक शूचिता जपणारे संघ पदाधिकारी आहेत. ग्रामीण भागात रामभाऊ म्हाळगींसारख्या प्रचारकाने पेरलेल्या संघबीजाला आलेले फळ अनुभवण्यास मिळते. पूर्ण वेळ प्रचारक कार्यकर्त्याला गृहस्थी कार्यकर्ते सहजगत्या संघकामातील अभ्यास करण्याचा संस्कार करून जातात. संघकामाचा प्राण शाखा आहे, तसे हॉटेल व्यवसायातील संघ कार्यकर्त्याला लाभदायक असणारे बाकडे तसे असल्याचे श्रद्धेने स्वयंसेवक म्हणतो. संघसंस्कार मनात किती खोलवर रुजलेला आहे, हे जाणवते.
 
प्रचारक हा आपल्या कुटुंबातील एका घटकाप्रमाणे असून त्याची सर्व ख्याली-खुशाली, भोजन, कपडे, तसेच निवासासाठी स्वतःच्या घरातील एक खोली प्रचारकासाठी राखून ठेवणारे कार्यकर्ते आहेत.
 
संघ प्रचारकाचे कार्यकर्त्यांकडे भोजनास जाणे, ही व्यवस्था हादेखील एक अभ्यासाचा विषय. त्यातील अनेक मनोरंजक गमती-जमती एका प्रकरणात येतात. कारण, भोजन हे सर्वस्वी घरातील गृहलक्ष्मीच्या नियंत्रणातील विषय आहे. संघ कार्यकर्ते प्रेमाने व आत्मीयतेने प्रचारकास भोजनास बोलावत असतात. पण, यातूनदेखील काही गमती-जमती घडतात. अर्थात, अशा सहस्रावधी गृहलक्ष्मी संघ प्रचारकांच्या भोजनाची दीर्घकाळ जबाबदारी घेत आहेत. संघकामातील तो वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. याचे वर्णन यात आहे.
 
हे सर्व गृहस्थी कार्यकर्ते किती सहजपणे स्वतःचे काम म्हणून करत असतात, यातला खोलवर रुजलेला संघसंस्कार हा अभिनव आहे. महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन संघचालक प्रल्हाद अभ्यंकर हे संघटन कार्यातील सूत्र सांगताना म्हणतात, "समाजात मोठा असलेला व्यक्ती संघात अत्यंत लहान काम करतो व समाजात कामाच्या दृष्टीने अत्यंत छोटे स्थान असलेली व्यक्ती संघामध्ये मोठ्या जबाबदारीचे निर्वहन करीत असतात.” अशी काही व्यक्तिमत्त्वे आपल्याला या पुस्तकात चित्रित झालेली दिसतात.
 
‘समर्पण’ हा संस्कार स्वयंसेवकांवर सातत्याने होत असतो. त्यातील ‘गुरुदक्षिणेचे समर्पण’ हे खरचटून गेले पाहिजे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणतात. याचा अर्थ ‘समर्पण’ हे आपल्या कौटुंबिक अंदाजपत्रकात झळ लागणारे असले पाहिजे, याची जाणीव सातत्याने व्हायला पाहिजे. म्हणजे, आपले संघकामाकडे निरंतर लक्ष राहते. हा भाव ‘खरचटून जाणे’ या शब्दातून व्यक्त होतो.
 
केवळ स्वयंसेवक नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील सर्वच घटक हे संघसमर्पित कसे असतात, याचेही काही चित्रण या पुस्तकात आहे. पूर्व सरसंघचालक रज्जूभैय्या संघशाखा कामाच्या शैलीविषयी बोलताना शाखा कार्यातील तीन ‘प्र’ची आवश्यकता प्रतिपादन करतात. ‘प्रवचन’ (बौद्धिक कार्यक्रम), ‘प्रचलन’ (शारीरिक कार्यक्रम) ‘प्रभक्षण’ (स्वयंसेवकांचे अनौपचारिक खाण्या-पिण्याचे कार्यक्रम) यातून संघ वाढत असतो आणि गावागावांमध्ये या तिन्हींचे संतुलन साधणारे कार्यकर्ते आपल्याला भेटतात.
 
लेखक ‘आर्किटेट’ असल्याने आपल्या प्रदीर्घ अनुभवातून संघ कार्यकर्त्यांचे परिपूर्ण दर्शन म्हणजे, त्याचा संघस्थानावरील व्यवहार, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणचा व्यवहार व त्याचा घरातील व्यवहार या एकत्रित दर्शनातून ‘थ्री डायमेन्शनल व्ह्यू’ समजतो.
प्रचारक निघणारी घरे
 
गृहस्थी कार्यकर्त्याच्या मनातील एक उत्कट भावना असते, ती म्हणजे आपल्या पुढच्या पिढीत संघकाम संक्रमित व्हावे आणि त्यातूनही ‘पूर्णवेळ प्रचारक निघणे’ हा दुग्धशर्करा योग असतो. अशी प्रचारक निघणारी घरे हादेखील संघकामातला समर्पणाचा मोठा संस्कार आहे. एकाच कुटुंबातून संघ प्रचारक, ‘राष्ट्र सेविका समिति’च्या प्रचारिका आणि आई-वडील हे वानप्रस्थी कार्यकर्ते म्हणून जातात असे घाटे कुटुंबीय आहे, तर घरातील दोघे भाऊ-भाऊ, बहीण असेदेखील प्रचारक किंवा विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता निघण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. वडील आणि मुलगा दोघेही प्रचारक निघण्याची परंपरा आहे, तर काही ठिकाणी आई-वडिलांचा रोष पत्करूनदेखील प्रचारक निघालेले आहेत. कालांतराने कामाचे महत्त्व कळल्यानंतर व आपल्या मुलातील झालेला बदल लक्षात घेऊन या कुटुंबांचेही मनपरिवर्तन झालेले दिसते.
‘संघगीते’ हे संघातल्या अनेक आकर्षणांपैकी एक आकर्षण आहे. परंतु, गाण्याची आवड असणे व गायनात गती असलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख यात आहे.
 
महिलाशक्ती
 
संघकामातील महिलाशक्तीबद्दल बरीच चर्चा होते. संघकार्याची माहिती न घेता, संघातील महिलांच्या स्थानाविषयी प्रश्न विचारले जातात. संघकामात व संघप्रेरित सामाजिक कार्यातील महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. महिलांच्या सक्षमीकरणाने सहस्रावधी कुटुंबांचे जीवन उजळून निघणार्‍या कार्याच्या प्रेरणास्रोत अशा चंद्रिका चौहान आहेत, तर अत्यंत दारिद्य्राच्या परिस्थितीत आपला मुलगा संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून जात आहे, म्हणजे देशाचे काहीतरी काम करायला जात आहे, या भावनेने स्वतःच्या पोटाला टाच देऊन ती माऊली पत्रात म्हणते, "मी इथे रोज कालवणाबरोबर भाकरी खात आहे.” शहरी वातावरणात वाढलेल्या लेखकाला केव्हातरी त्या माऊलीच्या घरात गेल्यावर लक्षात आले की अठराविश्वे दारिद्य्र असल्यामुळे भाकरीबरोबर ठेचा किंवा कांदा हे कोरडे कालवण होते. समर्पणाच्या या संस्काराने वाचकाच्या डोळ्यांत दोन अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
 
लेखकाच्या संपर्कात आलेल्या महिला कार्यकर्त्यांचे कर्तृत्व व समर्पणाबद्दल माहिती देऊन जातो. 
लेखकाच्या कौटुंबिक पृष्ठभूमीवर संघाचे संस्कार असल्यामुळे प्रचारक जाण्यासाठी अनुकूलता होती; परंतु पुढे प्रचारक निघाल्यावर ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा खोलवर संस्कार आहे व प्रभाव आहे, असे मधु कुलकर्णी, सुरेश केतकर यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये लेखक अधोरेखित करतात. या ज्येष्ठ प्रचारकांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना या वैशिष्ट्यांचे केव्हातरी दर्शन झालेले असल्यामुळे या पुस्तकात त्याचा पुनर्प्रत्यय येतो.
 
सेवा विभाग
 
सेवा विभागाची जबाबदारी आल्यानंतर सेवा प्रकल्पात येणार्‍या अत्यंत सामान्य परिस्थितीतील गुणवान विद्यार्थिनी, तर अशा सेवाकार्यास भरभरून देणारे धनको, तसेच अत्यंत आत्मविश्वासाने कितीही मोठ्या धनकोंकडे सेवाकार्यासाठी लागणार्‍या धनाची अपेक्षा व्यक्त करणारे कार्यकर्ते आपल्याला कळतात. रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेल्या मुलांकडे लक्ष देऊन त्यांना नीट मार्गी लावून पुन्हा कुटुंबात पाठवण्याचा प्रकल्प उभा करणारे ‘समतोल फाऊंडेशन’च्या कामामुळे सेवाक्षेत्रात किती वैविध्यपूर्ण कामे आपली प्रतीक्षा करीत आहेत, याची जाणीव होते.
 
स्वेच्छा निवृत्ती
 
नोकरीत असते तशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लेखकाला प्रचारकी जीवनातून स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. ज्या कामात प्रवास, भेटी यावर होणारी शारीरिक दगदग कमी करून बैठ्या स्वरूपाचे काम करणे शय आहे, असे ‘राष्ट्रीय सेवा भारती’च्या कामातील त्यांचे काही अनुभव आहेत. त्याअंतर्गत ग्रामविकासासारख्या कामांचा लेखकाला जवळून परिचय झाला. त्याचेही चित्रण या पुस्तकात आहे.
 
संघ कार्यालय प्रभाव
 
संघातील अनेक वैशिष्ट्यांमध्ये संघाला मिळालेल्या वास्तू होत, ज्या पुढे संघकार्यासाठी वापरल्या जातात. समर्पित संघ कार्यकर्त्यांच्या वास्तव्याने या वास्तूंचीसुद्धा एक सात्त्विक शक्ती निर्माण होत असते. अशा पुण्यातील ‘कोशिक आश्रम’ या जुन्या वास्तूत व त्याचे नवनिर्माण झाल्यावरदेखील लेखकाचा निवास आहे. या वास्तूतील संस्कार, या वस्तूने घडवलेले कार्यकर्ते ही वास्तूची वैशिष्ट्येदेखील आपल्याला या पुस्तकात दिसतात. खरे तर, एकेक संघ कार्यकर्ता आणि त्यातदेखील पूर्ण वेळ संघ प्रचारक यांच्याकडे संघकामातील एवढ्या विविध आठवणींचा आणि प्रसंगांचा संग्रह असतो की त्यातून कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला प्रेरक असतात, तर अभ्यास करणार्‍यांना संघकामाचे विविध पैलू लक्षात आणून देण्यासाठी उपयोगी असतात. त्यातील काही आठवणींचा संग्रह आणि त्यानिमित्ताने या समर्पित कार्यकर्त्यांचे चित्रण या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
 
त्यामुळे हातात घेतल्यावर हे पुस्तक संपेपर्यंत खाली ठेववत नाही, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. लेखकाची कथनशैली यातून आपल्याला लक्षात येते. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालेले आहे. संघशताब्दीच्या कालावधीत प्रकाशित झालेले हे पुस्तक संघ स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी व अभ्यासकांसाठी एक चांगला दस्तऐवज झाला आहे.
 
-दिलीप क्षीरसागर




संबंधित मजकूर