सप्तमातृका : भारतीय मंदिरांच्या शिल्पांमधून

    18-Oct-2026
 
Saptamatrika
 
नवरात्र सुरू झाले की अवघा भारत देवीच्या उपासनेत रंगून जातो. कुठे घटस्थापना होते, कुठे देवीचा जागर सुरू होतो, तर कुठे गरबा आणि दांडियाच्या तालावर उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी अशा शक्तिस्थानांवर भाविकांची गर्दी उसळते, गावागावांत भोंडल्याचे खेळ होतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण देवीच्या विविध रूपांचे स्मरण करतो. कधी ती महिषासुराचा वध करणारी दुर्गा असते, कधी करुणामयी जगदंबा, तर कधी उग्र रूप धारण करणारी महाकाली! पण, भारतीय मंदिरांच्या प्राचीन शिल्पांकडे बारकाईने पाहिले, तर देवीचे आणखी एक विलक्षण रूप आपल्याला समजते. एका दगडी पटावर शेजारी-शेजारी बसलेल्या सात स्त्रिया. प्रत्येकीचे मुख, आयुधे, वाहन आणि अलंकार वेगळे. काहींच्या मांडीवर लहान मूल, तर काहींच्या हातात शस्त्रे. त्यांच्या एका टोकाला वीरभद्र आणि दुसर्‍या टोकाला गणेश! या सात स्त्रिया म्हणजे सप्तमातृका!
 
नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या या काहीशा अपरिचित रूपाची ओळख करून घेणे, म्हणजे भारतीय शक्ती उपासनेच्या एका अत्यंत प्राचीन आणि समृद्ध परंपरेत प्रवेश करण्यासारखे आहे.
 
भारतीय संस्कृतीत मातृत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई म्हणजे जन्म देणारी, पोषण करणारी आणि संकटांपासून संरक्षण करणारी शक्ती. पण, या मातृत्वाच्या कल्पनेला भारतीय धर्मपरंपरेने केवळ वात्सल्यापुरते मर्यादित ठेवले नाही. गरज पडल्यास तीच माता हातात शस्त्र धारण करते, दुष्ट शक्तींशी युद्ध करते आणि विश्वव्यवस्थेचे रक्षण करते. मातृत्व आणि युद्धशक्ती यांचा हा विलक्षण संगम सप्तमातृकांच्या रूपात आपल्यासमोर येतो.
 
सप्तमातृका म्हणजे सात दैवी मातृशक्ती. ‘ब्रह्माणी’, ‘माहेश्वरी’, ‘कौमारी’, ‘वैष्णवी’, ‘वाराही’, ‘इंद्राणी’ आणि ‘चामुंडा’ ही त्यांची प्रचलित नावे. काही प्रादेशिक आणि ग्रंथपरंपरांमध्ये या समूहाची रचना बदलते. कधी नारसिंव्हीचा समावेश होतो, तर कधी मातृकांची संख्या आठ किंवा त्याहून अधिक होते. त्यामुळे सात मातृकांचा समूह ही महत्त्वाची परंपरा असली, तरी भारतीय देवी उपासनेतील हा मातृसमूह नेहमी याच स्वरूपात असतो, असे नाही.
 
या मातृकांची सर्वांत रोचक ओळख आपल्याला ‘देवीमाहात्म्या’त मिळते. शुंभ-निशुंभ या असुरांविरुद्ध देवीचे युद्ध सुरू असताना विविध देवतांच्या शक्ती स्वतंत्र स्त्रीरूपे धारण करून युद्धभूमीवर अवतरतात. ब्रह्मदेवाच्या शक्तीतून ब्रह्माणी, महादेवाच्या शक्तीतून माहेश्वरी, कार्तिकेयाच्या शक्तीतून कौमारी, विष्णूच्या शक्तीतून वैष्णवी, वराहाशी संबंधित वाराही आणि इंद्राच्या शक्तीतून ऐंद्री अर्थात इंद्राणी प्रकट होते. देवीच्या बाजूने युद्ध करणार्‍या या शक्ती असुरांचा संहार करू लागतात.
 
याच कथेत रक्तबीज नावाचा असुर समोर येतो. त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडताच त्यातून त्याच्यासारखा दुसरा असुर निर्माण होतो. त्यामुळे त्याच्यावर केलेला प्रत्येक प्रहार जणू त्याचे सामर्थ्य वाढवत असतो. शेवटी चामुंडा रक्त जमिनीवर पडू न देता, त्याचे प्राशन करते आणि देवीला रक्तबीजाचा संहार करता येतो.
 
या कथेत एक अत्यंत सुंदर तत्त्वज्ञान दडलेले आहे. विश्वातील विविध शक्ती स्वतंत्र रूपांत कार्य करत असल्या, तरी त्यांचा मूळ स्रोत एकच आदिशक्ती आहे. देवतांची सामर्थ्ये स्त्रीरूप धारण करतात आणि एकत्र येऊन विश्वव्यवस्थेचे संरक्षण करतात. मात्र, सप्तमातृकांची कथा केवळ ‘देवीमाहात्म्या’पुरती मर्यादित नाही.
 
‘मत्स्यपुराणा’सारख्या ग्रंथांमध्ये अंधकासुराच्या वधाशीही मातृकांचा संबंध येतो. शिवाने अंधकावर प्रहार केल्यावर त्याच्या रक्तातून असंख्य असुर निर्माण होऊ लागतात. तेव्हा त्या रक्ताचा नाश करण्यासाठी मातृशक्तींची निर्मिती केली जाते. अशा वेगवेगळ्या कथांमधून मातृकांची उग्र, युद्धशील आणि संरक्षणकर्ती रूपे स्पष्ट होतात.
पण, या सात मातृकांना प्रत्यक्ष ओळखायचे कसे? याचे उत्तर भारतीय मूर्तिशास्त्र देते.
 
‘ब्रह्माणी’ ही ब्रह्मदेवाशी संबंधित शक्ती. तिची प्रतिमा अनेकदा अनेक मुखांची असते. हातात अक्षमाला, कमंडलू आणि इतर आयुधे असतात. हंस हे तिचे प्रमुख वाहन. माहेश्वरीच्या प्रतिमेत शिवाची वैशिष्ट्ये दिसतात. जटामुकुट, त्रिशूल, डमरू, कधी त्रिनेत्र आणि नंदी हे तिच्या प्रतिमाशास्त्रातील महत्त्वाचे संकेत.
 
‘कौमारी’ ही कुमार अर्थात कार्तिकेयाची शक्ती. तिच्या हातातील शक्ती किंवा भाला आणि वाहन म्हणून मोर ही वैशिष्ट्ये तिला सहज ओळख देतात. वैष्णवीच्या हातांत शंख, चक्र, गदा आणि पद्म यांसारखी विष्णूची आयुधे दिसतात. गरुड हे तिचे वाहन.
 
‘वाराही’ची प्रतिमा तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मानवी शरीर आणि वराहाचे मुख! विष्णूच्या वराहावताराशी तिचा संबंध असला, तरी पुढे ‘वाराही’ची स्वतंत्र उपासना आणि तांत्रिक परंपराही विकसित झाली. ‘इंद्राणी’ किंवा ‘ऐंद्री’ हिचे वाहन ऐरावत हत्ती; वज्र हे तिचे महत्त्वाचे आयुध.
 
या सहा मातृकांच्या तुलनेत चामुंडेचे रूप अगदी वेगळे आहे. कृश शरीर, आत गेलेले पोट, बाहेर आलेल्या बरगड्या, उग्र मुख, विस्कटलेले केस, कवट्यांचे अलंकार आणि हातात कपाल किंवा इतर संहारक आयुधे! चामुंडेच्या प्रतिमेत शिल्पकार सौंदर्याची नेहमीची कल्पनाच बदलून टाकतो. ती कोमल नाही, अलंकारांनी नटलेली नाही. तिचे सौंदर्य तिच्या उग्रतेत आहे. जी शक्ती जीवनाला जन्म देते, तीच आवश्यकतेनुसार विनाशाचे रूपही धारण करू शकते, हा विचार या प्रतिमेतून व्यक्त होतो.
 
या सर्व मातृकांची शिल्पे स्वतंत्रपणे आढळतात; पण भारतीय मंदिरकलेत त्यांचा समूह विशेष महत्त्वाचा ठरतो. एका लांब दगडी पटावर सातही देवींच्या आसनस्थ प्रतिमा कोरलेल्या असतात. अनेक ठिकाणी वीरभद्र आणि गणेश यांच्या प्रतिमा समूहाच्या दोन टोकांना दिसतात. काही शिल्पांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा शेजारी लहान मुलेही दाखवलेली असतात.
 
या मुलांच्या प्रतिमा विशेष लक्ष वेधून घेतात. कारण, युद्धभूमीवर असुरांचा संहार करणार्‍या या देवता येथे पुन्हा माता म्हणून प्रकटतात. त्यांचे मातृत्व आणि संहारक सामर्थ्य एकाच शिल्पात एकत्र येते.
 
भारतीय मंदिरांच्या इतिहासात या शिल्पपरंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. गुप्तकाळात मातृकांच्या समूहप्रतिमांना अधिक विकसित स्वरूप मिळताना दिसते. पुढे चालुय, राष्ट्रकूट, पल्लव आणि इतर राजवंशांच्या काळात ही परंपरा विविध प्रदेशांत विस्तारते. मध्य प्रदेशातील उदयगिरीसारख्या प्रारंभिक हिंदू शैलस्थापत्याच्या परिसरातून पुढे महाराष्ट्रातील वेरूळ, घारापुरी आणि दख्खनमधील अनेक मंदिरांपर्यंत मातृकांच्या प्रतिमा आपल्याला सापडतात.
 
वेरूळच्या शैव लेण्यांमध्ये सप्तमातृकांची शिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. देवतांच्या स्वतंत्र प्रतिमा, त्यांची आसने, आयुधे आणि समूहाची रचना पाहताना शिल्पकाराने प्रत्येक देवीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपल्याचे जाणवते. त्याचवेळी सर्व देवी एकाच दगडी पटावर बसवून त्यांच्या सामूहिक शक्तीची जाणीवही करून दिलेली असते.
 
घारापुरीच्या शैव शिल्पपरंपरेतही मातृकांना स्थान आहे. त्यामुळे मातृका ही केवळ शक्तिपूजेची स्वतंत्र संकल्पना न राहता, व्यापक शैव उपासनेचाही भाग बनल्याचे लक्षात येते.
 
आंध्र प्रदेशातील मंदिरकलेचा अभ्यास करणारे संशोधक ए. रामदासू यांनी प्रारंभिक चालुय काळापासून विजयनगर काळापर्यंतच्या मातृकाशिल्पांचा विस्तृत अभ्यास केला आहे. आलमपूर, बिक्कवोलू आणि इतर स्थळांवरील उदाहरणांतून मातृकांच्या प्रतिमाशास्त्रात काळानुसार आणि प्रदेशानुसार झालेले बदल लक्षात येतात. कुठे देवींची आयुधे अधिक स्पष्ट होतात, कुठे वाहनांना महत्त्व मिळते, तर कुठे समूहातील देवतांची मांडणी बदलते.
 
यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. भारतीय मंदिरकला ही केवळ धार्मिक ग्रंथांतील नियमांची यांत्रिक पुनरावृत्ती नव्हती. स्थानिक श्रद्धा, संप्रदाय, राजाश्रय आणि शिल्पकारांची कलात्मक दृष्टी यांमधून प्रतिमांना वेगवेगळी रूपे मिळत गेली.
 
सप्तमातृकांच्या उपासनेमागे आणखी एक ऐतिहासिक स्तर आहे. भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून ग्रामदेवता, मातृदेवता आणि संरक्षणकर्त्या स्त्रीशक्तींच्या उपासनेच्या विविध परंपरा अस्तित्वात होत्या. या स्थानिक परंपरांचा व्यापक पुराणाधिष्ठित देवी उपासनेशी कालांतराने संवाद घडला असावा, असे अभ्यासक मानतात. सप्तमातृकांच्या विकासाकडे या व्यापक प्रक्रियेच्या संदर्भातही पाहता येते. म्हणून सप्तमातृकांचे शिल्प हे केवळ सात देवींचे एकत्रित चित्र नाही. त्यात स्थानिक श्रद्धा, पुराणकथा, देवतांचे प्रतिमाशास्त्र, शैव-शाक्त परंपरा आणि प्राचीन समाजातील संरक्षणाच्या संकल्पना एकत्र येतात आणि म्हणूनच, नवरात्रीच्या उत्सवाकडे पाहताना सप्तमातृकांची आठवण विशेष अर्थपूर्ण ठरते.
 
आपण नवरात्रीत देवीला ‘जगदंबा’ म्हणतो, संपूर्ण जगाची माता. पण, जगदंबा असणे, म्हणजे केवळ वात्सल्याने सर्वांना जवळ घेणे नाही. आपल्या अपत्यांचे, सृष्टीचे आणि धर्मव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक तेव्हा सामर्थ्य धारण करणेही त्यात सामावलेले आहे.
 ‘सप्तमातृका’ आपल्याला देवीच्या याच रूपाची ओळख करून देतात.
 
पुढच्या वेळी वेरूळ, घारापुरी किंवा एखाद्या प्राचीन मंदिरात गेलात, तर भिंतींवरील शिल्पांकडे थोडे अधिक लक्ष देऊन पाहा. शेजारी बसलेल्या सात स्त्रीप्रतिमा शोधा. एखाद्या देवीच्या हातातील त्रिशूल पाहा, दुसरीच्या मागे असलेला मोर शोधा, ‘वाराही’चे मुख ओळखा, चामुंडेच्या कृश शरीराकडे पाहा. एखाद्या मातृकेच्या मांडीवर बसलेले मूल दिसते का, तेही पाहा.
मग कदाचित लक्षात येईल की, त्या सात प्रतिमा केवळ सात स्वतंत्र देवता नाहीत; तर ती निर्मिती, पोषण, संरक्षण आणि संहार या विश्वाच्या विविध शक्तींना दिलेली सात रूपे आहेत!
 
नवरात्रीच्या नऊ रात्री आपण देवीसमोर अखंड दिवा लावतो. त्याच दिव्याच्या प्रकाशात देवीच्या या सात प्राचीन रूपांकडेही पाहूया. कारण, भारतीय परंपरेतील माता ही केवळ मायेची सावली नाही; तर ती संकटांशी लढणारे सामर्थ्यही आहे!
 
-इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४




संबंधित मजकूर