मधू कांबीकर : एका लोककलावंताचा यशस्वी रूपेरी प्रवास

    18-Oct-2026
Madhu Kambikar 
 
 
प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. या दिग्गज अभिनेत्रीच्या आठवणींना उजाळा देणारा -ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा हा लेख...
 
चित्रपटाचं जग हे काहीशा अनपेक्षित गोष्टींनीसुद्धा भरलेलं आहे. एक संधी मिळावी लागते आणि ती संधी जर यशस्वी ठरली, तर त्या कलाकाराची पुढची पाऊलवाट सुखद होते. मधू कांबीकर यांच्याबद्दल काहीसं असंच घडलं.
 
खरं तर, मधू कांबीकर या मूळच्या लोककलावंत. कलापथकांमधून, लोकनाट्यातून त्यांनी सातत्याने काम केलं. असं करत असताना आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये गीत साकारायची, अर्थात एखाद्या गाण्यावर अभिनय करण्याची, नृत्य करण्याची संधी मिळाली तर बरंच होईल, असं वाटणं स्वाभाविकचं.
 
त्यावेळेला दादा कोंडके ‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन करत होते. चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि जयश्री टी. हे प्रमुख नायक-नायिका होते. परंतु, या चित्रपटामधील एक गाणं ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला’ या गाण्यात एखादी पाहुणी अभिनेत्री असावं, असं दादा कोंडके, तसेच पटकथा-संवादलेखक राजेश मुजुमदार, छायाचित्रकार अरविंद लाड यांना वाटत होतं.
 
तर, या गाण्याची संधी मधू कांबीकर यांना मिळावी, म्हणून त्यांनी तो एक प्रयत्न केलेला. त्यानुसार गाण्याचं चित्रीकरण झालंदेखील! हे चित्रीकरण कोल्हापूर येथील ‘जयप्रभा स्टुडिओ’त झालं. चित्रीकरण झालं, ते गाणं एडिट झालं आणि ज्यावेळेला त्याची ‘रश प्रिंट’ पाहिली, त्यावेळेला दादांच्या असं लक्षात आलं की, हे गाणं मधू कांबीकर अधिक जोरदारपणे किंवा ठाशीवपणे अथवा लावणीचा जबरदस्त तडका बसेल, अशा पद्धतीने साकारू शकतात. म्हणून त्यांनी हेच गाणं पुन्हा एकदा चित्रित करायचं ठरवलं.
 
त्यानुसार मधू कांबीकर यांना तसा निरोप पाठवण्यात आला. मधू कांबीकर यासाठी पुन्हा तयार झाल्या; पुन्हा हे गाणं चित्रित करण्यात आलं आणि विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट तर ‘सुपर-डुपर हिट’ ठरलाच, पण त्याचबरोबर ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रभर अक्षरशः धुमाकूळ घातला.
खरं तर, मधू कांबीकर या मूळच्या नगर जिल्ह्यातील कांबी या गावातल्या. त्यांना नृत्यकलेची आवड होती आणि त्यानुसार त्या प्रयत्नही करत होत्या. पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात त्यांनी नृत्याचे शिक्षणही घेतलं. परंतु, ते करत असताना आणि त्याचप्रमाणे लोककलावंत म्हणून लावणीचे कार्यक्रम साकारत असताना, आपलं एक पाऊल पुढे पडावं, म्हणून त्या चित्रपटाच्या दुनियेमध्ये प्रवेश करू इच्छित होत्या आणि तो प्रवेश त्यांचा अशा पद्धतीने झाला. त्याचवेळेला आनंद माने दिग्दर्शित ‘लक्ष्मी’ या चित्रपटामध्येसुद्धा त्यांना एका गाण्याची संधी मिळाली.
 
७०च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये मराठी चित्रपटामध्ये त्यांनी पाऊल टाकलं; त्यावेळी रंजना या मराठीतील नंबर एकच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. 
मधू कांबीकर यांनी ‘सौभाग्यदान’, ‘सतीची पुण्याई’, ‘दगा’ या चित्रपटांतून छोट्या भूमिका साकारल्या. राजदत्त दिग्दर्शित ‘शापित’ हा ‘ट्रायका फिल्म’निर्मित चित्रपट होता आणि तो चित्रपट मधू कांबीकर यांच्या कारकिर्दीला एक नवं वळण देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी राजदत्त यांच्या ‘हेच माझे माहेर’ या चित्रपटामध्येसुद्धा भूमिका साकारली.
 
एकीकडे चित्रपटातून भूमिका साकारत असतानाच, त्यांनी आपले लावणीचे कार्यक्रमसुद्धा कायम ठेवले. त्याचबरोबर लावणीसाठी त्यांनी काही वर्ग घ्यायला सुरुवात केली. नवीन पिढी तयार व्हावी, लावणी म्हणजे काय, ती कला कशी, त्या कलेला प्रतिष्ठा मिळावी, ती कला आपल्या त्या माध्यमातून सामाजिक गोष्टी मांडू शकते अशी आहे, हेसुद्धा त्यांनी त्या लावणीच्या माध्यमातून सांगण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला.
 
नाना पाटेकर यांचा तो सुरुवातीचाच काळ होता. नाना पाटेकर हेसुद्धा दिग्दर्शक राजदत्त यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे असे होते. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद वसंत सबनीस यांचे होते आणि संगीत विश्वनाथ मोरे याचं होतं. या चित्रपटामध्ये एकूण सहा गाणी होती आणि ‘तुमचं नाव गाव काय सांगा की’ हे गाणं असेल किंवा ‘सार्‍यांसमोर भलत्याचं वक्ती नका करू, हो माझ्याशी मस्ती’ अशी गाणी लोकप्रिय ठरली. पु. ल. देशपांडे लिखित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ या चित्रपटात मधू कांबीकर यांना लावणी साकारण्याची संधी मिळाली. ही त्यांची एक फार मोठी झेप होती आणि विशेष म्हणजे, हा चित्रपट खरं तर लक्ष्मीकांत बेर्डेला अभिनयाची पोचपावती देणारा किंवा अभिनयासाठी प्रतिष्ठा देणारा असा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये वर्षा उसगांवकर, तुषार दळवी, इतरही कलाकारांच्या भूमिका होत्या. पण, मधू कांबीकर यांनी आपल्या लावणी नृत्याने या चित्रपटामध्ये जो रंग भरला, तो अद्वितीय होता. एक वेगळा दृष्टिक्षेप जर टाकायचा, तर त्यांनी एकाच वेळेला एका बाजूला डॉ. जब्बार पटेल, राजदत्त यांच्या चित्रपटातून ज्याप्रमाणे भूमिका साकारल्या, त्याचप्रमाणे महेश कोठारे यांच्या ‘धडाकेबाज’मध्ये त्यांनी लक्ष्मण बेर्डेच्या आईची भूमिका साकारली. आणखीन एक विशेष म्हणजे मराठी चित्रपटामध्ये भूमिका साकारत असताना त्यांनी ‘हम दोनों’, ‘यशवंत’, ‘शोला और शबनम’, ‘सातवां आसमान’ अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. त्यांनी ‘साद’ या गुजराती चित्रपटामध्ये भूमिका साकारलीच, पण त्यावर्षीचा गुजरात सरकारचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही त्यांना मिळाला.
 
इतक्यावरच न थांबता, त्यांनी स्वतःची एक टेलिफिल्म निर्मिती संस्थासुद्धा स्थापन केली आणि ९०च्या दशकामध्ये ‘काटा रुते कुणाला’ या ‘टेलिफिल्म’ची निर्मिती केली. म्हणजे सतत कार्यमग्न असणं, कार्यशील असणं आणि विविध माध्यमातून काम करणं, हे त्यांनी सुरू ठेवलं. मधू कांबीकर यांनी स्वतःच्या निर्मिती संस्थेच्यावतीने ‘सखी माझी लावणी’ हा लावण्यांचा, नृत्यकलेचा कार्यक्रम सादर केला आणि त्या कार्यक्रमाचे देश-विदेशांमध्ये प्रयोग झाले.
 
अशा या कलेलाच वाहून घेतलेल्या व्यक्तिमत्त्वाचा मात्र एक दिवस एक अपघात घडला. २०१६च्या डिसेंबरची घटना. मधू कांबीकर या रंगभूमीवर, रंगमंचावर लावणी साकारत असतानाच, दुर्दैवाने त्या पडल्या आणि त्यानंतर लक्षात आलं की, त्यांना पक्षाघाताचा झटका आलेला आहे. तेव्हा त्या अंथरुणाला खिळल्या.
 
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने मधू कांबीकर यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आलं. त्या कार्यक्रमाला त्या दुर्दैवाने हजर राहू शकल्या नाहीत. परंतु, त्यांची सून या कार्यक्रमासाठी हजर होत्या आणि त्यांनी तो पुरस्कार मधू कांबीकर यांच्यावतीने स्वीकारला. दुर्दैवाने जवळपास दहा वर्षे अंथरुणावर खिळून राहिलेल्या मधू कांबीकर यांची प्राणज्योत अचानक मालवली, हे दुर्दैव म्हणता येईल. मधू कांबीकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली एक स्वतःची जागा मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केली होती, एवढं मात्र नक्की!
 
-दिलीप ठाकूर
(शब्दांकन : कपिल देशपांडे)




संबंधित मजकूर