ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलेचा वारसा जपणार्या या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांच्याआठवणींना उजाळा देणारा -दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा हा लेख...
एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून मधू कांबीकर यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. मी माझ्या लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहत आलो आहे. ‘शापित’ आणि बाकी टीव्हीवर जेव्हा त्यांचे चित्रपट लागायचे, तेही पाहिले होते. पण, त्यांच्याबरोबर जेव्हा काम करायचा योग आला, तेव्हा तर माझं फार काही नाव नव्हतं. पण, माझ्याकडे बर्याच कलाकारांनी काम केलं होतं आणि मधू कांबीकरच फक्त राहिल्या होत्या. पण, मी जेव्हा त्यांना विचारणा केली, तेव्हा त्या अगदी "हो, करूया ना आपण काम,” असे सहजपणे म्हणाल्या आणि मग माझ्या एका मालिकेत त्यांनी काम केलं आणि त्यानंतर मग आमचा परिचय आणखी वाढत गेला. त्यांच्या घरी जाणं-येणं वाढलं. त्यांच्या घरी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर होत्या. त्यांनाही भेटण्याचा योग आला. त्यांनी लावणीमध्ये स्वतःला इतकं झोकून दिलेलं होतं की ‘ऑथेंटिक लावणी’ जी काय असते ना, ती खरं तर त्यांच्याकडूनच शिकावी! त्यांच्याकडं बघून ती डोळ्यांत साठवून धरावी, असा त्यांचा तो लावणीचा खास असा एक बाज होता. त्यांनी ‘सखी माझी लावणी’ नावाचा एक कार्यक्रमही केला होता. दुर्दैवाने त्याचे फार कमी प्रयोग झाले. कारण, लोकांना चित्रपटातल्या लावण्या आवडायच्या. त्यांनी त्या कार्यक्रमात अट्टाहासाने फक्त पारंपरिक लावण्या केल्या आणि त्याच्यावर त्या स्वतः सादर करायच्या. प्रयोगातील त्यांचे हावभाव, अदा म्हणजे अक्षरशः थक्क व्हायला व्हायचं!
मधू कांबीकर यांनी माझ्या ‘मराठी तारका’मध्येपण नृत्य सादर केले. ‘मराठी तारका’च्या सुरुवातीच्या काही शोजमध्ये त्या होत्या. मग मी त्यांच्यासोबत काही ‘अॅड फिल्म्स’ही केल्या. एका अशा ‘अॅड फिल्म’साठी मधू कांबीकर, निळू भाऊ, कुलदीप पवार, आशा काळे हे सगळे दिग्गज एकत्र होते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की, या सगळ्या कलाकारांना एकत्र दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर आम्ही ‘चिकनगुनिया’ या रोगाच्या जनजागृतीसाठी एक सामाजिक गीत तयार केलं होतं. त्याच्यामध्ये जयश्री गडकर, मधू कांबीकर, अलका कुबल, आशा काळे, ऐश्वर्या नारकर, उषा नाईक, अशा सगळ्या दिग्गज अभिनेत्री होत्या.
मधू कांबीकर आणि त्यांच्या समकालीन असणार्या एका अभिनेत्रीचं त्या काळात शीतयुद्ध होतं. एकमेकींशी त्या संवादही साधायच्या नाही. त्यांची कधीकाळी भांडणं झाली होती. त्यामुळे त्या एकत्र काम करण्याचा प्रश्नच नव्हता. पण, मी जेव्हा ते जनजागृतीपर गीत दिग्दर्शित केलं, त्यात त्या दोघी एकत्र आल्या. तेव्हा त्यांचं मनोमिलन करण्याचं काम मी केलं होतं.
मधु कांबीकर या अभिनेत्री म्हणून कामाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक होत्या. म्हणजे अभिनय आणि नृत्यकौशल्य, असे दोन्ही एकाच अभिनेत्रीमध्ये असणं, हे फार दुर्मीळ. पण, मधु कांबीकरांनी दोन्ही कसोट्यांवर स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आणि त्या स्वतःही निर्माता झाल्या होत्या. त्यांनी एक ‘टेलिफिल्म’सुद्धा केली होती. पण, त्यावेळेस त्यांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे त्या पुढे कधी त्या फंदात पडल्याच नाहीत.
त्यांचा स्वभाव खूपच चांगला होता. त्या पटकन खुलायच्या नाहीत. पण एकदा जमलं की अगदी दिलखुलास गप्पा मारायच्या, आपलेपणाने वागायच्या. ज्या समाजात मुलींवर बंधनं होती, अशा ठिकाणाहून येऊन त्यांनी या क्षेत्रात नाव कमावलं. कुटुंबाचा, घरच्यांचा, सगळ्यांचा त्यांनी सांभाळ केला. कोणाला कमी पडू दिलं नाही. अक्षरशः पोटाला चिमटा देऊन बहिणींसाठी, बाकी नातेवाईकांसाठी त्यांनी खूप केलं आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे.
मधू कांबीकर यांची आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट व्हायची, कधी कोणत्या सोहळ्याला आम्ही एकत्र असायचो, त्यांच्या घरीही जाणं व्हायचं. त्या जेव्हा कोमात गेल्याचे समजले, तेव्हा मला फार वाईट वाटलं. अक्षरशः त्या अंथरुणाला खिळून असायच्या. आम्ही दोन-तीनदा त्यांच्या घरी गेलो भेटायला. पण, काही नाही. कोण आलं-गेलं त्यांना ते काहीच ओळखता येत नव्हतं. म्हणजे फक्त त्या अक्षरशः ढोलकीचा, घुंगरांचा आवाज ऐकला की हाताची बोटं हलवायच्या. थोडासा हात असा वरती नेल्यासारखा करायच्या.
आमच्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमाचा जो ‘लोगो’ आहे, तो त्यांच्या एका चित्रपटातील फोटोवरून घेतलेला आहे. त्यांनी मला तो फोटो दिला होता. ढोलकीवरती त्यांनी असा हात ठेवलाय आणि त्या उभ्या आहेत दिमाखात. तर त्यावरून आम्ही ‘मराठी तारका’चा तो ‘लोगो’ तयार केलेला आहे. दुःखही झालं की ज्या बाईने, ज्या अभिनेत्रीने आपलं संपूर्ण आयुष्य नृत्यासाठी समर्पित केलं, तिच्यावर ही अशी वेळ यावी, याच मला फार वाईट वाटलं. मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
-महेश टिळेकर
(शब्दांकन : कपिल देशपांडे)