दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कसारा–खर्डी तिसरी मार्गिका सुरू!

१४ किमी रेल्वेमार्गाचे लोकार्पण; कल्याण–कसारा मार्गावरील लोकलचा खोळंबा कमी होण्याची आशा

    18-Oct-2026
 
Kasara Khardi Third Railway Line
 
ठाणे (Kasara Khardi Third Railway Line) : मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. कसारा ते खर्डी या १४ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे १७ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आले. मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त गुरु प्रकाश यांच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण–कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पातील पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
 
कल्याण–कसारा मार्गावर लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक एकाच मार्गिकांवर अवलंबून असल्याने अनेकदा गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. तिसऱ्या मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढवण्यास आणि गाड्यांचा खोळंबा कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शहापूर, आसनगाव आणि कसारा परिसरातून मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पाचा लाभ मिळू शकतो. (Kasara Khardi Third Railway Line)
 
२०१६ मध्ये कामाला सुरुवात, पहिला टप्पा पूर्ण
 
कल्याण–कसारा तिसऱ्या मार्गिकेची घोषणा २०११ च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाला २४ जुलै २०१६ रोजी सुरुवात झाली. तब्बल दहा वर्षांनंतर कसारा–खर्डी हा पहिला टप्पा पूर्ण होऊन सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी कल्याण–कसारा–कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. (Kasara Khardi Third Railway Line)
 
पुढील टप्प्यांचे लक्ष्य २०२७ मध्ये
 
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डी ते आसनगाव हा पुढील टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर आसनगाव ते कल्याण हा टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होईल.
 
दरम्यान, या ऐतिहासिक कामाबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. (Kasara Khardi Third Railway Line)
 
 




संबंधित मजकूर