दिल्ली दंगल प्रकरणात आठ हिंदूंची निर्दोष मुक्तता; आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी

    18-Oct-2026   

Delhi Riots Case
 
मुंबई (Delhi Riots Case) : दिल्लीमध्ये २०२० दरम्यान झालेल्या हिंदूविरोधी दंगलीदरम्यान एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने आठ हिंदू आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता केली. कडकडडूमा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवीन सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या निकालाद्वारे कुलदीप सिंह, हरजीत सिंह (हॅपी), राहुल (अजय), सचिन रस्तोगी, भरत भूषण (लकी), संदीप (संजीव), धर्मेंद्र (धाम) आणि सचिन गुप्ता (मोपी) यांची निर्दोष मुक्तता केली. खजुरी चौक येथे जमावाने केलेल्या हिंसाचारादरम्यान बाब्बू नामक व्यक्तीवर हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप या आठ जणांवर होता.(Delhi Riots Case)
 
अशी माहिती आहे की, बाब्बू यांना २५ फेब्रुवारी २०२० रोजी जखमी अवस्थेत जेपीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जीटीबी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र दोन दिवसांनी, २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. बाब्बू हे रिक्षाचालक होते. २५ फेब्रुवारी रोजी कामावरून घरी परतत असताना खजुरी चौक येथे हिंसक जमावाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांच्या भावाने जबाबात सांगितले. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला.(Delhi Riots Case)
 
फिर्याद पक्षाच्या म्हणण्यानुसार, २५ फेब्रुवारी २०२० रोजी खजुरी चौक येथे जमलेल्या बेकायदा जमावात आरोपींचा समावेश होता. आरोपी शस्त्रांनी सज्ज होते आणि त्यांनी बाब्बू यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यात त्यांचा नंतर मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला. तसेच, विविध समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण होईल, अशा प्रकारे आरोपींनी कृत्य केल्याचा आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी फिर्यादी पक्षाचे आरोप फेटाळून लावले. हे संपूर्ण प्रकरण खोट्या आरोपांचा गठ्ठा असल्याचे त्यांनी म्हटले. फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबांवरही बचाव पक्षाने आक्षेप घेतला. हे साक्षीदार बनावट असून, खटल्याच्या नंतरच्या टप्प्यांत त्यांना प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला.(Delhi Riots Case)
 
या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या मूळ आरोपपत्रात १६ आरोपींची नावे होती. त्यानंतर २८ सप्टेंबर २०२० रोजी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या पूरक आरोपपत्रात धर्मेंद्र ऊर्फ धाम, सचिन गुप्ता ऊर्फ मोपी आणि सचिन रस्तोगी यांची नावे समाविष्ट करण्यात आली. पुढे कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश, कलम १९५ अंतर्गत आवश्यक मंजुरी आणि संबंधित कागदपत्रांसह दुसरे पूरक आरोपपत्र दाखल करण्यात आले. १८ मार्च २०२५ रोजी ११ मुस्लिम आरोपींची आरोपांतून मुक्तता करण्यात आली. त्याच दिवशी आठ हिंदू आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १४८ सह १४९, कलम १८८, कलम ३०२ सह १४९ आणि कलम १५३अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले.
 
फिर्यादी पक्षाने या खटल्यात एकूण २५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तीन सामान्य नागरिक आणि तीन पोलीस कर्मचारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सादर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, या तिघांपैकी कोणाच्याही साक्षीतून फिर्यादी पक्षाच्या आरोपांना पुष्टी मिळाली नाही. मोहम्मद जावेद यांनी जखमी व्यक्तीला एका हातगाडीवर पाहिल्याचे सांगितले; मात्र त्याच्यावर कोण हल्ला करत होते, हे आपण पाहिले नसल्याचे स्पष्ट केले. साबीर यांनी आपल्या दुकानाची लूट झाल्याबाबत साक्ष दिली, तर इम्रान यांनी जमावाने आपल्यालाच मारहाण केल्याचे सांगितले. इतर कोणतीही घटना आपल्या निदर्शनास आली नसल्याचे त्यांनी नमूद केले. या तिन्ही साक्षीदारांनी सरकारी वकिलांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या पोलिसी जबाबांनाही दुजोरा दिला नाही. त्यामुळे या तिघांनीही बाब्बू यांच्यावरील हल्ला प्रत्यक्ष पाहिलेला नव्हता, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.(Delhi Riots Case)
 
सर्व साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर, आरोपींवरील आरोप वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. आरोपी हिंसक जमावाचा भाग होते आणि त्यांनीच बाब्बू यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे पुरेसे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.(Delhi Riots Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर