शक्तितत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार असलेल्या ‘दशमहाविद्यां’ची आपण नवरात्रीच्या निमित्ताने माहिती करुन घेत आहोत. आजच्या दुसर्या भागात ‘तारा’, ‘छिन्नमस्ता’, ‘धूमावती’ आणि ‘भैरवी’ या महाविद्यांच्या माहात्म्याविषयी...
तारा
हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही संप्रदायांमध्ये उपास्य असलेली महाविद्या ‘तारा.’ ती आणि काली एकच होत, असे योगिनीतंत्र (२.१८) म्हणते.
‘तृ-तारयति’ आणि ‘त्रै-त्रायते’ या दोन्हींचा अर्थ वाचवणे, रक्षण करणे. थोडयात, उपासकांना संकटातून वाचवते ती ‘तारा.’ विश्वातील सर्वांत तेजस्वी तारा हिरण्यगर्भ सूर्य, हिंदू तंत्रानुसार अक्षोभ्य शिव किंवा बौद्ध तंत्रातील ‘अक्षोभ्य’ हा या महाविद्येशी संबंधित भैरव आहे. योग्य आहुतीच्या अभावी आलेल्या क्रोधातून त्याच्या शक्तीचा उग्र-तारा हा पैलू निर्माण होतो, तर आहुतीनंतर शांत होण्याने तारा हा पैलू. म्हणूनच या महाविद्येचा संबंध क्रोध-रात्रीशी आहे. ‘तारिणी’, ‘एकजटा’, ‘नील-सरस्वती’ वगैरे नावांनीसुद्धा ती ओळखली जाते. इतर सिद्धींबरोबरच साधकाला सर्व प्रकारच्या साहित्यरचनेचे कौशल्य प्रदान करणारी ती आहे, असे रुद्रयामलातील नील-सरस्वती स्तोत्रात म्हटले आहे.
तारा तंत्रात तिचे ध्यान असे वर्णिले आहे,
प्रत्यालीढपदार्प्पिताङ्घ्रिशवहृद्घोराट्टहासा परा|
खड्गेन्दीवरकर्त्रिखर्प्परभुजा हुङ्कारबीजोद्भवा॥
खर्व्वा नीलविशालपिङ्गलजटाजूटैकनागैर्युता|
जाड्यं न्यस्य कपालकर्तृजगतां हन्त्युग्रतारास्वयम्॥
प्रलयकाळीच्या शक्तिविहीन शवाच्या छातीवर उग्र-तारा आपल्या पायाची बोटे रोवून उभी आहे. संहारकार्याच्या पूर्तीचा आनंद तिच्या अट्टाहासातून व्यक्त होत आहे. चार हातांमध्ये तलवार, कमल, सुरा आणि कवटी आहे. ‘हूं’ या बीजमंत्रातून ती प्रकट होते. उंचीने कमी, पिंगट-कृष्णवर्णाचा एकपेडी केशसंभार, सर्वांगाभोवती नागवलय, अशी ती कपाल (कवटी) रूपातील जगताला स्वतःच्या ठायी आश्रय देऊन जाड्य म्हणजेच अज्ञान दूर करणारी आहे.
तारा आणि विष्णुचा रामावतार यांचे अद्वैत मुण्डमालातंत्र सांगते,
कृष्णस्तु कालिका साक्षाद्
राममूर्तिश्च तारिणी॥ १-१२०॥
शिवाय, याच विद्येने कृष्णाला कालियामर्दनाच्या वेळी वाचवले असेही म्हटले आहे,
व्यालानां दमने कृष्णरक्षणे यमुनाजले|
पपात तारिणीविद्या नीलवर्णासरस्वती॥
बौद्ध तंत्रशास्त्रानुसार ‘तारा’ ही महाविद्या अतिशय महत्त्वाची आहे. वज्रयानातील स्त्रीदेवतांना सहसा ‘तारा’ याच नावाने ओळखले जाते. जसे, ‘वरदातारा’, ‘धनदातारा’, ‘शीलातारा’, ‘महाश्रीतारा’ इत्यादी.
रुद्रयामल तंत्रानुसार या महाविद्येची उपासना बौद्ध तांत्रिक पंथात प्रचलित असलेल्या हिमालयीन महाचीन पद्धतीनुसार केली जाते, जी कुलाचार स्वरूप (पंचमकारयुक्त) आहे. एका मतप्रवाहानुसार ही पद्धत हिंदू परंपरेत आणण्याचे काम वसिष्ठांनी केले, तर काही विद्वानांच्या मते बौद्ध पंडित नागार्जुनाने.
छिन्नमस्ता
सैद्धांतिकदृष्ट्या ‘छिन्नमस्ता’ ही यज्ञरूपी सूर्याशी (आदित्य-विष्णु) संबंधित आहे. वैदिक संकल्पनेनुसार पाकयज्ञादि मूळ पाच यज्ञ शीर्षविहीन आहेत (छिन्नशीर्षो वै यज्ञः|) म्हणजे असे की, सूर्य आपल्या तेजाच्या काही विशिष्ट भागाचे (उच्छिष्ट किंवा प्रवर्ग्य) सतत उत्सर्जन करतो आणि त्यापासूनच या विश्वाची निर्मिती होते. म्हणूनच ‘उच्छिष्टात् सकलं जगत्’ असे म्हटले जाते. अशा रितीने हे प्रवर्ग्य अथवा विश्व हे मस्तक ठरते आणि यज्ञरूपी सूर्य छिन्नशीर्ष-मस्तकविहीन राहतो. म्हणूनच त्याला ‘कबंध’ म्हटले जाते. अशा या सूर्याची शक्ती ‘छिन्नमस्ता.’ सहस्रनामस्तोत्रात तिला ‘यज्ञाङ्गी’ म्हटलेले आहे, ते याच संदर्भावरून. कबंध-शिव (क्रोधभैरव) हा तिच्याशी संबंधित भैरव असून वीर-रात्री ही तिच्याशी संलग्न रात्र आहे.
छिन्नमस्ता तंत्रात वर्णिलेले तिचे ध्यान असे आहे,
प्रत्यालीढपदां सदैव दधतीं छिन्नं शिरःकर्तृकां|
दिग्वस्त्रां स्वकबन्धशोणितसुधाधारां पिबन्तीं मुदा॥
नागाबद्धशिरोमणिं त्रिनयनां हृद्युत्पलालङ्कृताम्|
रत्यासक्तमनोभवोपरि दृढां ध्यायेत्जवासन्निभाम्॥
गव्हाळ वर्ण आणि तीन नेत्र असलेल्या या महाविद्येने आपल्या डाव्या हाताने आपलेच कापलेले मस्तक, ज्याच्या जटांभोवती नाग गुंडाळलेले आहेत, धरलेले असून गळ्यातून उडणार्या रक्ताच्या धारा ती आनंदाने प्राशन करीत आहे. दिगंबरा, छातीवर रुळणारी कमलमाला अशी ती, एकमेकांत रममाण झालेल्या मदन आणि रति या जोडप्यावर घट्ट पाय रोवून उभी आहे. यातून विश्वनिर्मितीच्या मुळाशी असलेली कामकला आणि त्यासाठी आवश्यक असलेली स्त्री अथवा शक्ती तत्त्वाची, म्हणजेच या महाविद्येची ऊर्जस्वल क्रियाशीलता व्यक्त होते.
‘नारदपंचरात्र’ आणि स्वतंत्रतंत्रातील वर्णनावरून पार्वतीचे ‘छिन्नमस्ता’ हे रूप तिच्या भुकेल्या सख्यांच्या (जया, विजया किंवा डाकिनी, वर्णिनी) पोषणासाठी स्वतःचे मस्तक कापून त्यांना रक्तपान करवताना झाल्याचे दिसते. त्यामुळेच इतर ग्रंथातील ध्यानात वा चित्रात ती त्यांच्यासह रक्तप्राशन करीत आहे, असे दाखवले आहे. यातील प्रतीकात्मकता म्हणजे, स्वतः त्याग करून जगताचे पोषण करण्याचे तिचे स्वतःचे आत्यंतिक सामर्थ्य आणि तशी तिची तीव्र इच्छा होय. म्हणूनच सर्वविद्यास्तोत्रात तिला ‘त्यागवात्सल्यसम्पूर्णा’ म्हटलेले आहे. विशेष म्हणजे, तिचे रूप असे मस्तकविहीन असले, तरी ती प्रत्यक्षात ‘प्रज्ञावर्धनकारिणी’ असल्याचे म्हटलेले आहे, तर ती शुभानना असून कल्याणकारिणी आहे, असे स्कंद पुराण (खंड ४) सांगते.
‘छिन्नमस्ता’ ही ‘प्रचंड-चंडिका’, ‘प्राणतोषिणी’ या नावांनीदेखील ओळखली जाते. ‘दक्षिणाचार’ आणि ‘वामाचार’ अशा दोन्ही पद्धतींनी केलेली तिची उपासना राज्यप्राप्ती, मोक्षप्राप्ती, स्तंभनकर्म यासाठी फलदायी आहे. ‘छिन्नमस्तातत्त्व’ ग्रंथानुसार परशुराम, गोरखनाथ हे या महाविद्येचे उपासक होते, तर मुण्डमालातंत्राने ‘परशुराम’ हा अवतार आणि ‘छिन्नमस्ता’ यांचे एकरूपत्त्व सांगितले आहे.
धूमावती
‘धूमावती’ ही महाविद्या वेदांमध्ये वर्णित दुःख, दारिद्य्र, भूक, इत्यादींची अधिष्ठात्री असलेल्या ‘निर्ऋति’ या देवतेला किंवा पुराणातील ज्येष्ठालक्ष्मीला (अलक्ष्मी) समांतर आहे, असे म्हणता येईल. ही विधवा, म्हणजेच पतिविहीन (भैरवविहीन) मानली जाते.
‘नारदपांचरात्र’नुसार, एकदा भुकेने अतिशय व्याकुळ झालेल्या पार्वतीला पतीने काहीच खायला दिले नाही, म्हणून तिने चिडून शिवालाच खाल्ले. त्यामुळे तिच्या मुखातून धूम-धूर निघायला लागला. त्याचवेळी शिवदेखील आपल्या प्रभावाने तिच्या मुखातून सुखरूप बाहेर आले. परंतु, तिने आपल्या पतीला भक्षण केले, याचाच अर्थ आता ती विधवा झालेली आहे, असे म्हणून शिवाने तिला सौभाग्यलक्षणे त्यागायला सांगितली. ‘स्वतंत्रतंत्रा’तील संदर्भानुसार दक्षाच्या यज्ञात भस्म होऊन ती धूमरूपाने उरली म्हणून धूमावती.
शाक्तप्रमोदातील धूमावती तंत्र तिचे ध्यान असे वर्णिते,
विवर्णा चञ्चला दुष्टा दीर्घा च मलिनाम्बरा|
विमुक्तकुन्तला वै सा विधवा विरलद्विजा॥
काकध्वजरथारूढा विलम्बितपयोधरा|
शूर्पहस्तातिरूक्षाक्षा धूतहस्तावरान्विता॥
प्रवृद्धघोणा तु भृशं कुटिला कुटिलेक्षणा|
क्षुत्पिपासार्द्दिता नित्यं भयदा कलहास्पदा॥
इथे वर्णिलेले ध्यान सगळ्या अमंगल लक्षणांनी युक्त दिसते. निस्तेज चेहरा, मळके कपडे, थरथरणारे शरीर, अस्ताव्यस्त केस, दात पडलेले, लोंबकळणारे स्तन, लांबलचक नाक, रुक्ष डोळे, कुटिल नजरेने बघणारी, वक्रदेह असलेली, भूक आणि तहानेने व्याकुळ, दुष्ट, भांडखोर आणि भयंकर अशी ही एका हातात सूप घेतलेली, तर दुसर्या कंप पावणार्या हाताने वरदमुद्रा दर्शविणारी धूमावती कावळारूपी ध्वज असलेल्या रथावर आरूढ झालेली आहे.
तांत्रिक तत्त्वज्ञानानुसार या विश्वात चांगले-वाईट, मंगल-अमंगल असे सर्वच त्या एका आदिशक्तीपासून निर्माण झालेले आहे. त्या प्रत्येक तत्त्वाची कुणीतरी अधिदेवता आहे. मंगल घडवणे किंवा अमंगलाचे निवारण करणे सर्वस्वी तिच्या अधीन आहे. त्यामुळे वरपांगी अमंगळाची वाटणारी ही देवताच अमंगल दूर करणारी आहे. तिच्या हातातले सूप भक्ताच्या आयुष्यातील अमंगल गोष्टी गोळा करून घेण्याचे, म्हणजेच त्याला त्यापासून मुक्त करण्याचे साधन आहे.
धूमावती वामाचार पद्धतीने आणि अघोर साधनेने प्रसन्न होणारी असून ती स्वतः धनहीन म्हणवली जात असली, तरी साधकाला धन प्रदान करणारी आहे, असे तंत्रग्रंथांमध्ये म्हटलेले आहे.
भैरवी
‘भैरवी’ ही कालभैरव अथवा दक्षिणामुखी शिवाची शक्ती आहे. शिवाचे हे रूप नित्यप्रलयाची (विश्वातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणी होत जाणारा र्हास) अधिष्ठात्री देवता आहे. त्याचे हे सामर्थ्य या भैरवी शक्तीमुळे आहे, जिला त्रिपुरभैरवीदेखील म्हटले जाते.
भैरवीचे भैरवीतंत्रात वर्णिलेले ध्यान असे आहे,
उद्यद्भानुसहस्रकान्तिमरुणक्षौमां शिरोमालिकां|
रक्तालिप्तपयोधराञ्जपपटीं विद्यामभीतिं वरम्॥
हस्ताब्जैर्दधतीन्त्रिनेत्रविलसद्वक्त्रारविन्दश्रियम्|
देवीम्बद्धहिमांशुरत्नमुकुटां वन्दे समन्दस्मिताम्॥
हजारो उगवत्या सूर्यांचे तेज असलेली, लाल रेशमी वस्त्र धारण केलेली, गळ्यात कवट्यांची माला घातलेली अशी ही ‘भैरवी’ असून, तिचे स्तन रक्ताने माखलेले आहेत. तिच्या दोन हातांमध्ये जपमाला आणि पुस्तक असून इतर दोन हातांनी ‘अभयमुद्रा’ आणि ‘वरदमुद्रा’ ती दर्शवत आहे. तिचे हास्ययुक्त सुंदर मुखकमल तीन नेत्रांनी युक्त आहे. तिचा मुकुट चंद्रकांत मण्याने जडवलेला आहे.
अशाप्रकारे सर्वसामान्यपणे मनोहर वाटणारी वैशिष्ट्ये इथे दिसत असली, तरी, तिच्या व्यक्तिमत्त्वातील इतर पैलूंचे दर्शन घडवणारी बाकीही वैशिष्ट्ये लक्षणीय आहेत. ‘भैरव’ हे शिवाचे भयंकर असे रूप असल्याने त्याची शक्ती असलेल्या ‘भैरवी’चे स्वरूपदेखील तसेच आहे. सर्वेश्वरीविद्यास्तोत्र म्हणते तशी ती रक्तप्राशन करणारी, अक्राळ-विक्राळ तोंड पसरलेली, कुरूप, अंगभर मुण्डमाला परिधान केलेली, चिताग्नीवर आरूढ असलेली वगैरे दिसते.
कौलेश-भैरवी, सकलसिद्धिदा-भैरवी, विद्ध्वंसिनी-भैरवी, चैतन्य-भैरवी, कामेश्वरी-भैरवी, नित्या-भैरवी, रुद्र-भैरवी, वगैरे अनेक स्वरूपांमध्ये भैरवीची पूजा केली जाते. (क्रमशः)
(भाग-३ पुढील रविवारच्या अंकात)
-रंजना नायगावकर
९९६९७८९४३२