मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी पूजा सावंत ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटात रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. नवरात्रीनिमित्ताने पूजाशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला असता, आई, आजी आणि बहिणीचं तिच्या आयुष्यात असलेलं स्थान, तिचं प्राणीप्रेम याविषयी मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
पूजा सावंत चित्रपटांमधून वेगवेगळ्या रूपांत आम्हाला दिसली. म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीपासून तू कधी रोमँटिक, कधी थ्रिलर, कधी पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसलीस. सध्या नवरात्र सुरु आहे, तर आपण हा देवीमातेचा आशीर्वाद म्हणूया की पूजाला एवढ्या विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली?
हो, अगदीच. सध्या नवरात्रीचा काळ आहे. माझ्या घरीही देवी बसते. माझं आणि माझ्या आईचं नुकतचं एक संभाषण झालं. मी देवीच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हटलं, "आई, ‘ती’ पाठीशी आहे म्हणून एवढं सगळं झालं ना! आपण एका छोट्याशा सौंदर्य स्पर्धेतून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आजचा हा दिवस! आता काही दिवसांवर अजून एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यावर्षी इतके चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ही देवीच माझ्या पाठीशी उभी आहे,” आणि माझी आई म्हणाली की, "हो, तिचा तुला आशीर्वाद आहे, म्हणूनच झालं हे सगळं!” खूप मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. माझी कुलदेवतासुद्धा भवानीमाता. आमच्याकडे देवीचं खूप मनापासून केलं जातं. नऊ दिवस देवी आमच्या घरी विराजमान असते. शयतो मी नवरात्रीत बाहेर कुठे जात नाही. मी आतापर्यंत कधीच दांडिया किंवा गरबा खेळायला गेले नाही. कारण, घरीच देवी आहे. जागरण-गोंधळ भरपूर काय काय असतं. त्यामुळे जे काही आहे, ते आमच्या जगदंबेमुळेच आहे.
तुझ्या आयुष्यातही दोन दुर्गा आहेत, एक म्हणजे तुझी आई आणि एक म्हणजे तुझी आजी, ज्यांना तू खूप मानतेस, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील?
खरं सांगायचं तर दोन नव्हे तीन! माझी आई, आजी आणि माझी लहान बहीण. कारण, आईमुळे मी घडले. अर्थातच, आईमुळे हा मला मार्ग मिळाला. मला खरं तर प्राण्यांची डॉटर व्हायचं होतं. पण, आईच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आईने ते कलागुण ओळखले होते, तर तिने मला आग्रह केला आणि मग हा मार्ग सापडला. आजीचा पाठिंबा ना खूप वेगळा आहे. म्हणजे माझ्या आयुष्याचे आदर्श माझे आजोबा होते. आम्ही गमावलं त्यांना. परंतु, ती जागा आजीने घेतली. म्हणजे आजीने जो मला पाठिंबा दिलाय ना, तो मी शब्दांत नाही सांगू शकत.
माझी आजी आता ८० वर्षांची आहे. आता मागच्या काही महिन्यांपूर्वी ‘सालबर्डी’ प्रदर्शित झाला होता आणि ती म्हणाली, "मी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघणार.” ती ‘सालबर्डी’च्या संगीत अनावरण सोहळ्यालाही आली होती. आजीचा असा हा पाठिंबा आणि माझी लहान बहीण रुची जवळपास माझ्या मोठ्या बहिणीसारखीच! मला जिथे ‘नाही’ म्हणता येत नाही, तिकडे रुचीने मला आता शिकवलं की "दीदी, तुला आता ‘नाही’ कसं म्हणता आलं पाहिजे. म्हणूनच कुटुंबात एक मजबूत पाठिंबा जो असतो ना, तो माझ्या लहान बहिणीचा आहे. या तिघी दुर्गा माझ्या आयुष्यातील स्तंभ आहेत, असं मी म्हणेन.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही तू एक वेगळे स्थान निर्माण केले आहेस. शिवाय, यावर्षी एका पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत तू झळकली होतीस. वर्दी परिधान करणं, म्हणजे एक कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. कसा होता हा अनुभव?
माझे अजून सगळे ‘ड्रीम रोल’ पूर्ण झालेले नसले तरी त्यापैकी काही ‘रोल्स’ मात्र यंदाच्या वर्षी पूर्ण झाले. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. कारण, फारसा अनुभव गाठीशी नसताना एका क्षेत्रात आपण प्रवेश करतो. जिकडे काही ‘प्लॅनिंग’ नव्हतं की मी या वयापर्यंत अशा काही भूमिका साकारेन किंवा मी अभिनेत्री होईन. मुळात हा माझा प्लॅनच नव्हता आणि अशा क्षेत्रात येऊनसुद्धा हळूहळू का होईना, पण मी पुढे जात आहे. मी उगाचच कुठल्या मोहाला बळी नाही पडत की, या एका वर्षात एवढे चित्रपट आलेच पाहिजेत. यावर्षी जे झालं, तो एक योगायोग आहे. ते माझ्या हातात नव्हतं. त्यामुळे माझी भूमिका असणारे जे काही चार चित्रपट प्रदर्शित झाले, त्यांचं काही नियोजन केलं नव्हतं. ते आपसुकच घडलं. जर मी या क्षेत्रात नसते, तर मला प्राण्यांची डॉटर व्हायला आवडलं असतं.
तू म्हणालीस की, तू जर अभिनय क्षेत्रात आली नसतीस, तर प्राण्यांची डॉटर झाली असतीस. तुझ्या प्राणीप्रेमाशी आम्ही परिचित आहोतच. त्याबद्दल काय सांगशील?
मी म्हणेन की, हे प्राणीप्रेम माझ्याकडे आमच्या कुटुंबातूनच आले आहे. आमच्याकडे सगळेच प्राणीप्रेमी. आजोबा, पप्पा, मामा आणि आईसुद्धा. आईच्या माहेरी त्यावेळी ते चौथ्या मजल्यावर राहायचे. त्यांच्याकडेसुद्धा १०-१५ मांजरी असायच्या. त्या रोज चार माळे चढून यायच्या. मला व्यावसायिकदृष्ट्या याचा विचार करायचा होता; कारण आम्ही बर्याच ‘एनजीओ’ना मदत करतो. रस्त्यावरील कुत्रे, मांजरी, पक्षी यांच्यासाठी आम्ही बर्यापैकी काम करतो. खूप करतो, असं मी अजिबात म्हणणार नाही. आमची जेवढी क्षमता आहे, तेवढं आम्ही करतो.
बरं, नवरात्रीच्या या नऊ दिवसांत चैतन्य आणि एक सकारात्मक ऊर्जा वातावरणात संचारलेली असते, तर तुझ्या आयुष्यात अशाच एखाद्या कठीण प्रसंगी हीच सकारात्मक ऊर्जा मदतीला धावून आली, असा एखादा अनुभव...?
माझं आणि देवीच नातं खूप वेगळं आणि खास असं आहे. कारण की, जसं मी मगाशी म्हणाले, आमची कुलदेवताच व्यान-भवानीमाता आहे आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना, मी सगळ्यांना सांगेन, खरं तर, तुमचं जे कोणी कुलदैवत आहे, कोणीही असेल, मग देवी असेल, एखादा देव असेल, ठरावीक कारण आहे की ते तुमचं कुलदैवत आहे, तुमचा जन्म त्या कुळात झाला आहे, ते जे दैवत, ते तुमची रक्षाच करणार. फक्त त्याला आपण हाक मारायची. माझ्या बाबतीत बर्याचदा हे घडलंय. स्वतः मी वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरणाला जाते. आम्हाला माहीत नसतं, तिकडची ‘एनर्जी’ नेमकी कशी आहे. बरेचदा आपल्याला जाणवतं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे, तर अशावेळी मी कुलदेवतेला हाक मारायचे. जरा शांतपणे तिचं स्मरण करायचं आणि नंतर तुम्हाला ऊर्जा मिळते.
एकूणच कामाच्या दृष्टीने तुझ्या वर्षाची सुरुवात गोड झाली आणि शेवटही अगदी गोड होतोय. कारण, ‘लग्न आणि बरंच काही’ हा तुझा सुंदर चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि पुन्हा एकदा अभिजित खांडकेकर सहकलाकार म्हणून तुझ्यासोबत आहे. तेव्हा, एकूणच या चित्रपटाविषयी काय सांगशील?
‘लग्न आणि बरंच काही’ असं या सिनेमाचं नाव. पण, मी अनेकजणांना असंही बोलताना ऐकलं की, "अरे काय सतत लग्न, लग्न. काय त्याच विषयांवर सिनेमे.” पण, आपल्याकडे लग्नसंस्था कायमची बंद झाली आहे का? आपल्याकडे लग्नसंस्था कायमची बंद होणार आहे का? तर नाही. आजही लग्नसंस्थेवर विश्वास असणारी अनेक मंडळी आहेत. मीही त्यातलीच एक. चित्रपट हे समाजाचा आरसा दाखवणारं माध्यम आहे, असं मी म्हणेन. जे आपल्या समाजात घडतंय, ते कितीही चांगलं असो, कितीही वाईट असो, सिनेमा हे त्याच प्रतिबिंब. लग्न ही इतकी गमतीशीर गोष्ट आहे, ‘जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए’ हे वाय एकदम खरं आहे. त्यामुळे लग्न या गोष्टीमध्ये ना, तुम्ही जितकं शोधायला जाल, तितकं कमीच. कारण का, खूप गुपितं दडली आहेत.
तुमच्या चित्रपटातही पडद्यामागे काम करणार्या बर्याचशा महिलाच होत्या. तेव्हा, त्याविषयी काय सांगशील?
मागच्या दसर्याला आम्ही याची घोषणा केली होती आणि मला नेहमी असं वाटतं की, प्रत्येक घरात शेवटचा निर्णय बाईच घेते. म्हणजे, ती बाहेर जाऊन नोकरी करणारी स्त्री असो किंवा ती एक गृहिणी असो, शेवटी घरात काय बनणार, कोण येणार, घराला रंग कुठला, हे निर्णय बाईच घेते. त्यामुळे हा चित्रपट बनवताना प्रत्येक क्षेत्राची जी ‘एचओडी’ होती, आमची ‘हेड ऑफ डिपार्टमेंट’, ती एक स्त्री होती. आमच्या चित्रपटाचे संवाद लिहिले स्त्रीने, आमची सिनेमॅटोग्राफर, मेकअप, दिग्दर्शिका, संगीत-दिग्दर्शक सगळ्याच महिला आहेत.
(मुलाखत : कपिल देशपांडे)