सौदीचे नागरिक आणि ‘हुती’ अतिरेकी दोघेही इस्लामचेच बंदे. पण, दोघांमध्ये कट्टर शत्रूता. हे आठवण्यास कारण की, नुकतेच सौदीमध्ये बांगलादेशचे नागरिक नजरुल इस्लाम अब्दुल बशीर आणि सिती अख़्तर या जोडप्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कारण, हे जोडपे मक्का येथील एका मशिदीमध्ये अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जगभरात, त्यातही मुस्लीम देशांमध्ये युद्धाचा वणवा भडकला असतानाही, या देशांमध्ये उठसूट, या ना त्या कारणाने फाशीची शिक्षा देण्याबाबत अगदी स्पर्धा सुरू आहे.
सौदी अरबमध्ये, गेल्या नऊ महिन्यांत १७९ लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यातील ९४ लोक परदेशी होते. मात्र, या परिप्रेक्ष्यात श्रीलंकेचा अनोझन शिवरासा याला भाग्यवानच म्हणावे लागेल. त्याला ईशनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली खरी; पण श्रीलंकेने शिष्टाई करत ही शिक्षा रद्द करून घेतली.
शिवरासाला शिक्षा का सुनावण्यात आली?
तर, समाजमाध्यमांवरील एका व्हिडिओमध्ये हिंदू भाविक यात्रेला जात होते. त्यांच्यापाठी एक कुत्राही चालत होता. त्या कुत्र्याला एका मुस्लिमाने लाथ मारत, हिंदूंच्या देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. तर, या व्हिडिओवर हिंदू आणि त्यांच्या देव-देवतांबद्दल, अत्यंत आक्षेपार्ह संदेश कट्टरतावाद्यांनी टाकले. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा नागरिक असलेल्या; मात्र सौदी अरबमध्ये काम करत असलेल्या हिंदू शिवरासाने, इस्लामिक श्रद्धास्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे शिवरासाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला तुरुंगात डांबले गेले. तिथे त्याला कैद्यांनी पण मारहाण केली. ही घटना कळताच, सौदी अरबमधील श्रीलंकेचे राजदूत उमर लेब्बे अमीर अजवाद त्याला तुरुंगात भेटायला गेले आणि चक्रे फिरली. शिवरा साची शिक्षा माफ करून घेण्यात, श्रीलंका यशस्वी ठरली.
दुसरीकडे बांगलादेशमध्ये काय सुरू आहे? तर, वाहिदुज्जमान शमीम या युवकाचे नुकतेच ‘मॉब लिंचिंग’ झाले. शमीम मुस्लीम आहे म्हणजे, त्याचे ‘मॉब लिंचिंग’ गैरमुस्लिमांनी केला असेल, असे भारतातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटू शकतेच. पण, तसे नाही, तर शमीमचे ‘मॉब लिंचिंग’ त्याच्याच कौमवाल्यांनी केले आहे. त्याने पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले, असा त्याच्यावरचा आरोप.
अल्लाचे बंदे एकत्र जमले. त्यांनी शमीमला पकडून बेदम मारहाण सुरू केली. त्याच वेळी पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी शमीमची सुटका केली. गंभीर जखमी झालेल्या शमीमला त्यांनी इस्पितळात भरती केले. शमीमवर उपचार सुरू झाले, तो वाचला. पण, हे त्याचे वाचणे औटघटकेचेच होते. कारण, पोलिसांनी शमीमला कुठे नेले, याचा शोध घेत कट्टरपंथी इस्पितळापर्यंत पोहोचले. शमीम ज्या वॉडमध्ये होता, त्या वॉर्डचा दरवाजाच त्यांनी तोडला. इस्पितळातील रुग्णांच्या समोर या जमावाने, शमीमला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, ईशनिंदेच्या आरोपासाठी शमीमचा जीव गेला.
या सगळ्या परिप्रेक्ष्यात, इराणमध्ये तर काही काळातच ६०० लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नुकतेच नजमेह अमिनी या २३ वर्षांच्या तरुणीला फाशी देण्यात आली. इराणच्या सायबर पोलिसांनी तिच्या ऑनलाईन गतिविधीवर पाळत ठेवली. त्यांनी आरोप केला की, नजमेहने ‘शिया’ इस्लामींसाठी पूजनीय असलेल्या १२ इमामांविरोधात पोस्ट केली होती. तिच्यावर ईशनिंदेचा ठपका ठेवत, तिला फाशी सुनावण्यात आली. ईशनिंदा जर अज्ञानाने नशेच्या अधीन असताना केली, तर फाशी न होता ७४ कोडे मारण्याची शिक्षा असते. त्यामुळे फाशी टळावी म्हणून नजमेहने साक्ष दिली की, तिने ही पोस्ट टाकण्यापूर्वी चुकून मती भ्रमित करणारे, असे अन्न खाल्ले होते. पण, तरीही तिला फाशी झालीच. याचे उघड गुपित हेच की, ती इराणी राजसत्तेविरोधातील आंदोलनात सक्रिय होती. या पार्श्वभूमीवर भारतात विद्रोही, पुरोगामी, निधर्मी हिंदूद्वेष्टे हिंदूंच्या देव-देवतांवर अश्लील आक्षेपार्ह टिप्पणी करतात. पण, हिंदू कधीच म्हणणार नाहीत की, अमूक एक व्यक्तीने देवाबद्दल आक्षेपार्ह, अश्लील विधान केले, त्याला फाशी द्या. धर्मसंस्कृती आपली आपली! तर, या ईशनिंदेबद्दल मुस्लिमेतर जगातून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काय करायचे या ईशनिंदेच्या सजेचे?
-योगिता साळवी
९५९४९६९६३८