भारतीय हवाई क्षेत्रात उडणारे प्रत्येक विमान, हेलिकॉप्टरच्या नियंत्रणासह एखाद्या संशयित विमानावर लक्ष ठेवून, सुयोग्य कारवाईचे आदेश देणारी यंत्रणा म्हणजे भारतीय हवाई दलाची ‘फायटर कंट्रोलर’ टीम. याच टीमचा एक भाग असलेल्या ‘फायटर कंट्रोलर’ ‘स्कॉड्रन्ट लीडर’ अधीश्री अग्रवाल यांची प्रेरणादायी कहाणी...
आजोबा, वडील आणि मोठा भाऊ भारतीय सैन्यदलात सेवारत असल्याने, तिलाही सैन्याची ओढ वाटावी, यात विशेष असे काहीच नाही. पण, नेमकेपणाने तिने मार्ग निवडला तो हवाई दलाचा, तोही वयाच्या २०व्या वर्षी, हे मात्र विशेष! घरातून लाभलेला जिद्दीचा वारसा आणि त्यांच्याच मार्गदर्शनाच्या बळावर, भौतिकशास्त्रातील पदवी पूर्ण होण्याआधीच ती ‘एसएसबी’ उत्तीर्ण झाली. पदवी पूर्ण होताच, तिच्या हवाई दलातील कारकिर्दीने ‘टेक-ऑफ’ केले, आणि पुढे ती उत्तरोत्तर यशस्वी उड्डाणे घेतच राहिली. ही कथा आहे, ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू झालेल्या, ‘स्कॉड्रन्ट लीडर’ अधीश्री अग्रवाल यांची!
हैदराबादेतील ‘एअरफोर्स अॅकेडमी’मधून सामान्य प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, अधीश्री यांनी लखनौच्या ‘एअरफोर्स स्टेशन’मध्ये विशेष प्रशिक्षण घेत ‘फायटर कंट्रोलर’ पद मिळवले. भारतीय हवाई क्षेत्रात आलेल्या कोणत्याही संशयित वस्तूची पडताळणी करून, कारवाई करण्याच्या सूचना देण्याचे काम त्यांचे होते. या कामाची व्याप्ती एका वाक्यात सामावणारी नाहीच! एका वेळी ५० ते ६० विमाने-हेलिकॉप्टर्सना दिशा देणे, त्यांच्यात सुयोग्य अंतर राखण्याचीही संपूर्ण जबाबदारी ‘फायटर कंट्रोलर’वरच असते. ‘एटीसी’च्या कक्षेच्या वर त्यांची कक्षा असल्याने, त्यांच्याकडून विमानांचे नियंत्रण हाती घेणे आणि नंतर पुढील ‘एअर कंट्रोलिंग स्टेशन’ किंवा ‘लॅण्डिंग’साठी पुन्हा ते ‘एटीसी’कडे सुपूर्द करणे, हे ‘फायटर कंट्रोलर’चे कर्तव्य. याव्यतिरिक्त आणखी काही असूचिबद्ध विमान दिसत नाही ना, हे पाहण्यासाठी पापणी लवायचीही मुभा मिळत नसे. काहीच संशयित दिसत नसतानाही, दिवसभर छोट्यातील छोटा दिवा पाहणे, हे खरेच चिकाटीचे काम. काही संशयास्पद दिसल्यास, केवळ दोनच मिनिटांत वरिष्ठांना त्याची कल्पना देऊन, सहा मिनिटांच्या आत वैमानिक रवाना करण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागत. त्याचबरोबर संशयित विमानाची छायाचित्रे आणि माहिती मिळवणे, वैमानिकांकरवी त्या विमानाला भारतीय हवाई हद्दीतून किंवा ‘ओपन एअर’मधून बाहेर जाण्याची सूचना देणे, त्या विमानाने प्रतिकार केल्यास ‘लॉन्च’ची आज्ञा देत विमानावर ‘फायर’ करवणे, ही सगळीच कामे ‘फायटर कंट्रोलर’ अधीश्री करत.
त्यांचे पहिले पोस्टिंग पंजाबमधील बर्नाळा! परिणामी, एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही सीमांकडे त्यांना लक्ष ठेवता आल्याने, त्यांचा पाया पक्का झाला. जणू संपूर्ण देशाचीच जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर होती. ‘ब्लॅक रूम’च्या बंदिस्त वातावरणात प्रदीर्घ काळ बसून सगळे ‘कंट्रोलर्स’ त्यांच्या-त्यांच्या विमानांशी संपर्कात असताना, त्याच गोंगाटात, प्रचंड तणावात असंख्य कामांचे व्यवस्थापन करणे, त्यात एकाग्रता ठेवण्याचे कसब अधीश्री यांनी आत्मसात केले. याशिवाय, अधीश्री यांना दिवसाला दहा सरावमोहिमा घ्याव्या लागत. त्यासाठी वैमानिकांच्या दोन टीम करणे, त्यांच्याशी चर्चा करून मोहिमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि त्यानंतर मोहिमेबद्दल विमर्शसत्रे घेणे, ही त्यांची जबाबदारी असे.
‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वानुसार दहा वर्षे कर्तव्य बजावून, अधीश्री २०२० साली निवृत्त झाल्या. परंतु, सैन्यदलांविषयीची आपुलकी आणि देशकार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळेच विविध वयाच्या नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी, ‘ट्रूप-अप’ ही संस्था स्थापन केली. यामध्ये त्या विविध ‘टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटी’मधून, सर्वांगीण नेतृत्व विकास घडवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यात वेगवेगळ्या साहसी खेळांसह ‘नॉट्स’, सेल्फ डिफेन्स’, ‘राफ्ट बील्डिंग-रोईंग’ंसारखे उपक्रम घेत, विमर्शसत्रांतून त्यांच्या प्रात्यक्षिक उपयोजनाचीही माहितीही दिली जाते. यातून जनसामान्यांना सैन्यजीवनाचा, शिस्तीचा, नियोजनाचा अनुभव देण्याचे महत्कार्य अधीश्री करत आहेत.
अधीश्री त्यांचे शीघ्र निर्णय घेण्याचे कौशल्य आणि घटना घडून गेल्यावर उपचारात्मक उपाय करण्यापेक्षा, आधीच प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा त्यांच्या विचारांचा वारसा त्या आता पुढे सामान्य नागरिकांना देत आहेत. प्रत्येक भारतीयाला सैनिकी प्रशिक्षण देण्याकडेच, अधीश्री यांनी पहिले पाऊल टाकले आहे. ‘स्कॉड्रन्ट लीडर’ अधीश्री अग्रवाल यांच्या दूरदृष्टीला आणि राष्ट्रसेवेला सर्व भारतीयांचा कडक सॅल्यूट!
लेखक- ओवी लेले