‘नयी नवेली’ : पौराणिक कथेवर आधारित ‘फॅन्टसी कॉमेडी’

    17-Oct-2026

 Nayi Naveli Movie Review 
 
बॉलीवूडमध्ये सध्या ‘हॉरर-कॉमेडी’ हा ट्रेंडिंगचा विषय. या विषयाला नेहमीच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘नयी नवेली’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला. ‘नयी नवेली’ हा चित्रपट भयपट आणि विनोदाचा एक उत्तम मिलाफ म्हणावा लागेल. अभिनेत्री यामी गौतमचा उत्कृष्ट अभिनय आणि इतर साहाय्यक कलाकारांचा विनोद तुम्हाला हसवेल. चित्रपट काही ठिकाणी कमी पडतो, पण ते इतक्या कौशल्याने हाताळले आहे की, तुम्हाला कथेचा किंवा अधिक अचूकपणे सांगायचे, तर एका युगातून दुसर्‍या युगात होणार्‍या प्रवासाचा आनंद मिळू लागेल.आपल्याकडे अनेक पौराणिक कथा आहेत. अशाच एका पौराणिक कथेचा आणि पात्रांचा आधार घेत, या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. दिग्दर्शक बालाजी मोहन यांचा ‘नयी नवेली’ हा चित्रपट रामायण आणि रावणाचे पौराणिक संदर्भ देऊन याच सूत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. ही कल्पना रंजक आणि आश्वासक आहे. परंतु, चेटकिणींच्या जगाला रामायणाच्या भव्य पौराणिक कथानकाशी जुळवून घेण्याच्या या अव्यवस्थित प्रयत्नात, चित्रपट आपल्या मूळ संकल्पनेपासून काहीसा भरकटतो.
 
चित्रपटाची कथा मेरठमधील एका उत्साही आणि काहीशा विक्षिप्त अवस्थी कुटुंबाभोवती फिरते, ज्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आहेत. मोहिनी (यामी गौतम) नावाची एक नवविवाहित सून या कुटुंबात येते. मोहिनी सुंदर, हुशार आणि एक आदर्श सून आहे, जी आपल्या बुद्धीचा वापर करून कुटुंबाच्या समस्या सोडवते. घरातील वातावरण लवकरच बदलते आणि कुटुंबातील प्रत्येकाला ती आवडू लागते. मोहिनीचा नवरा, राजा अवस्थी (आदिनाथ कोठारे), तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिला आपली आदर्श जीवनसाथी मानतो. मात्र, राजाचा भाऊ, बंटू (अनुराग ठाकूर), मोहिनीचे विचित्र वागणे आणि घरात घडणार्‍या विचित्र घटना पाहून तिच्यावर संशय घेऊ लागतो. बंटूला संशय येतो की, मोहिनी ही एक सामान्य माणूस नसून एक चेटकीण आहे. आपल्या नवीन वहिनीबद्दलचे सत्य उघड करण्यासाठी बंटू गुप्तहेर बनतो. दरम्यान, कुटुंब मोहिनीला आपले भाग्य मानते. अशा प्रकारे रहस्य, अलौकिक शक्ती, विनोद आणि रोमांचक घटनांनी वेढलेली एका सुखी कुटुंबाची कथा उलगडते. मोहिनी खरोखरच एक चेटकीण आहे का, की बंटूच्या संशयामुळे कुटुंबासाठी अडचणी निर्माण होतील; सिनेमात घडणार्‍या विचित्र घटनांमागे कोण आहे; या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावर मिळतील.
 
दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या ‘नई नवेली’ चित्रपटाचा पूर्वार्ध मनोरंजक आहे. एका विचित्र कुटुंबात एक सुंदर आणि रहस्यमय सून येते, जी त्या कुटुंबाची गुंतागुंत उलगडते, त्याचबरोबर ती चेटकीण असल्याचा संशयही निर्माण करते, ज्यामुळे कथा रंजक बनते. मोहिनी आणि तिचा दीर बंटू यांच्यातील संवादामुळे विनोदाची भर पडते, तर मीता वशिष्ठ (बुआ) आणि सुष्मिता मुखर्जी (दादी) यांच्या अभिनयानेही भरपूर हास्य निर्माण होते. मात्र, मध्यांतरानंतर चित्रपटाची कथा भरकटते.
 
‘नयी नवेली’ हा चित्रपट संपूर्णपणे यामीभोवती फिरतो. चित्रपटातील मोहिनी हे एक अत्यंत महत्त्वाचे मुख्य पात्र. यामी गौतमने साकारलेली तिची भूमिका खरोखरच अप्रतिम आहे. जेव्हा ती नववधू म्हणून येते, तेव्हा तिच्यात एक वेगळीच शान आणि सौंदर्य झळकते. पण, मग जेव्हा तीच सून बुरख्याआडून भेदक नजरेने पाहते, तो एक भयावह अनुभव असतो. काही अतिनाटकीय दृश्ये वगळता, यामीचे अ‍ॅशन सीन्स बर्‍यापैकी चांगले आहेत. पण, तिच्या अभिनयासोबतच तिचा आवाज ही तिची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. चित्रपटाच्या अनेक भागांमध्ये उच्च पट्टीतल्या संवादांची गरज होती आणि यामीने ते त्याच पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे.
 
चित्रपटात यामीच्या नवर्‍याची भूमिका आदिनाथ कोठारेने साकारली असून, त्यात त्याने धमाल काम केले आहे. चित्रपटाची खरी जान अनुराग ठाकूर आहे, जो बंटूच्या भूमिकेत आपल्या अचूक विनोदी टायमिंग, मार्मिक संवाद आणि खुमासदार हावभावांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतो. सुनीता राजवार, मीता वशिष्ठ आणि सुष्मिता मुखर्जी यांसारख्या अनुभवी कलाकारांनी छोट्या भूमिकांमध्येही आपली छाप सोडली आहे. एकंदरीत, कलाकारांचा अभिनय हा चित्रपटाचा सर्वांत मजबूत पैलू ठरतो.
दिग्दर्शक बालाजी मोहन यांनी दिव्या निधी शर्मा आणि हिमांशु शर्मा यांच्यासोबत पटकथेचे सहलेखन केले आहे. हा चित्रपट कलाकारांपेक्षा दिग्दर्शक आणि लेखकांसाठी अधिक आव्हानात्मक असल्याचे दिसते; कारण आजकाल दिग्दर्शकांसाठी पौराणिक विषयावर चित्रपट बनवणे, हे अनेकदा एक मोठे आव्हानच. तरीही, बालाजीने ही शतकानुशतके जुनी कथा ज्या कौशल्याने हाताळली आहे, ते कौतुकास्पद आहे. कुठल्याही क्षणी संकोच वाटत नाही. मात्र, काही ठिकाणी काही दृश्ये अनावश्यक होती, असे वाटते.
 
चित्रपटाचे ‘व्हीएफएस’ समाधानकारक नाही, अनेक ठिकाणी त्रुटी दिसून येतात. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे, यात शंका नाही; पण त्याच्या एक दिवस आधी दिवाळी! अशा अनेक त्रुटी खटकतात. चित्रपटातील संगीत काही वेळा प्रसंगाला किंवा पार्श्वभूमीला साजेसे वाटत नाही. यात असे एकही गाणे नाही, जे तुमच्या लक्षात राहील. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी उत्तम आहे. एकूणच काय, हॉरर-कॉमेडी चित्रपटांच्या चाहत्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्वणी आहे.
 
निर्माता : आनंद एल. राय, हिमांशु शर्मा
दिग्दर्शक : बालाजी मोहन
लेखक : बालाजी मोहन, दिव्या निधि शर्मा, हिमांशु शर्मा
कलाकार : यामी गौतम, आदिनाथ कोठारे, सुनीता राजवार, मीता वशिष्ठ, सुष्मिता मुखर्जी, अनुराग ठाकुर, प्रतीक पचौरी आणि सोनल झा
अवधी : २ तास २० मिनिटे
 
-कपिल देशपांडे




संबंधित मजकूर