समाजसेवेचा निःस्वार्थ दीपस्तंभ

    17-Oct-2026
 
 
Aditi Gaikwad Social Work
 
‘सेवा परमो धर्मः’ हा विचार कृतीतून जगत समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत दीपस्तंभ ठरलेल्या आदिती गायकवाड यांच्याविषयी...
 
समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देत त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे, हेच खर्‍या समाजसेवेचे उद्दिष्ट असते. समाजाप्रतिची बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक परिवर्तनाची तळमळ यांचा संगम म्हणजेच, आदिती प्रकाश गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व.
 
संपादिका, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या, ‘लाईफ कोच’ आणि ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ अशा विविध भूमिका त्या समर्थपणे पार पाडत आहेत. आदिती या ‘डेक्कन फिनिक्स पब्लिकेशन्स’च्या संपादिका असून, ‘ईशा फाऊंडेशन’ आणि ‘राजनंदनी सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम त्या राबवतात. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आणि गरजू व्यक्तींनाही स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळावी, हा त्यांच्या कार्यामागील प्रमुख विचार.
 
समाजसेवेची व्याप्ती ही मदत करण्यापुरतीच मर्यादित नसून, ती गरजूंना सक्षम करण्याचीही प्रक्रिया आहे. याच जाणिवेतून त्या सतत कार्यरत असतात. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, यावर आदिती यांचा ठाम विश्वास आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, करिअर समुपदेशन, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्या विविध उपक्रमही राबवतात. ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याबरोबरच, गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटपही करतात. पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांना बूट, अभ्यासाची पुस्तके आणि आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी आजवर केले आहे.
 
विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि समाजमाध्यमांचा योग्य वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, यासाठीही त्या सातत्याने मार्गदर्शन करतात. महिलांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनविणे, हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे क्षेत्र. महिलासुरक्षा, स्वसंरक्षण, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन या विषयांवर त्यांनी, विविध महाविद्यालये आणि संस्थांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले आहे. महिलांनी आधी स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्यावी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि आत्मविश्वासाने जीवन जगावे, हाच संदेश त्या आपल्या कार्यातून सतत देतात.
 
किशोरवयीन मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि लैंगिक शिक्षणांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीही, त्या अखंड प्रयत्नशील आहेत. समाजातील अनाथ मुले, मूकबधिर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांप्रति आदिती यांच्या मनात विशेष जिव्हाळा आहे. अनाथाश्रमांमध्ये धान्य, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करणे, मूकबधिर संस्थांमधील मुलांना मदत करणे आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवणे, अशा उपक्रमांतून त्या त्यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय देतात.
 
आपला वाढदिवसही केवळ वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न ठेवता, समाजसेवेसाठी समर्पित करण्याची त्यांची परंपरा आहे. देवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केल्यावर, गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य, गोशाळेत जनावरांसाठी चारा आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्नेहभोजन देण्यासारखे उपक्रमही त्या राबवतात. समाजातील गरजू व्यक्तींच्या चेहर्‍यावरचे समाधान, हेच सर्वांत मोठे बक्षीस असल्याचे त्या सांगतात. अवयवदान, रक्तदान, कर्करोग प्रतिबंध, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणसंवर्धन यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्यासाठीही, त्या सक्रिय आहेत.
 
वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, महिला आरोग्य शिबिरे आणि समुपदेशनाच्या माध्यमांतून, समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पोलीस दलातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानाची जाणीव समाजाला व्हावी, यासाठीही त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘एक धागा शौर्यासाठी’ या संकल्पनेतून, पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. पोलीस अधिकारी कर्तव्य बजावत असताना, त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक त्याग करावे लागतात, ही जाणीव समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश त्यामागे होता. ‘डेक्कन फिनिक्स पब्लिकेशन्स’च्या माध्यमातून, आदिती साहित्य क्षेत्रातही योगदान देत आहेत. ‘अर्धांगिनी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होताना त्यांनी, पोलीस अधिकार्‍यांच्या पत्नींचा त्याग, समर्पण आणि सहजीवनातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा समृद्ध व्हाव्यात आणि समाजाला नवी प्रेरणा मिळावी, अशीच त्यांची भूमिका आहे. ‘लाईफ कोच’ आणि ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून त्या युवकांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार, ध्येयनिश्चिती आणि जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतात. ‘सेवा परमो धर्मः’ हा विचार कृतीतून जगत, समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असणार्‍या आदिती यांना ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!
 
-विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८




संबंधित मजकूर