शस्त्रक्रिया म्हटली की, अनेकांच्या मनात आजही भीती निर्माण होते. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आज अनेक शस्त्रक्रिया वेदनारहित आणि अधिक सुरक्षित करणे शक्य झाले आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती ऍनेस्थेसिया अर्थात भूलशास्त्राची. दरवर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक भूल दिन’म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ ऐतिहासिक शोधाची आठवण करून देत नाही तर रुग्णसुरक्षेमध्ये भूलतज्ज्ञांचे योगदान अधोरेखित करतो.(World Anaesthesia Day 2026)
भूलशास्त्राचा ऐतिहासिक प्रवास
१६ ऑक्टोबर १८४६ रोजी अमेरिकेतील बोस्टन येथील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या बुलफिंच थिएटरमध्ये विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन या दंतवैद्याने इथरचा वापर करून भूल देण्याचे सार्वजनिक प्रात्यक्षिक केले. शल्यचिकित्सक जॉन कॉलिन्स वॉरेन यांनी रुग्णावर शस्त्रक्रिया केली. या घटनेने आधुनिक भूलशास्त्राच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले. त्यापूर्वी शस्त्रक्रिया म्हणजे असह्य वेदना, भीती आणि मानसिक ताण. भूलशास्त्राच्या विकासामुळे शल्यचिकित्सकांना अधिक वेळ घेऊन अचूकपणे शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. छाती, पोट आणि मेंदू यांसारख्या गुंतागुंतीच्या भागांवरील शस्त्रक्रियांनाही नवी दिशा मिळाली.(World Anaesthesia Day 2026)
ऍनेस्थेसिया म्हणजे काय?
ग्रीक भाषेतील ‘an’ म्हणजे अभाव आणि ‘aisthesis’ म्हणजे संवेदना. ऍनेस्थेसियाचा अर्थ संवेदना कमी करणे किंवा नियंत्रित करणे असा होतो. शस्त्रक्रियेदरम्यान वेदना टाळण्यासाठी, रुग्णाला आवश्यकतेनुसार बेशुद्ध किंवा वेदनारहित ठेवण्यासाठी आणि शरीराची जीवनावश्यक कार्ये सुरक्षित राखण्यासाठी औषधे, उपकरणे आणि आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. भूल देण्याची पद्धत शस्त्रक्रियेचा प्रकार, रुग्णाचे वय, आरोग्य, औषधे आणि संभाव्य जोखीम लक्षात घेऊन ठरवली जाते.
भूल देण्याचे प्रमुख प्रकार
१. सर्वसाधारण भूल (General Anaesthesia) : औषधांच्या साहाय्याने रुग्णाला नियंत्रित बेशुद्धावस्थेत ठेवले जाते. श्वसनमार्ग सुरक्षित ठेवणे, श्वसन आणि रक्ताभिसरण यांचे निरीक्षण करणे तसेच गरजेनुसार कृत्रिम श्वसन देणे यांचा यात समावेश होतो.
२. क्षेत्रीय भूल (Regional Anaesthesia) : शरीराच्या विशिष्ट मोठ्या भागातील संवेदना तात्पुरत्या बंद केल्या जातात. स्पायनल, एपिड्युरल आणि पेरिफेरल नर्व्ह ब्लॉक ही त्याची उदाहरणे आहेत. प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी आणि अनेक शस्त्रक्रियांनंतर वेदनाशमनासाठीही यांचा उपयोग होतो.
३. स्थानिक भूल (Local Anaesthesia) : शरीराच्या छोट्या भागातील संवेदना कमी करण्यासाठी औषध दिले जाते. दंतचिकित्सा, त्वचेवरील लहान शस्त्रक्रिया आणि काही किरकोळ प्रक्रियांमध्ये याचा वापर होतो. काही वेळा रुग्णाच्या गरजेनुसार या पद्धती एकत्रही वापरल्या जातात.
भूलतज्ज्ञ करतात तरी काय?
भूलतज्ज्ञ हा एमबीबीएस पदवीनंतर भूलशास्त्रातील तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ असतो. या प्रशिक्षणामध्ये भूल देण्याचे विविध प्रकार, रुग्णाच्या जीवनावश्यक कार्यांचे निरीक्षण, श्वसनमार्गाचे व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितींमध्ये पुनर्जीवन आणि शस्त्रक्रियेनंतरचे वेदनाशमन यांचा समावेश असतो.
भूलतज्ज्ञांची भूमिका केवळ रुग्णाला झोपवण्यापुरती मर्यादित नाही. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची तपासणी करून हृदय, फुफ्फुसे, मधुमेह, रक्तदाब, ऍलर्जी, नियमित औषधे, पूर्वीच्या भूल प्रक्रियेतील अडचणी आणि इतर आजारांचा आढावा घेतला जातो. रुग्णाला शस्त्रक्रिया व भूल यांची माहिती देऊन त्याच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यानुसार भूल आणि वेदनाशमनाची योजना आखली जाते.
शस्त्रक्रियेदरम्यान हृदयाचे ठोके, रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी, श्वसन आणि शरीराचे तापमान यांचे निरीक्षण केले जाते. रक्तस्राव, रक्तदाबातील गंभीर बदल, श्वसनाचा त्रास किंवा औषधांची प्रतिकूल प्रतिक्रिया उद्भवल्यास त्वरित उपचार करावे लागतात. भूलतज्ज्ञ शल्यचिकित्सक आणि परिचारिका यांच्याशी समन्वय साधून संपूर्ण पथकाच्या सुरक्षित कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतात.
शस्त्रक्रिया संपल्यानंतर भूल सुरक्षितपणे उतरवणे, रुग्णाला शुद्धीवर आणणे, वेदना व मळमळ नियंत्रित करणे आणि श्वसन व्यवस्थित असल्याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे असते. विमानाचे उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग दोन्ही कौशल्याने करणाऱ्या पायलटप्रमाणे भूलतज्ज्ञ रुग्णाला भूल देण्यापासून ते सुरक्षितपणे जागे होण्यापर्यंत काळजीपूर्वक मार्गदर्शन करतात.(World Anaesthesia Day 2026)
आधुनिक भूलशास्त्र : ऑपरेशन थिएटरच्या पलीकडे
आज भूलतज्ज्ञ अतिदक्षता विभाग (ICU), आपत्कालीन पुनर्जीवन(CPR) गंभीर जखमी रुग्णांचे व्यवस्थापन(Trauma Care), प्रसूतीवेदना शमन (Painless Labour) आणि दीर्घकालीन वेदनांचे उपचार (Pain Management)अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कर्करोगाच्या वेदनाशमनासाठी पेन क्लिनिकमध्येही ते सेवा देतात. एंडोस्कोपी, रेडिओलॉजी आणि इतर शस्त्रक्रियेशिवाय केल्या जाणाऱ्या काही प्रक्रियांमध्येही भूलतज्ज्ञांची गरज असते. आधुनिक भूलशास्त्रात रुग्णाची सुरक्षितता केवळ ऑपरेशन थिएटरपुरती मर्यादित नसते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची प्रकृती शक्य तितकी स्थिर करणे, शस्त्रक्रियेदरम्यान जीवनावश्यक कार्यांचे संरक्षण करणे आणि नंतर वेदना, मळमळ, श्वसनाच्या अडचणी व इतर गुंतागुंत ओळखून उपचार करणे हे सर्व टप्पे महत्त्वाचे आहेत. योग्य रुग्णात लवकर हालचाल, पुरेसे पोषण आणि वैयक्तिक गरजेनुसार पुनर्वसन यामुळे बरे होण्याच्या प्रक्रियेला मदत होते.(World Anaesthesia Day 2026)
भूल आणि गैरसमज
भूल दिली म्हणजे रुग्णाची प्रकृती गंभीरच असते किंवा भूल दिल्यानंतर शुद्धीवर येणे कठीण असते, असे अनेक गैरसमज समाजात आढळतात. प्रत्यक्षात भूलतज्ज्ञ प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र जोखीममूल्यांकन करतात आणि योग्य पद्धत निवडतात. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीरातील बदल सतत पाहून औषधांचे प्रमाण आणि उपचार आवश्यकतेनुसार बदलले जातात. काही रुग्णांना भूलनंतर तात्पुरती गुंगी, मळमळ, घशात खवखव किंवा थंडी वाजणे जाणवू शकते. बहुतेक वेळा या तक्रारींवर उपचार करता येतात; मात्र असामान्य लक्षणे दिसल्यास आरोग्यसेवकांना त्वरित सांगणे आवश्यक असते.
रुग्णांनी भूलतज्ज्ञांना प्रश्न विचारण्यास संकोच करू नये. कोणती भूल दिली जाणार, वेदना कशा नियंत्रित केल्या जातील, नियमित औषधांपैकी कोणती घ्यायची किंवा थांबवायची आणि घरी परतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची, हे आधी समजून घेणे उपयुक्त ठरते. औषधे स्वतःहून बंद करणे किंवा उपवासाच्या सूचना दुर्लक्षित करणे टाळावे. भूलतज्ज्ञांचे प्रशिक्षण शरीरक्रिया, औषधशास्त्र, श्वसनमार्ग व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याच्या कौशल्यांवर आधारित असते. त्यामुळे त्यांचे काम केवळ शस्त्रक्रियेच्या वेळेतच नव्हे, तर गंभीर आजारात जीवन वाचविण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरते. भूलसेवेची उपलब्धता आणि गुणवत्ता वाढविणे ही आरोग्यव्यवस्थेचीही जबाबदारी आहे.(World Anaesthesia Day 2026)
सुरक्षित भूल : रुग्णाचीही महत्त्वाची भूमिका
आधुनिक औषधे, उपकरणे आणि सततच्या निरीक्षणामुळे भूल अधिक सुरक्षित झाली आहे; मात्र कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया पूर्णपणे जोखमीविरहित नसते. रुग्णाने आपले आजार, नियमित औषधे, ऍलर्जी, तंबाखू किंवा मद्यसेवन आणि पूर्वी भूल देताना आलेल्या अडचणींची माहिती भूलतज्ज्ञांना द्यावी. उपवासासंबंधी आणि औषधांबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शस्त्रक्रियेपूर्वी योग्य तपासणी, उपकरणांची तयारी, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैद्यकीय पथकातील प्रभावी संवाद हे सुरक्षिततेचे आधारस्तंभ आहेत. रुग्णालयात वापरली जाणारी सुरक्षित शस्त्रक्रिया तपासणीसूचीही महत्त्वाची ठरते.
सुरक्षित भूल ही एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण आरोग्यपथकाची जबाबदारी आहे. भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, परिचारिका, तंत्रज्ञ आणि रुग्ण यांच्यातील स्पष्ट संवादामुळे चुका टाळण्यास मदत होते. योग्य निरीक्षण, वेळेवर निर्णय आणि शस्त्रक्रियेनंतरची नियोजित देखभाल यामुळे रुग्णाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि समाधानकारक होऊ शकतो.
‘जागतिक भूल दिन २०२६’ ची जागतिक संकल्पना ‘Before, During and Beyond Surgery’ अशी आहे. यातून भूलतज्ज्ञांची भूमिका शस्त्रक्रियेपूर्वीच्या तयारीपासून शस्त्रक्रियेदरम्यानच्या सुरक्षिततेपर्यंत आणि त्यानंतरच्या पुनर्प्राप्तीपर्यंत पसरलेली आहे, हा संदेश दिला जातो. भूलतज्ज्ञ अनेकदा पडद्यामागे काम करतात; तरीही रुग्णाचा प्रत्येक श्वास, हृदयाचे ठोके आणि जीवनावश्यक कार्ये सुरक्षित ठेवण्यात त्यांचे योगदान अनमोल असते. वेदनारहित शस्त्रक्रिया आणि सुरक्षित पुनर्प्राप्ती यांच्या संगमावर उभे असलेले शास्त्र म्हणजे भूलशास्त्र!(World Anaesthesia Day 2026)
- डॉ. नीलम नलगे, सल्लागार भूलतज्ज्ञ