अभिनय क्षेत्रात येऊ पाहणार्यांसाठी दीपस्तंभासारखे काम करत, ‘कलाकार घडवणारा कारखाना’ अशी ओळख मिळवणार्या रोहित खुडेविषयी...
"जब तक बैठने को न कहां जाए, शराफत से खड़े रहो| ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं!” ‘जंजीर’ चित्रपटातील या संवादाची नक्कल करताना, वरळी कोळीवाड्यातल्या बच्चन अर्थात, रोहित खुडे त्या भूमिकेशी समरस होतो. ते पाहताना काही क्षणासाठी का होईना; पण कडक शिस्तीच्या पोलीस अधिकार्याचा तो प्रसंगही आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा तरळतो. त्यामुळे ‘बिंब-प्रतिबिंब’ असा भेदही नाहीसा होतो.
अभिनय ही रोहितची चौथी मूलभूत गरज! घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे, अभिनयासारखे अशाश्वत क्षेत्र पूर्णवेळ निवडण्याचे धाडस त्याने केले नाही. मात्र, खासगी रुग्णालयात नोकरी करतानाही, नवशिक्या कलाकारांना तो आज अभिनयाचे धडे देत आहे. आजतागायत त्याचे अनेक विद्यार्थी अभिनय, लेखन, दिग्दर्शन, कलादिग्दर्शन अशा क्षेत्रांत स्थिरावले.
बालपणापासूनच रोहितला अभिनयाने अक्षरशः झपाटले होते. दादरच्या कीर्ती महाविद्यालयात त्याच्या कलेला मूर्त रूप मिळाले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांतून त्याने अभिनयाची छाप सोडली. पात्राशी एकरूप होत साकारलेल्या भूमिकेतून, त्याने एकांकिकांना बळ दिले. त्याने वठवलेल्या भूमिकांना, प्रेक्षकांसह परीक्षकांचीही भरभरून दाद मिळाली. पण, तरीही नशीब त्याच्यावर रुसलेलेच होते. पण, तो थांबला नाही, तसा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नाही. कलाकार म्हणून जगण्याचेच त्याने मनावर कोरले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्याची तारेवरची कसरत सुरू झाली. जबाबदारी त्याला खुणावू लागली. घर चालणार कसे? या भयचिंतेने त्याने परळच्या खासगी रुग्णालयात नोकरी पत्करली. पण, अंगीची कला त्याला शांत झोपू देईना. मग ‘कीर्ती’च्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आणि रोहितच्या नेतृत्वाखाली, ‘रंगसंगती कलामंच ग्रुप’ची स्थापना झाली. ‘रंगसंगती’च्या माध्यमातून हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले अन् सोबतच रोहितच्या अभिनयकौशल्याचे नाट्य प्रबोधनात रूपांतरही झाले.
याचदरम्यान रोहितने अनेक नाट्यपुस्तके वाचली. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर अशा प्रख्यात मराठी नाटककारांच्या साहित्याशी तर त्याची घनिष्ठ मैत्रीच झाली. पुस्तके वाचता-वाचताच, तो माणसे वाचायला, त्यांना घडवायला शिकला. प्रत्येकवेळी तो व्यक्ती आणि कलाकार म्हणूनही प्रगल्भ होत गेला.
कथानकातील गुप्त संकेत, थ्रिलर, भयपट, विनोदी असे भाव तो ‘रंगसंगती’च्या विद्यार्थ्यांसमोर उभे करत असे, त्यांना समजावत असे. शिकवता-शिकवता तोही घडतच होता. अभिनयाच्या छटा त्याच्या जाणिवेला साद घालत होत्या. वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, स्नेहल शिदम हे ‘रंगसंगती’चेच ‘प्रॉडक्ट’ असल्याचे सांगताना, रोहितची छाती अभिमानाने फुलन येते.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावरही ‘कीर्ती’शी त्याची नाळ तुटली नाही. नोकरीचा डोलारा सांभाळताना कीर्ती महाविद्यालयात लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारी अन् ‘रंगसंगती’, असा दायित्वाचा तिहेरी भार त्याने समर्थपणे सांभाळला. कीर्ती महाविद्यालयाला आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत, सलग पदके जिंकून देण्यातही रोहितचा वाटा मोलाचा. सोबतच ‘यूथ’ स्पर्धा, खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘रंगसंगती’च्या यशाची पारितोषिके, रोहितच्या कौशल्याची साक्ष देतात. त्याच्या कार्यकुशलतेला मुंबई विद्यापीठाकडूनही दाद मिळाली आणि येथूनच त्याच्या नाट्य चळवळीचा पुढचा अंक सुरू झाला. मुंबई विद्यापीठामध्ये ‘फाऊंडेशन ऑफ ड्रामॅटिक्स’चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू असून, रोहित यात ‘फॅकल्टी’ म्हणून अभिनयाचे धडे देत असून, आजवर त्याने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे.
चेहर्यावरचे हावभाव, डोळ्यांची लकब, संवादातील चढ-उतार, शब्दफेक, अचूक टायमिंग, आवाजातील गांभीर्य, भारदस्तपणा असे भाव असलेल्या अभिनयाचा बाज शिकवताना, तो विद्यार्थ्यांसमोर चित्रसृष्टीच साकारतो. एखाद्या नवशिक्या कलाकाराच्या ग्रामीण पठडीला धक्का न लावता, तीच त्याची ओळख बनवतो. त्यातूनच गावरान भाषा, संस्कृतीचे प्रातिनिधिक चित्र नाटक-चित्रपटात उमटते, आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वालाच नवे आयाम मिळतात. समग्र शिक्षण ही त्याची एकसुरी शैली नाही, तर व्यक्तिवेधातून विद्यार्थ्याची अनोखी धाटणी ओळखत ज्ञानार्जन करणे, हीच त्याची हातोटी!
अभिनय हा त्याचा पिंड असला, तरी कलाकाराला घडवण्यात त्याचा हातखंडा आहे. या कलादातृत्वानेच त्याला ओळख मिळवून दिली. तो हातचे काहीच राखत नाही, अगदी खुल्या दिलाने अभिनयाचे ज्ञान भरभरून वाटतो. रोहितच्याच भाषेत सांगायचे तर, "मला कलाकार घडवायला आवडतं. जे आम्हाला खूप ‘स्ट्रगल’ करून मिळालं, ते आता मनमोकळेपणाने देण्यात समाधान वाटतं. कलाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून पुढे येण्याचं स्वप्न जरी उराशी बाळगलं असलं, तरी सध्या मन विद्यार्थ्यांना घडवण्यातच रमतय.” अशा पद्धतीने कलेचे ज्ञान वाटत कलाकार घडवणार्या रोहित खुडे यांना पुढील वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारतच्या हार्दिक शुभेच्छा!
-लेखक-रोहित गुरव
--
संपादकीय विभाग
दै. मुंबई तरुण भारत