उरणच्या गवताळ प्रदेशात दुर्मीळ ‘नमाक्वा डव्ह’चे दर्शन; महाराष्ट्रातील दुसरी नोंद

    16-Oct-2026

Namaqua Dove

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) –
आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशांत प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि भारतात अत्यंत दुर्मीळ असलेल्या ‘नामाकूवा डव्ह’ (Namaqua Dove) या होला जातीमधील पक्ष्याचे दर्शन उरणमधील गवताळ प्रदेशात घडले आहे (Namaqua Dove). १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास जेएनपीटीच्या मागील बाजूस, पुंडे गावाजवळील गवताळ प्रदेशात पक्षी निरीक्षक वैभव पाटील यांना हा पक्षी दिसला (Namaqua Dove). महाराष्ट्रात या पक्ष्याची ही दुसरी नोंद असल्याने राज्यातील पक्षिवैविध्याच्या दृष्टीने या निरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Namaqua Dove)

 

‘केप डव्ह’ (Cape Dove) आणि ‘लाँग-टेल्ड डव्ह’ (Long-tailed Dove) या नावांनीही हा पक्षी ओळखला जातो. कबुतरांच्या कुळातील हा आकाराने लहान, मात्र लांब आणि निमुळती शेपटी असलेला पक्षी आहे. नराच्या चेहऱ्यावर, घशावर आणि छातीच्या पुढील भागावर काळा रंग दिसतो. त्याची चोच पिवळसर-लालसर असून शरीराचा बहुतांश भाग राखाडी-तपकिरी रंगाचा असतो. मादीचे रंगरूप तुलनेने फिकट तपकिरी असते. या पक्ष्याचा मुख्य अधिवास आफ्रिका खंडातील कोरडे प्रदेश, सवाना आणि विरळ झुडपी भागांत आहे. अरबी द्वीपकल्पासह पश्चिम आशियातील काही भागांतही तो आढळतो. प्रामुख्याने वनस्पतींच्या बिया हे त्याचे खाद्य असून तो जमिनीवर उतरून खाद्य शोधतो. त्याच्या हालचाली प्रदेशानुसार बदलतात. काही भागांत तो हंगामी स्थलांतर करतो, तर काही ठिकाणी स्थानिक किंवा भटक्या स्वरूपाच्या हालचाली करतो.

 

भारतात या पक्ष्याच्या नोंदी अत्यंत मर्यादित आहेत. गुजरातमधील खिजडिया पक्षी अभयारण्यात डिसेंबर २०१७ मध्ये त्याची नोंद झाली होती. त्यानंतर गुजरातमधील नळसरोवरसह काही ठिकाणीही हा पक्षी दिसल्याचे नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईजवळील अंबू बेटावर एका प्रौढ नर ‘नामाकूवा डव्ह'चे दर्शन घडले होते. आता उरणमधील जेएनपीटी परिसरात झालेल्या नव्या निरीक्षणामुळे महाराष्ट्रातील या पक्ष्याच्या नोंदीत भर पडली आहे. विशेष म्हणजे, यावेळी हा पक्षी पुंडे गावाजवळील गवताळ अधिवासात दिसला. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा नोंद झालेल्या या पक्ष्याच्या दर्शनामुळे उरण परिसरातील गवताळ अधिवास आणि तेथील पक्षिवैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. किनारपट्टीवरील गवताळ प्रदेश, पाणथळ जागा आणि इतर नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी अशा दुर्मीळ पक्षिनोंदी महत्त्वपूर्ण ठरतात.

 





संबंधित मजकूर