
मुंबई - Ashok Sarafमराठी रंगभूमीवर नात्यांचे भावविश्व आणि तरुण पिढीसमोरील अंमली पदार्थांच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कलाकारांचे कौतुक केले. सुप्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रजनी व प्रदीप वेलणकर आणि तुषार दळवी यांची उपस्थिती या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली.
या खास प्रसंगी नाटकाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची घोषणा करण्यात आली.Ashok Saraf
आजच्या तरुण पिढीसमोर उभी असलेली अंमली पदार्थांच्या व्यसनाची समस्या आणि त्याचे आयुष्यावर होणारे परिणाम यांवर भाष्य करणारे ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नाटक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक प्रश्नांवर विचार करायला लावणाऱ्या या नाटकाने पन्नासाव्या प्रयोगाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या सुवर्णमहोत्सवी प्रयोगानिमित्त आयोजित समारंभात चौरंगी एंटरटेन्मेंटतर्फे सामाजिक जाणिवेतून एक विशेष घोषणा करण्यात आली.Ashok Saraf
महाराष्ट्रासमोर असलेल्या दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत, ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ या नाटकासह संस्थेच्या ‘काटकोन त्रिकोण’ या दुसऱ्या नाटकाच्या आगामी काही प्रयोगांचे उत्पन्न दुष्काळ निधीसाठी देण्याचा मानस यावेळी जाहीर करण्यात आला. नाट्यकलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच गरजूंच्या मदतीसाठी योगदान देण्याचा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.Ashok Saraf
याबद्दल निर्माते अजित भुरे म्हणतात, ‘’नाटकांच्या आगामी प्रयोगांचे उत्पन्न दुष्काळ निधीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा मानस आहे. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजासाठी योगदान देण्याचेही प्रभावी माध्यम आहे. आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून गरजूंपर्यंत मदत पोहोचावी, हीच अपेक्षा आहे.’’Ashok Saraf