एका खोलीत स्वयंपाक, त्याच खोलीत संसार, कोपर्यात सुरू असलेला छोटासा व्यवसाय आणि दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करणारी मुलं... घराबाहेर पडताच समोर येणार्या चिंचोळ्या गल्ल्या, डोयावरून जाणार्या विद्युततारा आणि घरांना लागून वाहणारे सांडपाणी. हे चित्र केवळ एखाद्या झोपडपट्टीचे नाही, तर मुंबईच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या धारावीचे! याच वास्तवाच्या शेजारी आहे हजारो हातांना काम देणारी उद्योगव्यवस्था, महिलांना स्वावलंबी बनवणारे गृहउद्योग, पिढ्यान्पिढ्या जपलेली कौशल्ये आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द. धारावीच्या या दोन्ही पैलूंचा अनुभव देणारे ‘धारावी एसपिरियन्स सेंटर’ नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुले झाले आहे. धारावी आज कशी आहे आणि ‘उद्याची धारावी’ कशी असू शकते, याचा प्रवास या केंद्रातून उलगडतो.
धारावीची ओळख : झोपडपट्टीपलीकडचे वास्तव
धारावीचे नाव जागतिक स्तरावर घेतले जाते, तेव्हा अनेकदा तिची ओळख दाटीवाटीच्या वस्त्यांशी जोडली जाते. मात्र, धारावीची कहाणी एवढ्यापुरती मर्यादित नाही. विविध भाषा बोलणारे समुदाय, वेगवेगळ्या प्रांतांतून आलेली माणसे, त्यांचे सण-उत्सव, कला आणि परंपरा यांतून धारावीने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या या परिसराचे सामाजिक विश्व विलक्षण वैविध्यपूर्ण आहे.
‘धारावी एसपिरियन्स सेंटर’च्या पहिल्या भागात याच वैशिष्ट्यांचे दर्शन घडते. स्थानिक गल्ल्या, हिप-हॉप कलाकार, गायक, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि विविध समुदायांचे जीवन यांची मांडणी करून धारावीची वेगळी ओळख समोर आणली आहे. धारावी म्हणजे केवळ निवासाची समस्या असलेला परिसर नव्हे, तर स्वतःची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि सामाजिक जिव्हाळा जपणारे एक जिवंत जग आहे, याची जाणीव येथे होते.
नऊ हजार कोटींच्या अर्थव्यवस्थेमागची मेहनत
धारावीच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर येथील उद्योगांचे महत्त्व स्पष्ट होते. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या या परिसरात कुंभारकाम, चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन, जरीकाम, कापडनिर्मिती, पापड उद्योग, खाद्यपदार्थनिर्मिती आणि पुनर्प्रक्रिया असे अनेक व्यवसाय चालतात. अनेक उद्योग घरांमध्ये किंवा मर्यादित जागेत सुरू असतात. त्याच जागेत कुटुंबाचा संसार आणि उत्पादनाचे काम अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली जाते.
महिलांच्या हाताला काम देणारे पापड उद्योग, पारंपरिक कौशल्य जपणारे कुंभार आणि चामड्याच्या वस्तू तयार करणारे कारागीर हे धारावीच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतिनिधी आहेत. पुनर्प्रक्रिया उद्योगातूनही हा परिसर महत्त्वाचे योगदान देतो. या सगळ्या उद्योगांमागे केवळ आर्थिक उलाढाल नाही, तर हजारो कुटुंबांची उपजीविका आहे. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाचा विचार करताना घरांच्या पुनर्बांधणीबरोबरच उद्योगांच्या भवितव्याचाही विचार आवश्यक ठरतो.
एका खोलीत सामावलेले आयुष्य
‘धारावी एसपिरियन्स सेंटर’मधील सर्वाधिक प्रभावी भाग म्हणजे, येथील दैनंदिन जीवनाची हुबेहूब साकारलेली प्रतिकृती. अरुंद जिने, ताडपत्र्यांची छपरे, एकावर एक उभारलेल्या झोपड्या, डोयावरून जाणार्या विद्युततारा आणि घरांच्या दाराशी असलेली गटारे यांमधून धारावीच्या वस्त्यांचे चित्र उभे राहते.
एका छोट्याशा खोलीत महिला स्वयंपाक करत आहे, शेजारी एक व्यक्ती शिवणकाम करत आहे आणि दारात असलेल्या छोट्या जागेत त्याच छोट्या दिव्याच्या प्रकाशात मुलांना अभ्यास करावा लागतोय. हे दृश्य पाहताना घर म्हणजे केवळ विश्रांतीची जागा नसून, अनेक कुटुंबांसाठी तेच कार्यशाळा, दुकान आणि अभ्यासाची खोली असल्याचे जाणवते. धारावीतील वास्तवाचा हा अनुभव केवळ भावनिक नाही; तो नागरी सुविधांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधतो.
आजच्या धारावीपासून उद्याच्या धारावीपर्यंत...
वर्तमानातील धारावीचे चित्र पाहिल्यानंतर केंद्रात भविष्यातील धारावीची संकल्पना मांडण्यात आली आहे. आधुनिक इमारती, नियोजित रस्ते, मोकळ्या जागा, उद्याने आणि सुधारित नागरी सुविधांनी युक्त परिसराचे दृश्य लक्षवेधी ठरते. आज ज्या ठिकाणी दाट वस्त्या आहेत, त्या परिसराचे भविष्यातील स्वरूप कसे असू शकते, याची कल्पना या मांडणीतून मिळते. या संकल्पनेत सहा प्रमुख बाबींवर भर देण्यात आला आहे. निसर्गस्नेही जीवनासाठी हरित क्षेत्रे, सामुदायिक उद्याने, खेळाची मैदाने आणि ‘वॉटरफ्रंट प्रोमेनेड’ची कल्पना आहे. मेट्रो, रेल्वे, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जोडणी अधिक सक्षम करण्याचे नियोजनही मांडण्यात आले आहे.
स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित रस्ते आणि नियमित वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच आरोग्य, स्वच्छ वाहतूक, ऊर्जा व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपताना शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याची संकल्पनाही या आराखड्यात दिसते. केंद्रात मांडलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या ‘एसआरए’ प्रकल्पांच्या तुलनेत १७ टक्के अधिक जागेची तरतूद करण्याची संकल्पना आहे. नव्या इमारतींच्या देखभालीसाठी दहा वर्षांच्या व्यवस्थेचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या तरतुदींचा प्रत्यक्ष लाभ रहिवाशांपर्यंत कसा पोहोचतो, हे अंमलबजावणीच्या टप्प्यावर स्पष्ट होईल.
झोपडीऐवजी ३५० चौ. फुटांची सदनिका
‘धारावी पुनर्विकास प्रकल्पां’तर्गत पात्र झोपडीधारकांसाठी धारावीतच ३५० चौ. फुटांच्या चटई क्षेत्राची वन-बीएचके सदनिका प्रस्तावित असल्याचे ‘एसपिरियन्स सेंटर’मधील मांडणीतून दाखवण्यात आले आहे. मर्यादित जागेत संपूर्ण कुटुंबाचा संसार उभा करणार्या रहिवाशांसाठी ही जागा महत्त्वाची ठरू शकते. स्वयंपाकघर, स्वतंत्र खोली आणि आवश्यक घरगुती वापरासाठी नियोजित जागा यांमुळे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर करण्याची संकल्पना आहे.
विशेष म्हणजे, मर्यादित क्षेत्रफळातही नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहावी, यासाठी घरांच्या आराखड्यात तब्बल चार खिडयांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वयंपाकघरासह प्रत्येक खोलीत खिडकी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. तसेच, या घरातही दोन स्वच्छतागृहे असतील. त्यामुळे घरातील कोंदटपणा आणि सार्वजनिक स्वछतागृहांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करणार्या धारावीकरांना नव्या घरातून आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
जुन्या इमारतींतील पात्र रहिवाशांसाठी ५०० चौ. फुटांचे घर
धारावीतील पुनर्विकासाच्या नियोजनात केवळ झोपड्यांमध्ये राहणार्या कुटुंबांचाच विचार नाही, तर धारावीतील जुन्या आणि जीर्ण इमारतींमध्ये राहणार्या पात्र रहिवाशांचाही समावेश आहे. ‘एसपिरियन्स सेंटर’मध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘रिन्यूअल कॅटेगरी’अंतर्गत पात्र रहिवाशांसाठी ५०० चौ. फुटांच्या चटई क्षेत्रफळाच्या सदनिकेची संकल्पना मांडण्यात आली आहे. या घरांची रचना टू-बीएचके स्वरूपाची असून, दोन स्नानगृहांसह अधिक प्रशस्त अंतर्गत जागेचे नियोजन करण्यात आले आहे. येथे उल्लेखलेले ५०० चौ. फूट क्षेत्रफळ हे ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स कायद्या’नुसार (मोफा) चटई क्षेत्रफळ ‘रेरा’ नव्हे, म्हणजेच भितींचे क्षेत्रफळ वगळून ५०० चौ. फुटांची ही घरे असतील.
घरांच्या रचनेत हवा आणि प्रकाशाला प्राधान्य
धारावीतील सध्याच्या घरांमध्ये जागेची कमतरता आणि नैसर्गिक प्रकाशाचा अभाव या दोन प्रमुख समस्या आहेत. अनेक घरांमध्ये स्वयंपाक, झोप आणि अभ्यास यांसाठी मर्यादित जागेचाच वापर करावा लागतो. नव्या घरांच्या संकल्पनेत या अडचणी कमी करण्यासाठी अंतर्गत रचनेवर विशेष भर देण्यात आला आहे. या अपार्टमेंट्सची रचना सिंगापूर, हाँगकाँग इत्यादी देशांतील विविध परदेशी सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून आणि त्यातून प्रेरणा घेऊन करून करण्यात आली आहे. त्यामुळे घराच्या प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होणार्या जागेची कल्पना रहिवाशांना घेता येते.
विकासाच्या आराखड्यात माणूस केंद्रस्थानी हवा
धारावीचा पुनर्विकास म्हणजे केवळ झोपड्यांच्या जागी इमारती उभारणे नव्हे; येथे राहणार्या माणसांचे जीवनमान सुधारणे, त्यांची उपजीविका सुरक्षित ठेवणे आणि सांस्कृतिक अस्मिता जपणे, हे त्याचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे. अनेक कुटुंबांचे घर आणि व्यवसाय एकाच जागेत असल्याने, पुनर्वसन करताना त्यांच्या कामासाठी आवश्यक जागेचा विचार करणे महत्त्वाचे ठरेल. स्थानिक उद्योग टिकले, रोजगाराच्या संधी वाढल्या आणि नागरी सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध झाल्या, तरच पुनर्विकास सर्वसमावेशक ठरेल. ‘अब मेरी धारावी बदलेगी’ हा संदेश नव्या आशेची जाणीव करून देतो.
प्रतिकृतीपासून प्रत्यक्ष घरापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा
‘धारावी एसपिरियन्स सेंटर’मधील या सदनिकांच्या प्रतिकृतींमुळे पुनर्विकासानंतरच्या घरांचे स्वरूप रहिवाशांना समजून घेता येते. धारावीकरांसाठी ‘हक्काचे घर’ म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत; ते सुरक्षितता, आरोग्य, मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वातावरण आणि कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी मिळणारी जागा आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याबरोबरच, स्थानिक रोजगार, नागरी सुविधा आणि परवडणारी देखभाल यांचीही खात्री होणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे लहानशा जागेत संसार करणार्या धारावीकरांसाठी प्रशस्त घराचे स्वप्न निश्चितच आशादायी आहे. या स्वप्नाचे प्रत्यक्ष घरात रूपांतर कसे प्रभावी असेल, याचीच प्रचिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे येते.