सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चे आहे. विविध क्षेत्रांत ‘एआय’चा आज वापर वाढताना दिसत आहे. यामुळे जरी कामाचे स्वरुप सुलभ झाले असले, तरी या तंत्रज्ञानाच्या वापराला भावनेची सांगड घालणे व्यवस्थापकीय यंत्रणांच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक बदल होत असून, त्या नव्या बदलांचा आढावा घेणारा लेख...
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच, ’एआय’चे महत्त्व आणि माहात्म्य आता सर्वमान्य झाले आहे. व्यक्तीपासून व्यवसायाला पूरक व प्रेरक अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवास प्रक्रियेमध्ये, मानवीय पैलूंचे महत्त्वही नाकारता येणार नाही. उद्योग-व्यवसायात धोरणात्मक निर्णय, समस्यांची सोडवणूक, संवाद क्षमता, व्यावहारिक लवचीकता व मुख्य म्हणजे, स्वतःसह सर्वांना समजून घेण्याची क्षमता याबाबीही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
आज उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी निगडित शिक्षण व करिअर नियोजन, या विषयामध्ये झालेले वा होणारे बदल स्पष्टपणे दिसतात. परिणामी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोडीलाच विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया, संगणकीय पद्धती व विश्लेषणामध्ये वेगाने मोठे बदल घडत आहेत. आजवर परंपरागतरीत्या मानवीय प्रयत्नांतून हाताळले जाणारे काम आता, अद्ययावत व यांत्रिकी पद्धतीने हाताळले जाते. त्यानुरूपच कंपनीचे कामकाज व कर्मचार्यांचे काम या दोन्ही स्तरांवर बदल होताना दिसतात. याचे परिणाम कामाची अपेक्षा व आवश्यकता, या महत्त्वपूर्ण घटकांवरही होताना दिसत आहेत. परिणामी, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात वेगाने बदल होत आहेतच. मात्र, त्याच वेळी आधुनिक, प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाला विविध मानवीय पैलूंची जोड मिळणेही आवश्यक असेच.
‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता! या शब्दांमध्येच प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारल्या जाणार्या मानवी म्हणजेच, कर्मचार्यांच्या आकलन-वर्तनाशी निगडित परस्परपूरक प्रक्रियांचा समावेश दिसतो. परिणामी, विकसित तंत्रज्ञान व प्रगल्भ मानसिकता या दोन्हींचा समन्वय यामध्ये अपेक्षित आहे. संगणकीय व प्रगत कार्यपद्धती, तंत्रज्ञानावर आधारित कार्यशैलीचा अवलंब व नव्या संशोधनाची वेळेत व यशस्वीपणे अंमलबजावणी, या गुणविशेषांचा कर्मचार्यांमध्ये विकास करण्यावर अलीकडे प्रमुख कंपन्यांनी सुरुवात केली आहे. त्यातही मुख्य भर दिला जातो तो कामकाजातील समस्या सोडवतानाच, कर्मचार्यांची कार्यक्षमता व त्याद्वारे वाढत्या व्यावसायिक विकासावर. यामध्ये कर्मचारी व कंपनी या दोहोंची प्रगती यात भर घालू शकते.
कर्मचार्यांना केवळ कार्यक्षमच नव्हे, तर भविष्यकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करणेही आवश्यक आहे. हे मोठे आव्हानपर व तेवढेच अनिवार्य काम असूनही , ही बाब ‘एआय’च्या अंमलबजावणीची पार्श्वभूमी तयार करते. परिणामी कर्मचार्यांची कार्यक्षमता, मोठी जबाबदारी घेण्याची क्षमता, तसेच प्रगत पद्धतीचे आणि तंत्रज्ञानावर आधारित काम करण्याची तयारी होते. तसेच, नव्या गरजांसाठीच्या पूर्वप्रशिक्षणारख्या विविध बदलांशी जुळवून घेण्याची मानसिकता विकसीत करणे सहजशय होते. या सार्या प्रशिक्षणाचे फायदे वैयक्तिक स्तरावरही संबंधित कर्मचार्यांना, आणि व्यवस्थापन स्तरावर कंपन्यांना होत असतात, हे उल्लेखनीयच.
याचाच परिणाम म्हणजे, आज अनेक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये ‘एआय’सारख्या प्रणालीला प्रशिक्षित कर्मचार्यांची निवड वा पदोन्नतीसाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये उद्योगविश्वाचे बदलते स्वरूप व कामाचे शिक्षण घेतलेलेच नव्हे; तर बौद्धिक-भावनांचे सांगड घालणार्या व्यक्तीही अधिकाधिक यश प्राप्त करू शकतात, हे आजवर अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच व्यवसाय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक, व्यवस्थापनपर अभ्यासाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिल्यास, असे विद्यार्थी भविष्यात अधिक प्रभावीपणे करिअर करून आपला विकास साधू शकतात. तंत्रज्ञान व ‘एआय’ यांचा समन्वय साधणारे, भविष्यात आपल्या क्षेत्रात परस्पर समन्वय, निर्णयक्षमता,नेतृत्व, संवाद, प्रयत्नशीलता यात आपला प्रभाव पाडू शकतात.
आज व्यवस्थापनासारख्या क्षेत्रांमध्ये, संवादासह विश्लेषणाचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. याचा उपयोग वैयक्तिकच नव्हे, तर संस्थागत स्तरावर सहजपणे केला जाऊ शकतो. हे करताना विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनापासून व्यावसायिक, मार्केटिंग वा प्रकल्प व्यवस्थापनासारख्या क्षेत्रात, कृत्रिम बुद्धिमत्तेचा यथोचित वापर सुरू झाला आहे. शिवाय, त्याचे फायदेही दिसू लागले आहेत. विशेषतः मोठ्या वा विस्तृत स्वरूपातील मजकूराचे संकलन आणि मांडणी, रचना-आखणी व त्याची नेमकी निर्मिती, आपल्या विचारांना अद्ययावत संदर्भांची साथ देणे, माहितीचे कमी वेळात संकलन करणे, त्याचे विश्लेषण करणे असे ‘एआय’चे बहुआयामी फायदे होत असतात.
तंत्रज्ञानाच्या कक्षा विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान वा संगणकीय पद्धतीपलीकडे विस्तारत आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रम व त्याच्या प्रसाराची भूमिका महत्त्वाची आहे. साचेबद्ध शैक्षणिक अभ्यासक्रमाची चाकोरी मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराद्वारे करिअरची सुरुवात नव्हे, तर त्यामध्ये प्रगती करताना आज तंत्रज्ञानाला संवादकौशल्य व आर्थिक व्यवहार क्षमतेची, संशोधनाला संवाद क्षमतेची, ‘मार्केटिंग’च्या मानवीय पैलूंची आणि मानव संसाधन क्षेत्राला संगणक तंत्रज्ञानाची पुरेशी जोड मिळणे अपरिहार्य ठरत आहे. नेमके हेच काम अधिक सुलभ, अचूक व प्रभावीपणे करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक ठरला आहे. या सर्व व्यवस्थापकीय क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच, व्यावसायिक यशासाठी मानवी स्वभाव व पैलूशी निगडित विचारही अनिवार्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.
संस्थागत स्तरावर ‘एआय’चा वापर वाढत्या प्रमाणावर होताना, त्याला व्यक्तिगत स्तरावर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अद्ययावततेची जोड दिली जात आहे. त्यासाठीच आज विविध कंपन्या मानवीय मूल्ये, प्रज्ञाशील कार्यपद्धती, प्रस्तावित व्यवस्थापकीय पात्रता असणार्या कर्मचार्यांना तयार करण्यावर भर देत असून, यातूनच एक नवे वैयक्तिक-व्यावसायिक वातावरण तयार होत आहे.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६
लेखक-
दत्तात्रय आंबुलकर
--
संपादकीय विभाग
दै. मुंबई तरुण भारत