वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धनाच्या व्यापक हेतूने सन २०१५ पासून महाराष्ट्र सरकारतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणूून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि हे वाचन संस्कार रुजवण्यासाठी घरापासून ते शाळांपर्यंत कराव्या लागणार्या सामूहिक प्रयत्नांविषयी मौलिक मार्गदर्शन करणारा हा लेख...
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा होतो आहे. वाचन माणसांच्या आयुष्यात काय करू शकते, याचे प्रतिबिंब कलामांच्या समग्र आयुष्यात प्रतिबिंबित झालेले अनुभवास येते. पुस्तकांनी मस्तके घडवली तर माणसे किती निरपेक्षतेने जगू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कलाम! जीवनभर पुस्तकांसोबत जगताना स्वतःची विवेकी वाट चालण्याचा निर्धार वर्तमानात सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. हाती पुस्तके आली की, माणसांचे जीवन बदलू शकते, यावर जगातील विचारवंतांचा विश्वास आहे. अनेकांना ती वाट सापडली. ज्यांच्या हाती पुस्तके दिसतील, त्यांची मस्तके अधिक उत्तमतेने घडली जातात. जो समाज पुस्तकांच्या सोबतीने चालतो, ते राष्ट्र अधिक प्रगतीच्या दिशेने प्रवास करते. आज पुस्तके हाती देणारे पालक हरवले आहेत.
बालकांच्या आयुष्यातून पुस्तके हरवली आहेत. त्यामुळे माणसांची उंची हरवत चालली आहे. जेथे माणसांची उंची कमी होत जाते, तेथे समाजाची उंची तरी कशी वाढणार? आपल्याला आपला भोवताल जेव्हा भकास वाटू लागतो, तेव्हा त्याचे कारण असते रिकामी मस्तके! रिकामी मस्तकांच्या माणसांच्या समूहाला समाज तरी कसे म्हणायचे? अशा माणसांचा समूह म्हणजे केवळ गर्दी असते. त्यामुळे आपल्याला समृद्ध समाज हवा असेल, तर आजच मुलांच्या हाती उत्तम खेळणी, वस्त्रे, मोबाईल, संगणक देण्याबरोबर चांगली पुस्तके देण्यासाठी पालकांनी आग्रही असायला हवे. पुस्तके वाचनाने कदाचित मुलांचे मार्क कमी होतील; पण मुलांच्या ‘गुणां’चे मात्र संवर्धन झालेले आपणास अनुभवास येईल. माणसाला माणूस म्हणून घडविणे, हेच खरे शिक्षण असते. ते पुस्तकांच्या शिवाय पुढे जाणे शय नाही. आजच्या ‘वाचन प्रेरणा दिनी’ त्या वाटेच्या प्रवासाचा संकल्प करायला हवा, अन्यथा केवळ उत्सवापुरता दिवस परिवर्तन करू शकणार नाही.
जगाच्या पाठीवर ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे, अशा अनेक महापुरुषांच्या आयुष्यातील परिवर्तन पुस्तकांनी केले आहे. महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या अनेकांचे आयुष्य हे केवळ पुस्तकांनी बदलले. हे त्यांनी आपल्या जीवनचरित्रात अभिमानाने नोंदवले आहे. ‘अॅरिस्टॉटल’ यांनी म्हटले होते की, "माझ्या आयुष्यातील माझ्या फक्त तीनच गरजा आहेत. त्या म्हणजे पुस्तके, पुस्तके आणि पुस्तके.” हे पुस्तकाचे मोल आहे. त्यांना पुस्तकांमुळे जीवनाची वाट सापडली, ती वाट आपल्याही पाल्याला सापडू शकते.
पालकांनी मुलांमध्ये गुण कसे रुजतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज पालक मुलांना गुण नसले तरी चालतील, मात्र मार्कांसाठी आग्रही भूमिका घेऊन आहेत. मार्क मिळवण्याच्या नादात आपण मुलांच्या भविष्याकडेच दुर्लक्ष करत आहोत, हे लक्षात घेणार की नाही? हा खरा प्रश्न. पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर जीवनाची प्रकाशमय वाट दाखवत असतात. ग्रीक तत्त्वज्ञानात म्हटले आहे की, ‘ग्रंथालये ही आमची औषधालये आहेत,’ हा विचार अगदीच खरा आहे. माणसांची मने निर्मळ ठेवण्याचे काम तर पुस्तकेच करत असतात. पुस्तकाच्या वाचनातून आनंद मिळत असतो. पुस्तकांनी जीवनातील द्वेष, मत्सर, राग कमी होत जातो. निर्मळता उंचावत जाते. ते माणसांच्या जीवनाचे मोल लक्षात आणून देण्यास मदत करते. मने निर्मळ झाली की, मन आणि शरीरावरील ताणतणाव कमी होत जातो. पुस्तकांमुळे शरी-मनही प्रसन्न राहते. आजारपणापासून शरीर आपोआप दूर जाते. त्याअर्थाने, माणसांच्या निराशेच्या छायेला पुस्तक हे मोठे औषध आहे.
पाश्चात्त्य देशात अगदी कमी कायदे आहेत. राज्यघटना अत्यंत कमी कलमांची आहे. काही नियम तर अलिखित आहेत, तरी तेथे लोक नियम पाळतात. गुन्हेगारी कमी आहे. याचे कारण, तेथील लोकमानसावर शहाणपणाचा प्रभाव आहे. पुस्तकांमुळे तेथील लोकांनी मने घडली आहेत. त्यामुळे स्वहितापेक्षा समाज व राष्ट्र हित अधिक महत्त्वाचे मानले जाते. शब्दसंपत्ती ही तर वाचनाने प्राप्त होते. वादविवादाची शक्ती मिळेल; पण केव्हा वाद घालायचा आणि केव्हा संवाद करायचा, याचा विवेक वाचनातून विकसित होतो. त्याअर्थाने, विवेक व शहाणपण वाचनातून मिळत असेल; तर तेच पूर्णत्व आहे.
वाचनातून माणसांच्या जीवनाला आकार मिळण्यास सुरुवात होत असते. वाचनाने दृष्टिकोन निर्माण होतो. व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम वाचनामुळे घडते. त्याच वेळी लेखनकौशल्यांचा विचारही त्यातून गतिमान होतो. वाचन असल्याशिवाय लेखनाचा समग्र प्रवास घडत नाही. त्यामुळे लेखनाचा विचार पुढे न्यायचा असेल, तर पुस्तक वाचनाला पर्याय नाही. लेखन हे भाषेचे सर्वांत शेवटचे कौशल्य. ते सहजसाध्य नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रवास अधिक उत्तम घडावा, असे वाटत असले; तर वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचे मोल सांगताना ‘एचमॅन’ म्हणतात की, "पुस्तके नसलेले घर म्हणजे खिडया नसलेली खोली आहे. ज्या घराला खिडकी नाही, तेथे प्राणवायू कसा येणार? प्राणवायू नाही म्हणजे, जगणे तरी कसे होणार?” त्यामुळे खिडकी म्हणजे प्राणवायूचे द्वार आहे. आपल्याभोवती लाखो रुपये गुंतवणूक करत महालांची निर्मिती केली जाते. त्या महालात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. मात्र, पुस्तकासाठीची खोली तर सोडा, एखादे कपाटही अस्तित्वात नाही. हे सारे महाल म्हणजे अंधार्या खोल्याच आहेत. अंधारात वाट सापडत नाही. जीवनातही आपल्या हाती पुस्तके नसतील, तर जीवनात वाट सापडत नाही. निर्णय घेता येत नाही. मनात द्वंद निर्माण होते. त्यामुळे पुस्तकांशिवाय जीवन म्हणजे जीवनाला अंधकारात लोटणे आहे. घर म्हणजे केवळ भिंती नाहीत, तर तेथे पुस्तकांचे अस्तित्व अधिक महत्त्वाचे आहे. आपण मुलांचे संगोपन करताना त्यासाठी मोठा खर्च करत असतो. त्याच्यासाठी शाळा निवडताना ‘स्मार्ट स्कूल’ची निवड करतो. उत्तम इमारती आपल्याला हव्या असतात. उत्तम वातावरण हवे असते. संगणक, माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा हव्यात. त्यासाठी लाखो रुपये मोजले जातात; पण त्या शाळेत समृद्ध ग्रंथालय आहेत का, याचा विचार केला जात नाही. मुलाला चांगल्या शाळा हव्या आहेत, याचा अर्थ त्या शाळेत ग्रंथालयाची सुविधा किती प्रभावी आणि परिणामकारक उपयोगात आणली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे.
शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालयाचे स्थान हरवत चालले आहे. आज घरात बालकाला हव्या त्या सुविधा पुरवल्या म्हणजे, त्याची गरज पूर्ण झाली असे नाही. त्याची पुस्तकांची गरज जाणून घेणार की नाही? हाती पुस्तके दिली, तर पुन्हा आयुष्यात वेगळ्या संस्कारवर्गांच्या वाटा धुंडाळण्याची गरज पडणार नाही, शिकवणी लावण्याची गरज नाही. बालवयातच पुस्तके हाती देण्याची गरज आहे. वयाच्या ११ वर्षांच्या आत मुलांच्या हाती पुस्तके आली, तर वाचनाने संस्कार टिकतो असे मानले जाते. भविष्यातील धोयांवर मात करण्यासाठी आजच मुलांच्या हाती पुस्तके देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
पालकांनी मुलाबाळांचे संगोपन करताना अन्न, पाण्याबरोबर मुलांची पुस्तकांची गरज भागवायला हवी. मुलांना अन्नाची गरज असते, त्याप्रमाणे त्यांना पुस्तके वाचनाचीदेखील भूक असते. पुस्तकाशिवाय घर म्हणजे कुटुंबावर केलेला अन्यायच! अवतीभोवती पुस्तके असली की, पुस्तक वाचनाची गोडी आपोआप लागते.घरातील मंडळी एकत्रित बसून दूरदर्शन संच पाहतात, त्याप्रमाणे बालकही दूरदर्शन संच पाहणे पसंत करते.घरातील मोठ्यांनी घरात रोज किमान एक तास पुस्तक वाचनाचा प्रयत्न केला, तर मुलेही पुस्तके वाचताना दिसतील. शिक्षणशास्त्राच्या सिद्धान्तानुसार, मुले ऐकून कमी शिकतात आणि पाहून अधिक शिकतात. आज घरात पुस्तके वाचणारी माणसे हरवत चालली आहेत, म्हणून मुलांना वाचनगोडी नाही. शिक्षकही पुस्तके वाचतील, तर भविष्यात विद्यार्थी पुस्तक वाचनाची वाट चालू लागतील. वाचनातूनच ज्ञानार्जनाची रुची उत्पन्न होते. त्यामुळे तरुण मने विद्या-विनय संपन्न बनतात.तरुणांच्या मनात विद्या अभिरुचीचा विचार रुजला की, मग तरुणांची मने व्यसने, विकार, विलासासारख्या फालतू नशेत रमत नाहीत. एकाअर्थी, पुस्तके ही अधोगतीला घातलेला अडसर आहे. आज आपण मुले वाममार्गाला जाताना पाहतो. त्यापासून परावृत्त होण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. मात्र, ते सारे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत. काय करावे आणि काय करू नये, हे कळण्यासाठी विवेकाची व शहाणपणाची गरज असते. तो विवेक वाचनातूनच विकसित होण्याची शयता अधिक असते. त्यामुळे पुस्तके हाती दिली गेली, तर बालकांचे आयुष्यदेखील परिवर्तनाची वाट चालेल.
समाजातील जो भ्रष्टाचार आहे, तो वाचनसंस्काराने कमी होईल. पैसा हे जीवनाचे सर्वस्व नाही. पैशापेक्षा माणसे अधिक महत्त्वाची आहेत. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, हे एकदा लक्षात यायला हवे. त्यासाठी पुस्तके हाती यायला हवीत. आज हाती असलेल्या मोबाईलऐवजी पुस्तक हाती आले; तर बालकांच्या आयुष्यातील आणि पालकांच्या चिंतेचे अनेक प्रश्न निकाली निघतील, यात शंका नाही. गरज आहे ती फक्त पुस्तकांचे बोट धरण्याची!
- संदीप वाकचौरे