अमेरिकेत हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला; १९ वर्षीय युवकाला अटक

इलिनॉय राज्यातील मंदिराला लक्ष्य करण्याचा डाव; आरोपीकडून अत्याधुनिक रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त

    15-Oct-2026   


US Hindu Temple Attack Plot

 
मुंबई (US Hindu Temple Attack Plot) : अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला करण्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. इलिनॉय राज्यातील ऑरोरा परिसरातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची योजना हा युवक आखत होता. त्याच्याकडून अत्याधुनिक रायफल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.(US Hindu Temple Attack Plot)
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडे पोलिसांना एक पत्र आढळले असून, त्यातून श्वेत वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त होत असल्याचे समोर आले आहे. या पत्रात भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात हिंसाचाराचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले आहे. नवरात्रोत्सवासह हिंदू सणांना सुरुवात झालेली असताना ही अटक करण्यात आली. याच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण वडताल धाम हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. आरोपी अलेक्झांड्रोस पापोराकिस याला बुधवारी रोलिंग मीडोज येथील कुक काउंटीच्या तृतीय म्युनिसिपल डिस्ट्रिक्ट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.(US Hindu Temple Attack Plot)
 
पॅलेटाइन येथील टॅको बेलमध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या पापोराकिसविरोधात एका व्यक्तीने सामूहिक गोळीबाराचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने सामूहिक गोळीबाराच्या योजनेची माहिती असलेले एक दस्तऐवज शेअर केले होते. त्यासोबत रायफल, रायफलच्या मॅगझिन्स, शरीराच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे कवच (बॉडी आर्मर) तसेच अन्य सामरिक उपकरणे आणि साहित्याची छायाचित्रेही होती.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात आरोपी ११ ऑक्टोबर, रविवार रोजी हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले. मात्र, त्या दिवशी त्याने प्रत्यक्ष हल्ला केला नाही. रविवारी दिवसा आरोपीने आपल्या एका सहकाऱ्याला दूरध्वनी करून बंदूक जाम झाल्याचे सांगितले होते. आरोपी पापोराकिसविरोधात दहशतवादी धमकी देणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे, असे प्रत्येकी एक आरोप दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याकडे १६ इंचांपेक्षा कमी लांबीची बॅरल असलेली रायफल असल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पॅलेटाइन पोलीस विभाग अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या तपास संस्थेसोबत समन्वय साधून काम करत आहे.(US Hindu Temple Attack Plot)
 
भारतीय दूतावास बारकाईने लक्ष ठेवून
 
शिकागो येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, इलिनॉयमधील ऑरोरा येथे एका प्रार्थनास्थळाला लक्ष्य करण्याचा कथित प्रयत्न उधळून लावण्यात आल्याच्या वृत्ताची दूतावासाला माहिती आहे. या प्रकरणावर दूतावास बारकाईने लक्ष ठेवून असून, भारतीय समुदायातील नागरिकांच्या संपर्कात असल्याचेही दूतावासाने स्पष्ट केले.(US Hindu Temple Attack Plot)
 
एफबीआयने काय म्हटले?
 
अमेरिकेची एफबीआय ही तपास यंत्रणाही कट्टरतावादी विचारसरणीतून उद्भवणाऱ्या धोक्यांच्या तपासात स्थानिक आणि राज्यस्तरीय कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे. एफबीआयच्या शिकागो कार्यालयाचे प्रभारी विशेष एजंट रायन व्हेलन म्हणाले, “कट्टरतावादी विचारसरणीतून प्रेरित हिंसाचाराचा कोणताही धोका ओळखणे, त्याची चौकशी करणे आणि तो निष्प्रभ करणे यासाठी एफबीआय स्थानिक आणि राज्यस्तरीय कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील सहकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करते.”(US Hindu Temple Attack Plot)
 

श्वेत वर्चस्ववादी कट्टरतावादाविरोधात कठोर कारवाईची मागणी
 
अमेरिकेचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती आणि भारतीय-अमेरिकी हक्कांसाठी कार्यरत संघटनांनी भारतविरोधी द्वेष तसेच श्वेत वर्चस्ववादी कट्टरतावादाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित कटावर प्रतिक्रिया देताना कृष्णमूर्ती यांनी भारतविरोधी द्वेष आणि श्वेत वर्चस्ववादाच्या परिणामांबाबत इशारा दिला. दरम्यान, ‘इंडियन अमेरिकन अॅडव्होकसी कौन्सिल’ने एफबीआय आणि अमेरिकेच्या न्याय विभागाला भारतविरोधी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या ऑनलाइन प्रभावकांची (इन्फ्लुएन्सर्स) अधिक सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.(US Hindu Temple Attack Plot)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर