नवरात्राचे नऊ दिवस स्त्री-शक्तीचा जागर केला जातो. मात्र, यातील प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. नवरात्राच्या पंचमीला उपांग ललितेचे पूजन होते, यानंतर बुद्धिदात्री असलेल्या सरस्वतीच्या पूजनाची परंपरा आहे. या दोन्ही परंपरांमागील अन्वयार्थाचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय संस्कृतीतील सण, उत्सव आणि व्रतवैकल्यातून, पूर्वजांनी मानवी जीवनातील प्रत्येक कृतीला आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. आदिशक्तीच्या नऊ दिवसांच्या उपासनेमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण व्रते गुंफली आहेत. त्यांपैकी आश्विन शुद्ध पंचमीचे ‘उपांग ललिता’ हे व्रत आणि नवरात्राच्या उत्तरार्धातील चार दिवसांचे सरस्वतीपूजन!
उपांग ललिता व्रत : आश्विन शुद्ध पंचमीला ‘ललिता पंचमी’ म्हणतात. या दिवशी उपांग ललिता व्रताची प्राचीन परंपरा आहे. श्री ललिता ही श्रीविद्या संप्रदायातील परमेश्वरी, महात्रिपुरसुंदरी आणि श्रीमहाराज्ञी म्हणून पूजली जाते. श्री ललिता सहस्रनामाची सुरुवातच ‘श्रीमाता श्रीमहाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी’ या तीन नावांनी होते. मात्र, उपांग ललिता व्रत आणि श्रीविद्येतील श्रीचक्राची नवावरणार्चना यांमध्ये, विधीच्या दृष्टीने फरक आहे. श्रीविद्येची मंत्रप्रधान उपासना ही विशिष्ट दीक्षा आणि साधना परंपरेशी संबंधित आहे; तर उपांग ललिता व्रत हे गृहस्थाश्रमात आचरले जाणारे काम्य व्रत आहे. कौटुंबिक सौख्य, सौभाग्य, आरोग्य, संतती आणि समृद्धीसाठी हे व्रत करतात. ‘स्कंदपुराणा’शी संबंधित उपांग ललिता माहात्म्य आणि ‘व्रतराजा’सारख्या व्रतग्रंथांत, त्याच्या विधीचे वर्णन आढळते. या व्रताचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे, कुंकवाच्या करंड्याचे झाकण देवीचे प्रतीक मानून त्याची पूजा करण्याची महाराष्ट्रीय परंपरा!
पूर्वी घराघरांत कुंकवाचा करंडा असे. कुंकू हे सौभाग्याचे, मांगल्याचे आणि शक्तीचे प्रतीक. अशा करंड्याच्या झाकणामध्ये देवीचे अधिष्ठान मानण्यामागे एक सुंदर भावार्थ दिसतो. जिची उपासना महात्रिपुरसुंदरीच्या रूपात केली जाते, तिचीच आराधना सामान्य गृहस्थ आपल्या घरातील एका वस्तूमध्ये करू शकतो. परमेश्वरीची अनुभूती घेण्यासाठी भव्य मंदिर किंवा वैभवशाली पूजासाहित्य आवश्यक नाही; भक्तीने भारावलेले अंतःकरण हेच तिचे खरे अधिष्ठान. उपांग ललिता व्रताच्या कथेमध्ये श्रीपती आणि गोपती या दोन ब्राह्मण बंधूंचा उल्लेख येतो. संकटात सापडलेल्या या भावांना, गुरूच्या मार्गदर्शनाने ललिता उपासनेचा मार्ग सापडतो. पुढे गोपती समृद्धीमुळे प्रमादी होऊन उपासनेकडे दुर्लक्ष करू लागल्याने, संकटात सापडतो. देवीच्या दृष्टान्तानुसार उपांग नावाच्या राजाकडून, देवीपूजेशी संबंधित करंड्याचे झाकण प्राप्त करून तो पुन्हा उपासना सुरू करतो. पुढील कथानकात त्याची कन्या ललिता आणि जावई गुणराशी यांच्या जीवनातील प्रसंगही येतात. श्रद्धा, लोभ, मत्सर, अपराध आणि प्रायश्चित्त यांचे विविध पैलू या कथेत उलगडतात.
व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून संकल्प केला जातो. काही पारंपरिक विधींमध्ये आघाड्याच्या काडीने ‘दंतधावन’ करण्याचाही उल्लेख आहे. केळीचे खांब आणि पुष्पमालांचे मखर सजवून, त्यामध्ये कुंकवाच्या करंड्याचे झाकण किंवा देवीचे मान्य प्रतीक स्थापित करतात. पंचोपचाराने पूजा करतात. काही परंपरांनुसार देवीला ४८ साग्र दुर्वा अर्पण करतात. घारगे, तांदळाचे वडे, लाडू इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. घारग्यांचे वाण देणे, व्रतकथा ऐकणे, जागरण करणे आणि दुसर्या दिवशी देवीचे विसर्जन करणे, असे हे विधी आहेत. श्री ललिता ही केवळ भौतिक ऐश्वर्य देणारी देवता नाही. श्रीविद्येच्या तत्त्वज्ञानात ती इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचे एकात्म अधिष्ठान आहे. मानवी जीवनातील इच्छा ही ज्ञानाने नियंत्रित आणि कर्माने साकार झाली, तरच ती कल्याणकारक ठरते. म्हणूनच, ललितोपासनेचे अंतिम उद्दिष्ट इच्छांचे शुद्धीकरण आणि साधकाची अंतर्मुख उन्नती हे आहे.
चार दिवसांचे सरस्वतीपूजन : नवरात्राच्या उत्तरार्धामध्ये सरस्वतीपूजनाचीही परंपरा आहे. मूळ नक्षत्रावर सरस्वती आवाहन, पूर्वाषाढा नक्षत्रावर प्रधान पूजन, उत्तराषाढा नक्षत्रावर बलिदान आणि श्रवण नक्षत्रावर विसर्जन, असा हा चार दिवसांचा क्रम. ‘धर्मसिंधू’सारख्या धर्मशास्त्रीय परंपरेत या नक्षत्राधारित विधीचा उल्लेख येतो. प्रादेशिक आणि कौटुंबिक परंपरांनुसार काही ठिकाणी तीन दिवसांचे किंवा एक दिवसाचे पूजन करतात. सरस्वती ही केवळ शालेय शिक्षणाची देवता नाही. ‘ऋग्वेदा’त तिचे स्तवन आढळते. वैदिक परंपरेतील नदी आणि प्रेरक देवता या स्वरूपांपासून पुढे वाणी, विद्या, बुद्धी, प्रज्ञा, संगीत आणि समस्त कलांची अधिष्ठात्री म्हणून, तिचे स्वरूप विकसित झाले. तिच्या हातातील वीणा सुसंवाद आणि सर्जनशीलतेचे, पुस्तक ज्ञानाचे, अक्षमाला एकाग्रतेचे, तर हंस विवेकाचे प्रतीक मानला जातो. या चार दिवसांच्या पूजेत केवळ देवीची आराधना नसून, ज्ञानसाधनेचा एक सुंदर क्रम अनुभवता येतो.
पहिला दिवस- मूळ नक्षत्रावरील सरस्वती आवाहन : या दिवशी सरस्वती देवीचे पूजास्थानी आवाहन केले जाते. घरातील ग्रंथ, वह्या, लेखनसाहित्य आणि इतर विद्येची साधने स्वच्छ करून, पूजेसाठी ठेवतात. देवीची प्रतिमा अथवा ग्रंथांमध्ये तिचे अधिष्ठान मानून पूजन केले जाते. मूळ नक्षत्राच्या नावाशी जोडून, या विधीकडे ज्ञानाची मुळे अंतःकरणात रुजवण्याचा संकल्प म्हणूनही पाहता येते. अर्थात, हा नक्षत्रनामाचा स्वतंत्र आध्यात्मिक अन्वय आहे.
दुसरा दिवस- पूर्वाषाढा नक्षत्रावरील प्रधान सरस्वतीपूजन : या दिवशी देवीचे पंचोपचार किंवा षोड्शोपचार पूजन, पुष्पार्चन, नैवेद्य, आरती आणि स्तोत्रपठण केले जाते. पुस्तके, लेखणी, वाद्ये आणि विद्येची अन्य साधने पूजली जातात. विद्यार्थी आपल्या पुस्तकांची, लेखक लेखणीची, तर संगीतकार वाद्यांची पूजा करतात. ज्ञानप्राप्तीची साधने ही आपल्या बौद्धिक आणि आत्मिक विकासाची माध्यमे आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचा आदर करणे आणि त्यांचा सदुपयोग करण्याचा संकल्प करणे, हा याचा भावार्थ. सरस्वती म्हणजे माहितीचे यथार्थ ज्ञानात रूपांतर करण्याची प्रज्ञा! शिक्षणातून ज्ञान मिळाले पाहिजे आणि त्या ज्ञानातून विवेक निर्माण झाला पाहिजे. म्हणूनच, भारतीय परंपरेने ‘विद्या ददाति विनयम्’ असे म्हटले. विद्या विनय देत नसेल, तर त्या विद्येचा आत्माच हरवला असे म्हणावे लागेल.
तिसरा दिवस- उत्तराषाढा नक्षत्रावरील सरस्वती बलिदान : या चार दिवसांतील हा सर्वांत चिंतनशील विधी. ‘बलिदान’ या शब्दाचा येथे सरसकट पशुहिंसेशी संबंध जोडणे चुकीचेच. विविध पूजापरंपरांमध्ये देवीला विशिष्ट नैवेद्य किंवा प्रतीकात्मक बली अर्पण करण्याचे संकेत आहेत. काही विधींमध्ये कोहळ्याच्या प्रतीकात्मक बलिदानाचाही उल्लेख येतो. मात्र, या विधीचे आध्यात्मिक चिंतन करताना एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे ज्ञानाचा अहंकार! थोडेसे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणूस स्वतःला सर्वज्ञ समजतो. यातून दुसर्याचे ऐकण्याची तयारी संपते. अशा वेळी ज्ञान हे मुक्तीचे साधन न राहता, अहंकाराच्या बंधनाचे कारण बनते. सरस्वती बलिदानाच्या निमित्ताने स्वतःचा दुराग्रह, बौद्धिक अहंकार आणि अविवेक यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हाच खरा आध्यात्मिक अर्थ.
चौथा दिवस- श्रवण नक्षत्रावरील सरस्वती विसर्जन : या दिवशी देवीची उत्तरपूजा करून औपचारिक आवाहनाचा समारोप केला जातो. आरती, नैवेद्य, क्षमाप्रार्थना आणि उद्वासनविधी केले जातात. काही परंपरांत पूजेसाठी ठेवलेले ग्रंथ आणि विद्येची साधने पुन्हा दैनंदिन उपयोगात आणली जातात. देवीचे आवाहन केले म्हणजे, ज्ञानाला आपल्या जीवनात आमंत्रण दिले. प्रधान पूजन केले म्हणजे, ज्ञानसाधनेविषयी निष्ठा व्यक्त केली. बलिदानातून अहंकारत्यागाचे चिंतन केले आणि विसर्जनातून प्राप्त ज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संकल्प केला. श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण ही भारतीय ज्ञानपरंपरेची महत्त्वाची अंगे आहेत. म्हणूनच, सरस्वतीचे विसर्जन म्हणजे ज्ञानाला निरोप देणे नव्हे, तर उपासनेतून प्राप्त झालेल्या संस्कारांना आपल्या जीवनाचा स्थायी भाग करणे होय.
पराशक्तीच्या उपासनेचे दोन पैलू : उपांग ललिता व्रत आणि सरस्वतीपूजन या दोन्ही परंपरांचा एकत्रित विचार केला, तर भारतीय शक्तिसाधनेचे वैशिष्ट्य अधिक स्पष्ट होते. श्री ललिता ही विश्वाच्या सर्जनशील आणि नियामक शक्तीचे अधिष्ठान आहे, तर सरस्वती त्या शक्तीच्या ज्ञानमय आणि प्रज्ञामय अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. ज्ञानाशिवाय शक्ती दिशाहीन होऊ शकते आणि शक्तीशिवाय ज्ञान निष्क्रिय ठरू शकते. या दोन्हींचा समन्वय झाला, तरच मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त होते. भारतीय ऋषींनी म्हणूनच शक्तीची उपासना करताना, ‘ज्ञानाला’ आणि ज्ञानाची उपासना करताना ‘विनयाला’ महत्त्व दिले. श्री ललितेच्या आराधनेतून अंतःकरणातील दैवीसामर्थ्य जागृत व्हावे आणि सरस्वतीच्या कृपेने त्या सामर्थ्याला विवेकाची दिशा मिळावी, हाच या दोन परंपरांचा सुंदर समन्वित संदेश आहे. कुंकवाच्या करंड्याचे झाकण असो किंवा पूजेला ठेवलेला एखादा ग्रंथ; उपासनेचे माध्यम किती साधे आहे, याला महत्त्व नाही. त्या माध्यमातून साधकाच्या अंतःकरणात किती व्यापक परिवर्तन घडते, याला खरे महत्त्व आहे. शक्तीचे जागरण, ज्ञानाचे संवर्धन, अहंकाराचे विसर्जन आणि विवेकाचे अधिष्ठान; हेच नवरात्रातील या दोन विलक्षण उपासनांचे चिरंतन आध्यात्मिक रहस्य आहे.
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज