मुंबई (Ram Mandir FSSAI Certificate) : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला ‘ईट राइट प्लेस ऑफ वर्शिप’ (खाद्यसुरक्षित उपासना स्थळ) हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र एफएसएसएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन वर्षांच्या कालावधीसाठी, म्हणजेच ११ ऑक्टोबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२८ पर्यंत वैध असेल. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या यांना एफएसएसएआयकडून अधिकृतपणे ‘ईट राइट प्लेस ऑफ वर्शिप’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे,’ असे अन्न सुरक्षा प्राधिकरणाने म्हटले आहे. दि. १० ऑक्टोबर रोजी अयोध्येत आयोजित विशेष कार्यक्रमात एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुनहानी यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.(Ram Mandir FSSAI Certificate)
एफएसएसएआयच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ‘ईट राइट प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा उपक्रम धार्मिक स्थळांवर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. तसेच, अशा स्थळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत अन्नसुरक्षेविषयीचे संदेश पोहोचवून त्यांना जबाबदार नागरिक म्हणून वागण्यास प्रोत्साहित करणे, हाही या उपक्रमाचा उद्देश आहे.(Ram Mandir FSSAI Certificate)
प्रसाद, लंगर आदी स्वरूपात भाविकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये गैरप्रकार आणि अनियमितता होऊ नयेत, याबाबत धार्मिक स्थळांवर जागरूकता निर्माण करणे, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ व त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि विनियम यांचे योग्य पालन सुनिश्चित करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत धार्मिक स्थळांवर अन्नसुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक सूचना, काय करावे आणि काय करू नये यासंबंधी मार्गदर्शन, तसेच योग्य पद्धती आणि कार्यप्रणाली यांची माहिती उपलब्ध करून दिली जाते.(Ram Mandir FSSAI Certificate)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक