मुंबई, : (Mumbai Ramleela Organizers) मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत आयोजित होणाऱ्या रामलीला कार्यक्रमांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. रामलीला आयोजकांना येणाऱ्या अडचणी आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत बुधवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयोजकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.(Mumbai Ramleela Organizers)
नवरात्रोत्सवापासून दसऱ्यापर्यंत मुंबईतील विविध मैदानांवर रामलीलेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे कार्यक्रमांच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात रामलीला आयोजकांच्या प्रतिनिधींसोबत ही बैठक पार पडली.(Mumbai Ramleela Organizers)
या बैठकीत साहित्य कलामंचचे महामंत्री विनय मिश्रा यांनी रामलीला आयोजनादरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या. यापूर्वीही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामलीला आयोजकांच्या समस्यांबाबत बैठक घेऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. या बैठकीतही आयोजकांनी आपल्या मागण्या मांडत कार्यक्रमांच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “रामलीला हा आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबईतील विविध भागांत आयोजित होणारे हे कार्यक्रम उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडावेत, यासाठी आयोजकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या विषयात सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आभार मानतो. महापालिकेच्या सहकार्यामुळे रामलीला मंडळांना निश्चितच दिलासा मिळेल.”(Mumbai Ramleela Organizers)
रामलीला आयोजकांच्या मागण्यांची दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी रामलीला कार्यक्रमांच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी (फॉगिंग) करण्यासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. महापालिका प्रशासनाच्या या सहकार्यामुळे मुंबईतील रामलीला कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुरळीतपणे करता येणार असून, कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.(Mumbai Ramleela Organizers)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....