‘इंडियन मोबाईल काँग्रेस’ची दशकपूर्ती

    15-Oct-2026   
Indian Mobile Congress 2026
 
भारतीय डिजिटल विश्वाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘इंडियन मोबाईल काँग्रेस’ कार्यक्रम नुकताच दिल्लीत संपन्न झाला. दशकपूर्तीनिमित्त यंदा या कार्यक्रमात एकूण १०० देशांनी आणि एकूण दीड लाख लोकांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे. नेमके या परिषदेत काय घडले, याचे हे आकलन...
 
‘डिजिटल इंडिया’च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने एक महत्त्वाची बाब म्हणजे, भारतातील ‘युझर्स’ केवळ समाज माध्यमांतच रममाण नसल्यानेच संपूर्ण ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रचर’ उभे राहिले. यात केंद्र सरकारचाही वाटाही महत्त्वाचा आहे. बँका, शासकीय इस्पितळे, सरकारी कार्यालयांपासून ग्रामपंचायतींपर्यंतच्या सर्व संस्थांमध्ये, डिजिटल सेवा आणि व्यवस्था पोहोचली. सर्वसामान्यांच्या खात्यात ‘डीबीटी’द्वारे थेट ५० लाख कोटी रुपये पोहोचले, ही बाबही महत्त्वाचीच. थेट खात्यात रक्कम वळती केल्याने, एकूण पाच लाख कोटी रुपये दलाल आणि मध्यस्थांच्या हाती गेले नाहीत.
 
मोबाईल आता केवळ समाजमाध्यम किंवा मनोरंजनाचे साधन राहिले नसून, ‘डिजिटल इकोनॉमी’ला बळकट करण्याचा तो दुवा ठरतो आहे. यात भाषेसारख्या समस्या संपल्या आहेत. पूर्वीप्रमाणे बँका, सरकारी कार्यालयांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागणेही आता बंद झाले आहे. याने जनतेचा वेळ आणि पैसाही वाचला. ‘यूपीआय’तून अवघ्या काही सेकंदापेक्षाही कमी वेळात पैसे पाठवणे शय झाले. भारतीय ‘टेलिकॉम’ क्षेत्र केवळ ‘नेटवर्क’, ‘स्पेट्रम’ किंवा ‘इंटरनेट स्पीड’पर्यंतच मर्यादित न राहता, त्यापुढे निघून गेले.
 
भारतात सुरू असलेल्या ‘मोबाईल काँग्रेस’च्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांची भारतात घुसण्याची तळमळही दिसली. मस्क यांनी ज्याप्रकारे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका करण्याचा खुळचटपणा केला, त्यावरून त्याचा उतवीळपणाच अधोरेखित झाला. भारतीय जनतेच्या इंटरनेट वापरण्याच्या क्षमतेची जाणीव मस्क यांना आहे. म्हणूनच, त्यांची ही धडपड सुरू असल्याचे लक्षात येईल.
 
मस्क यांना टक्कर देण्यासाठी, भारतीय ‘टेलिकॉम’ कंपन्या तयारीतच आहेत. केंद्र सरकारच्या मंजुरीची वाट पाहत, काही प्रमुख ‘टेलिकॉम’ कंपन्यांनीही ‘स्टारलिंक’सारखी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. देशात एकूण ५.५ लाख ‘फाईव्ह जी’ बेस स्टेशन्स आहेत. शिवाय, ‘सिस-जी’ची तयारी सुरू आहे. युद्धजन्य स्थिती, भूकंप-महापूर आणि नैसर्गिक आपत्तीकालीन स्थितीतही, इंटरनेट सेवा अखंडित सुरू ठेवण्याचे आव्हानही तंत्रज्ञानाद्वारे लीलया पेलले आहे.
 
‘इंडियन मोबाईल काँग्रेस’मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण विशेष महत्त्वाचे. यात त्यांनी, "भारत ‘सेमीकंडटर इकोसिस्टम’ची उभारणीची गती वाढत असून, वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी सरकार महत्त्वाची पावले उचलत आहे,” अस म्हटले. याच कार्यक्रमात मोदींनी ‘टेलिकॉम’ कंपन्यांना केलेले आवाहनही महत्त्वाचे. एक असे नेटवर्क तयार करा, जे चुकीच्या हातात जाणारच नाही! असे ते म्हणाले.
 
यालाच जोडून एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, फ्रान्सवर दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेला सायबर हल्ला. फ्रान्सच्या शेकडो सुपरमार्केटवर सायबर हल्ला झाला. यात सर्व दुकानांतील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान, एकत्रित ५० डिग्री सेल्सिअंशपर्यंत वाढविण्यात आले. यामुळे लाखो युरोज मुल्याचे खाद्यपदार्थ खराब झालेच, शिवाय कंपन्यांनाही मोठे नुकसान उचलावे लागले. जवळपास ४०० दुकानांवर हा हल्ला झाला असून, सुमारे १०० स्टोअर्सचे इंटरनेट तातडीने बंद करण्यात आले. जग नेमक्या कोणत्या अनभिज्ञ धोयाच्या आणि संकटांच्या दाराते उभे आहे, याची चाहूलच यातून लागते. त्यामुळे येत्या काळात सुरक्षितता आणि इंटरनेट साक्षरता ही मोठीच आव्हाने असणार आहेत. यामुळेच एका जागतिक व्यवस्थेच्या उभारणीची गरजही, मोदींनी याच कार्यक्रमात अधोरेखित केली.
 
गेल्या काही काळात भारत हा ग्राहक न राहता ‘क्रिएटर’ बनला. पूर्वी फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी असणारे आशयनिर्मितीचे क्षेत्र, आता प्रादेशिक भाषांपर्यंत पोहोचले. गावखेड्यातून ‘क्रिएटर्स’ त्यांच्या गोष्टी डिजिटल पडद्यावर सांगू लागले, लोकप्रिय झाले, त्यांना कमाईचे साधन उपलब्ध झाले. भारताने ‘व्हेव्ज इंडिया’सारखे जागतिक व्यासपीठ तयार केले. ‘इंडियन मोबाईल काँग्रेस’ हे तेच व्यासपीठ आहे; ज्यावरून २०२२ साली ‘फाईव्ह जी’ इंटरनेटची घोषणा झाली होती. स्वस्त इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्यांपैकी एक देश म्हणून, भारत गणला जाऊ लागला. ‘इंडियन मोबाईल काँग्रेस’ला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. याच मंचावर भविष्यात ‘एआय’, ‘सिस-जी’ आणि ‘इंटीग्रेटेड कम्युनिकेशन सिस्टम’ची पायाभरणी होईल, याचा विश्वास देशाला आहे.
 
गेल्या दहा वर्षांत ‘जिओ’ हा देशातील प्रमुख ‘टेलिकॉम ब्रॅण्ड’ म्हणून उदयास आला. याच आठवड्यात कंपनी, देशातील सर्वांत मोठ्या ‘आयपीओ’च्या तयारीला लागली आहे. त्याचे मूल्य ३० हजार कोटींच्या घरात असण्याचीही शयता वर्तवली जात आहे. भविष्यातही अशा नव्या योजना आणण्याची कंपन्यांची तयारीही तितकीच आहे.
 
भारतात ‘डेटा सेंटर’ उभारणीसाठी ‘गुगल’-‘फेसबुक’सारख्या कंपन्या उत्सुक आहेत. ‘एआय’ कौशल्यांबद्दल केंद्र सरकारही सकारात्मक असून, अनेक दर्जेदार उपक्रम मोफत विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. त्यात ‘स्कील इंडिया डिजिटल हब’, ‘स्वयंम’, ‘दीक्षा-युवा एआय फॉर ऑल’ आदी अभ्यासक्रम ऑनलाईन उपस्थित आहेत. केवळ मोबाईल तंत्रज्ञानापुरता मर्यादित विचार न करता ‘वांटम समीट’, ‘स्टार्टअप्स’, ‘विकसित टेक ४७’, ‘सायबर सुरक्षा’, ‘सॅटकॉम’, ‘स्मार्ट मोबिलिटी’ आदी महत्त्वाचे मुद्दे केंद्रस्थानी चर्चेत आला. ‘इंडियन मोबाईल काँग्रेस’चा दि. १० ऑक्टोबर रोजी समारोप झाला. मात्र, जगाला भारताची बलस्थाने आणि जगापुढील आव्हाने काय असतील, याचा संदेश योग्य मंचावर यानिमित्ताने पोहोचण्यास मदत झाली आहे.




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर