मुंबई (Gajanan Maharaj Sansthan Girda): बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथे श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना यात्रास्थळाच्या विकासासाठी ३.८१ हेक्टर शासकीय जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्याने गिरडा येथे स्मृतीकेंद्र, रुग्णालय, निवास संकुलासह विविध सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Gajanan Maharaj Sansthan Girda)
गिरडा येथे वृक्षलागवडीसाठी संस्थानला १९.०६ हेक्टर शासकीय जमीन देण्यात आली होती. या जागेवर स्मृतीकेंद्र, इको टुरिझम सेंटर, शांती कुटीर, निवास संकुल, नॅचरोपथी केंद्र, आयुर्वेदिक संशोधन केंद्र, रुग्णालय आणि ग्रामीण कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी सुविधा उभारता येतील. त्यामुळे गिरडा येथे येणाऱ्या भाविकांना निवास, आरोग्यसेवा आणि निसर्गोपचाराच्या सुविधा मिळण्यास मदत होईल. (Gajanan Maharaj Sansthan Girda)
यापूर्वी या जमिनीवर वृक्षलागवडीसाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, यात्रास्थळाच्या विकासासाठी कायमस्वरूपी बांधकामाची गरज लक्षात घेऊन शासनाने विशेष मंजुरी दिली आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदी आणि १६ ऑगस्ट १९९० च्या शासन निर्णयातील नियमांबाबत विशेष सूट देण्यात आली आहे. ही परवानगी शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार असेल. (Gajanan Maharaj Sansthan Girda)
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शेगाव संस्थानाचे सर्व पदाधिकारी आणि संस्थानाचे अध्यक्ष तसेच त्या भागातील आमदार संजय कुटे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी यासाठी खूप पाठपुरावा केला होता. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेगाव संस्थानाच्या विकासासाठी ३.८१ हेक्टर जागा देण्यात आली आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. गिरडा येथे स्मृतीकेंद्र, रुग्णालय, आयुर्वेदिक संशोधन केंद्र, नॅचरोपथी केंद्र आणि निवास संकुल यांसारख्या सुविधा उभ्या राहिल्याने भाविकांना मोठा फायदा होईल. या कामांसाठी कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी मिळावी, यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निर्णयामुळे गिरडा येथील यात्रास्थळाचा विकास होण्यास मदत होईल.” (Gajanan Maharaj Sansthan Girda)