वय, भवताल सारेच प्रलोभने पाडण्यास सज्ज असतानाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या ध्येयाप्रति समर्पित राहणार्या ‘बेसबॉल’पटू सचित मर्ढेकर याच्याविषयी...
कोणत्याही देशाची तरुणाई ही त्या देशाची खरी पुंजी. तिच्याकडे अनुभवाची शिदोरी कदाचित कमी असेलही; पण स्वप्नांची गाठोडी मात्र भरपूर असतात. जग बदलण्याची भाषा करणार्या या वयाला कधी स्वतःच्या मर्यादांची जाणीव नसते, तर कधी आकाशाला गवसणी घालण्याच्या नादात जमिनीवरचे वास्तवही विसरायला होते. पण, या स्वप्नाळूपणातच तरुणाईचे खरे सामर्थ्य असते. कारण, आजवर घडत आलेल्या गोष्टींपेक्षा उद्या काय घडवता येईल, याचीच ओढ तरुणाईला अधिक असते. क्रीडा क्षेत्रात या ऊर्मीला लाभलेले परिमाण वेगळेच! मैदानावर उतरल्यावर वयाचा हिशोब राहत नाही, उरते ती केवळ सिद्ध करण्याची जिद्द. प्रत्येक विजय आत्मविश्वास वाढवतो, प्रत्येक पराभव काहीतरी शिकवून जातो आणि प्रत्येक नव्या प्रयत्नातून कर्तृत्वाची नवी शयता जन्माला येते. अशा प्रवासात एखाद्या खेळाडूच्या कामगिरीकडे पाहताना त्याच्या यशामागची मेहनत, चिकाटीही समजून घ्यावी लागते. याच तरुणाईचा, तिच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा प्रतिनिधी म्हणजे, सचित मर्ढेकर!
सचितचा जन्म २०१०मध्ये नवी मुंबईत झाला. त्याचे बालपणही नवी मुंबईतच गेले. वडील शंकर ‘बेस्ट’मध्ये वाहक म्हणून नोकरीला, तर आई सुरेखा गृहिणी. बालपणापासूनच सचितला खेळाची आवड. त्याच्या वडिलांना असलेली क्रिकेटची आवड, सचितमध्ये उतरली होती. वडिलांकडूनच त्याने बालपणीच क्रिकेटचे बाळकडू घेतले होते. पण, त्यात तंत्रशुद्धता नव्हती. हौस म्हणूनच खेळाकडे पाहण्याचे दिवस होते.
सचितने बालमोहन विद्यामंदिरमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला. अर्थात, चौथीपर्यंत सचितच्या आयुष्यात खेळ हा हौसेचाच भाग होता. दरम्यानच्या काळात सचितचे कुटुंब नवी मुंबईवरून वडाळ्याला स्थलांतरित झाले. त्यामुळे सचितच्या या आवडीला तंत्रशुद्धतेची जोड देण्याचा निर्णय सचितच्या पालकांनी घेतला. इयत्ता पाचवीमध्ये सचितने क्रिकेटचे धडे गिरवण्याची सुरुवात शाळेतूनच केली. शिवाजी पार्कमध्ये चव्हाण सर आणि निखिल आजगांवकर सरांनी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. दोन्ही प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतून मिळणार्या प्रोत्साहनाच्या जोरावर सचितची क्रिकेटमध्ये प्रगती होत होती. त्याच्यातील खेळाच्या आवडीला, तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड लाभल्याने, सचितने विविध पातळ्यांवर सर्वोच्च प्रदर्शनही केले होते. मुंबई संघाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्येही त्याची निवड झाली होती.
इयत्ता नववीपर्यंत सचित क्रिकेटच खेळत असे. मात्र, नववीदरम्यानच त्याला ‘बेसबॉल’ या खेळाची माहिती मिळाली. शाळेचा संघ ‘बेसबॉल’च्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. त्यामुळे मित्रांकडून या खेळाविषयी सचितला माहिती मिळाली. अर्थातच, सचितसाठी हा खेळ नवाच होता. मात्र, क्रिकेट आणि ‘बेसबॉल’मध्ये थोडेबहुत साम्य असल्याने सचितची हा खेळ खेळण्याची इच्छा प्रबळ झाली. त्याला कारण क्रिकेटमधील स्पर्धाही ठरलीच!
इयत्ता नववीत असतानाच सचितने शाळेतून ‘बेसबॉल’ खेळण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने तन्मय ओनकर सरांकडे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात काहीसा वेळ या खेळाचे तंत्र शिकण्यात गेला. मात्र, क्रिकेटची पार्श्वभूमी असल्याने, सचितचा पाया भक्कम होता. त्यामुळे अल्पावधीतच सचितने शालेय स्पर्धांमध्ये उज्ज्वल कामगिरी करण्यास सुरुवात केली.
सचितची शालेय स्पर्धांतील कामगिरी बघून अवघ्या दोनच वर्षांत त्याची राज्यस्तरीय आणि पुढे राष्ट्रीय पातळीवरही निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सांघिक यश जरी मिळवता आले नसले, तरी ‘बेसबॉल’मध्ये ‘पिचर’ असलेल्या सचितच्या व्यक्तिगत कामगिरीचा प्रभाव निवडकर्त्यांवर पडलाच. सचितने आतापर्यंत ‘बेसबॉल’मध्ये दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून, दोनपैकी एका स्पर्धेमध्ये ‘सुवर्ण’, तर दुसर्या स्पर्धेत ‘कांस्य’ पदक मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल कामगिरी करणारा सचित, अभ्यासातील यशाविषयीही तितकाच सचेत आहे. यावर्षीच दहावी उत्तीर्ण झालेल्या सचितने तब्बल ९३.४० टक्के गुण मिळवले आहेत. यावरूनच अभ्यासाविषयी असलेली त्याची आवडही अधोरेखित होते.
सध्या सचित खालसा महाविद्यालयामध्ये अकरावी इयत्तेत असून, आता महाविद्यालयाकडूनही तो ‘बेसबॉल’ खेळामध्ये पराक्रम गाजवत आहे. सचितने हा खेळ खेळण्यास सुरुवात केली, त्यावेळी भारतात या खेळाविषयी माहिती असणार्यांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या चार वर्षांत या खेळाला मोठी प्रसिद्धी मिळत असल्याचेही सचित सांगतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या या खेळाच्या ‘लीग’ स्पर्धांमध्ये भारताकडून खेळण्याची जिद्द सचित बाळगून आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!