पश्चिम बंगालच्या मालदामध्ये महालयानिमित्त संघाचे पथसंचलन; ६०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

    14-Oct-2026   


RSS March in Malda

 
मुंबई (RSS March in Malda) : महालयाच्या मंगल पर्वानिमित्त पश्चिम बंगालमधील मालदा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून निघालेली संचलने एका निश्चित ठिकाणी एकत्र आली. संघाच्या गणवेशात सहभागी झालेल्या ६०० हून अधिक स्वयंसेवकांनी शिस्त, एकता आणि सामूहिक बांधिलकीचे दर्शन घडवले. घोषवादनाच्या तालावर स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन सुरू होते. त्यामुळे परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. या माध्यमातून त्यांनी स्वयंसेवकांप्रति असलेला स्नेह आणि आदर व्यक्त केला.(RSS March in Malda)
 
यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील सरकारच्या काळात संघाच्या कार्यक्रमांना, सभांना त्याचबरोबर पथसंचलनांना परवानगी नाकारल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. दि. १४ जानेवारी २०१७ रोजी कोलकात्यात हिंदू संमेलन आयोजित केले होते. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. यामध्ये स्वयंसेवकांचे पारंपरिक गणवेशातील प्रात्यक्षिकही नियोजित होते. संघाने प्रथम किडरपूर येथील भुकैलाश मैदानाची आणि नंतर ब्रिगेड परेड मैदानाची मागणी केली. पोलिसांनी पहिल्या मैदानावर गर्दीच्या व्यवस्थापनाची, तर दुसऱ्या मैदानावर गंगासागर यात्रेकरूंच्या व्यवस्थेची कारणे देत परवानगी नाकारली. त्यानंतर संघाने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १३ जानेवारीला सभेला सशर्त परवानगी दिली. उपस्थितांची संख्या चार हजारांपर्यंत मर्यादित ठेवणे, केवळ निमंत्रितांना प्रवेश आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यक्रम घेणे, अशा अटी घालण्यात आल्या होत्या.(RSS March in Malda)
 
भाजपने पश्चिम बंगालमध्ये ‘गणतंत्र बचाओ’ या नावाने रथयात्रा काढण्याचे नियोजन केले होते. राज्य सरकारने संभाव्य जातीय तणाव, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांचा हवाला देत यात्रेला परवानगी नाकारली. सरकारच्या पत्रात या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सहभागी होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख होता. एकंदरीतच ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात संघाच्या काही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली किंवा आधी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली होती.(RSS March in Malda)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर