सहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग, नेतृत्व आणि निर्णयक्षमता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने शिर्डी येथे दि. ३ व ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय ‘नारीशक्ती सहकारिता संमेलन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राज्याच्या विविध भागांतून सहकार क्षेत्राशी संबंधित दोन हजारांहून अधिक महिला प्रतिनिधींनी या संमेलनात सहभाग घेतला. त्यानिमित्ताने महिलांच्या सहकार क्षेत्रातील वाढत्या सहभागाची आणि नेतृत्व क्षमतेची साक्ष देणार्या या संमेलनाचा आढावा घेणारा हा लेख...
‘बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार’ या विचारातून सहकार चळवळीला संस्कारांची जोड देण्याचा प्रयत्न ‘सहकार भारती’कडून केला जात आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघटनेने गेल्या अनेक वर्षांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सहकार भारती’तर्फे ‘नारीशक्ती सहकारिता संमेलना’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या हजारो महिला या संमेलनाला उपस्थित होत्या.
या भव्य संमेलनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. तसेच राज्याचे जलसंपदामंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महिला व बालविकासमंत्री मेघना बोर्डीकर, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पांचपोर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रातील महिलांची ही भव्य परिषद पाहून यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, "सहकाराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महिलांचा सहकारातील सहभाग वाढवायला हवा; त्यासाठी ‘सहकार भारती’च्या माध्यमातून पुढाकार घेतला जातो. नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशनानिमित्ताने त्याचे दर्शन घडले,” तर मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून निर्णय होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत आहे. महिला सक्षमीकरणासाठी तीन कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे.” या संमेलनाचा उद्देशच होता की, सहकार क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग केवळ सभासद किंवा ‘कार्यकर्ती’ म्हणून न राहता, त्या निर्णय प्रक्रियेतील सक्षम ‘नेतृत्वकर्ती’ म्हणून पुढे याव्यात. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेले हे संमेलन केवळ दोन दिवसांचा कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील महिला नेतृत्वाला नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरले. राज्याच्या कानाकोपर्यांतून आलेल्या महिला प्रतिनिधींना एकत्र आणत, त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण, विचारमंथन आणि प्रशिक्षणाची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शनपर आणि चर्चात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सहकार क्षेत्रातील अनुभवी महिला नेतृत्व, प्रशासन, सरकारी योजना, महिला सक्षमीकरण, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास अशा विविध विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन मिळाले. ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला प्रमुख वैशाली आवाडे यांनी संमेलनाच्या उद्देशाविषयी माहिती देताना सांगितले की, "महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोठे आहे. विविध प्रकारच्या सहकारी संस्था, बचत गट आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महिला प्रभावीपणे कार्यरत आहेत. अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्षपद आणि महत्त्वाच्या जबाबदार्याही महिला समर्थपणे सांभाळत आहेत.”
या पार्श्वभूमीवर महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग अधिक वाढावा, त्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे आणि भविष्यात सहकारी संस्थांमध्ये सक्षम महिला नेतृत्व निर्माण व्हावे, या व्यापक उद्देशाने ‘नारीशक्ती सहकारिता संमेलना’चे आयोजन करण्यात आले. या संमेलनात शशिकला जोल्ले, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला प्रतिनिधींना सहकार क्षेत्रातील संधी आणि आव्हाने समजून घेण्यास मदत झाली.
यावेळी ‘सहकार भारती’चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकार क्षेत्राच्या व्यापक विस्ताराकडे लक्ष वेधले, तर ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी ‘सहकार भारती’च्या कार्याचा आढावा घेतला.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबरोबरच त्यांचे सामाजिक आणि संस्थात्मक नेतृत्व विकसित झाले, तर सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप प्राप्त होऊ शकते. या दृष्टीने शिर्डीतील नारीशक्ती सहकारिता संमेलनाने महाराष्ट्रातील महिला सहकार चळवळीसमोर नवी दिशा आणि नवी आशा निर्माण केली आहे. नारीशक्तीच्या सहकार्याने सहकार क्षेत्रात देशाच्या प्रगतीचा नवा इतिहास रचला जात आहे. हे संमेलन या इतिहासाची नांदी आहे, असेच म्हणावे लागेल.
- शुभांगी सारंग