
अर्णव गंधे, काजल पोकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देहू–हिंजवडी–सोमाटणे–मारुंजी परिसरातील टेकड्यांवर कॅमेरा ट्रॅप लावून वन्यजीवांच्या हालचालींचा अभ्यास सुरू केला आहे. या माध्यमातून परिसरातील वन्यजीवांची विविधता, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि त्यांच्या भ्रमणमार्गांची माहिती संकलित केली जात आहे. या सर्वेक्षणात भारतीय पट्टेरी तरसाची नोंद होणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वी धानोरी, बॉम्बे सॅपर्स टेकडी, चऱ्होली आणि भांबुर्डे वनपरिक्षेत्रातूनही तरसाच्या दर्शनाच्या नोंदी समोर आल्या आहेत.
भारतीय पट्टेरी तरस हा प्रामुख्याने माळराने, गवताळ प्रदेश, खुरट्या वनस्पतींचे अधिवास आणि टेकड्या-डोंगराळ भागांत आढळणारा वन्यजीव आहे. मात्र, शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे अशा नैसर्गिक अधिवासांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वीपर्यंत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील टेकड्यांवरही तरस आढळल्याच्या नोंदी होत्या. त्यानंतर शहराचा विस्तार, वाढती बांधकामे आणि नैसर्गिक भूभागातील बदल यांमुळे वन्यजीवांच्या अधिवासांचे क्षेत्र कमी होत गेले. अशा परिस्थितीत शहराबाहेरील आणि शहराच्या वेशीवरील टेकड्यांचे महत्त्व वाढले आहे. देहू–सोमाटणे–मारुंजी–हिंजवडी परिसरात आजही दख्खन पठाराचे वैशिष्ट्य असलेला माळरानी, गवताळ आणि खुरट्या वनस्पतींचा अधिवास काही प्रमाणात टिकून आहे. चढ-उतार असलेल्या या टेकड्यांमुळे वन्यजीवांना लपण्यासाठी, अन्नाच्या शोधात फिरण्यासाठी आणि एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. त्यामुळे मानवी वस्तीचा विस्तार होत असतानाही या परिसरात तरसासारख्या वन्यजीवांचे अस्तित्व टिकून असल्याचे दिसते.