अब्जाधीश उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले एलॉन मस्क हे, आज वैश्विक राजकारण आणि व्यापारविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. एका बाजूला भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेत आपल्या ‘स्टारलिंक’ सेवेच्या प्रवेशावरून त्यांनी मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला, तर दुसरीकडे अमेरिकेत त्यांच्या राजकीय देणग्यांवरून तीव्र वादंग उठला आहे. अमेरिकेचे सिनेटर बर्नी सॅण्डर्स यांनी, मस्क यांच्या अफाट संपत्ती आणि राजकीय प्रभावावर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. "मस्क यांना रोखा, धनकुबेरांचे वर्चस्व रोखा,” अशी आक्रमक भूमिकाही सॅण्डर्स यांनी घेतली आहे.
अमेरिकेच्या राजकीय इतिहासात डोकावल्यास, धनदांडग्यांचा वाढता प्रभाव हा नेहमीचाच चिंतेचा विषय. सिनेटर बर्नी सॅण्डर्स यांनी याच मुद्द्यावरून एलॉन मस्क यांच्यावर थेट हल्लाबोल केला. त्यांच्या दाव्यानुसार, २०२४च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी, मस्क यांनी सुमारे २९ कोटी डॉलर खर्च केले होते. या राजकीय गुंतवणुकीनंतर, मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे आणि ते जगातील पहिले ‘खरबोपती’ झाल्याचेही सॅण्डर्स यांनी म्हटले. केवळ राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकच नव्हे, तर आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षासाठी मस्क पाण्यासारखा पैसा वाहात असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, २०२५-२६ या काळात मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना तब्बल ३६ कोटी डॉलर (सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये) दिले. म्हणजेच, ‘रिपब्लिकन सिनेट लीडरशिप फंड’ १५.८ कोटी डॉलर, ‘अमेरिका पीएसी’ (सिनेट उमेदवारांच्या समर्थनार्थ) ७.६ कोटी डॉलर, ‘हाऊस रिपब्लिकन सुपर पीएसी’ २ कोटी डॉलर, त्याचबरोबर ‘गव्हर्नर असोसिएशन’ आणि टेसासमधील उमेदवारांना केलेली कोट्यवधी रुपयांची मदत यात आहे. सॅण्डर्स यांच्या मते, हा पैसा निव्वळ देणगीच नसून, सरकारी धोरणे नियंत्रित करण्याचाच एक प्रयत्न आहे.
भारतात मक्तेदारी विरुद्ध अमेरिकेत राजकीय हस्तक्षेप; मस्क यांच्या कार्यपद्धतीचे हे दोन्ही पैलू अत्यंत रंजक आणि तितकेच विचार करायला लावणारे आहेत. भारतात ‘स्टारलिंक’ची उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी, मस्क प्रयत्नशील आहेत. मात्र, स्पर्धा आणि मक्तेदारीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुकेश अंबानी यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत, थेट ‘पंतप्रधान अंबानी’ असाही उल्लेख केला. बाजारातील पारदर्शकता आणि स्पर्धा संपवून, स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न भारतीय उद्योगपती करत असल्याची टीका मस्क यांनी केली होती. याउलट, अमेरिकेत खुद्द मस्क हेच राजकीय पक्षांना भरभक्कम निधी पुरवून, सरकारी धोरणांवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप सॅण्डर्स करत आहेत. अर्थात, कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केल्यास, अमेरिकेत राजकीय देणगी देणे हा लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यामुळे तो थेट कोणत्याही भ्रष्टाचाराचा पुरावा नाही. परंतु, मस्कसारखे अब्जाधीश ज्याप्रकारे निवडणुकीच्या निकालांवर आणि संसदेच्या निर्णयांवर प्रभाव टाकत आहेत, त्यामुळे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एका बाजूला बाजारात स्वतःसाठी मोकळी वाट शोधणारे आणि दुसर्या बाजूला अमेरिकेत पैशाच्या जोरावर राजकीय प्रभाव निर्माण करणारे एलॉन मस्क, हे आधुनिक काळातील भांडवलशाही आणि लोकशाहीतील वाढत्या संघर्षाचे जिवंत उदाहरण ठरावे. सॅण्डर्स यांची ही चपराक केवळ मस्कपुरतीच मर्यादित नसून, जागतिक पातळीवरील राजकारणावर धनकुबेरांच्या वाढत्या मुसक्या आवळण्याचीही गरज अधोरेखित करणारी आहे. कारण, सत्तेत येताच नेते या उद्योगपतींच्या हिताचे कायदे करू लागतात, यामुळे लोकशाहीचे खरे स्वरूप मागे पडते.
मस्क आणि बर्नी सॅण्डर्स यांच्यातील या संघर्षात्मक बाबी लक्षात घेता, आजच्या डिजिटल युगात पैशाच्या जोरावर लोकशाहीचे नियंत्रण कागदावरच राहून, प्रत्यक्षात मोजया उद्योगपतींच्याच हातात सत्तासुत्रे जाण्याचा धोका निर्माण झालाय का? असेच चित्र निर्माण झाले आहे. म्हणूनच, आर्थिक सामर्थ्य आणि राजकीय स्वातंत्र्य यांच्यात योग्य मर्यादा आखून, ‘धनकुबेरांच्या मुसया आवळण्याची’ चर्चा जागतिक पातळीवर गंभीरपणे केली जात आहे.